अटलजी एक राजस व्यक्तिमत्व


आज अटलजींची जयंती. भारतीय राजकारणातील एक राजस पर्व. १९६९ साली आम्ही मुंबईत राहत होतो. सायन हून चेंबूर ला बस ने जाण्यासाठी स्टोप वर उभा होतो तेव्हा उघड्या जीप मधून अटलजी मुंबईत प्रवेश करत होते. त्यांचे आगमन हे त्यावेळी मुंबईत जनसंघाचे अधिवेशन होते व ते नव निर्वाचित अध्यक्ष होते. हे त्यांचे झालेले पहिले दर्शन. त्या अधिवेशनात पक्षाबाहेरील अतिथी म्हणून आचार्य अत्रे यांना निमंत्रित केले होते असे पण आठवते.
पुढे १९७० च्या मे महिन्यात संघ शिक्षा वर्गासाठी नाशिक येथे गेलो असताना एके दिवशी अटलजींचे बौद्धिक ५ फूट अंतरावरून ऐकायचा योग आला होता. ते त्यांचे अ राजकीय भाषण होते. त्यातील एक वाक्य अजून आठवते आहे. ते म्हणजे "संघ समझना आसान नही है." पुढे त्यांची काही अ राजकीय भाषणे पण ऐकली होती. त्यात गीत रामायणाच्या रौप्य महोत्सवात केलेले भाषण, गोळवलकर गुरुजींच्या पुस्तक प्रकाशनाच्या वेळी झालेले भाषण आठवते. नाशिकच्या वर्गानंतर लगेच भिवंडी येथील दंगली नंतर मुंबईत एका भव्य सभेत त्यांचे याज्कीय भाषण प्रथम ऐकले. मग अनेक वेळा ऐकत गेलो. पण त्यांची भाषणे ही राजकीय असली तरी एकांगी नसत. त्यात प्रासादिक पण असे. एक लय, गेयता असे. ते भाषण उत्स्फूर्त वाटत असे तरी ते बांधलेले असे. मुद्दे एकात एक साखळी प्रमाणे गुंफलेले असत. त्यात नर्म विनोद असे. आपल्या अभिरुचीसंपन्न व्यक्तिमत्वाचे त्यातून दर्शन घडत असे.त्यामुळे निवडणुकीतील प्रचाराची भाषणे पण बहुपेडी असत.
विरोधात असल्याने त्यांनी संघर्ष पण केला, पराभव पचवले. पण जेव्हा विजय मिळाला तेव्हा पण ते जमिनीवर असत. १९७८ साली त्यांची परराष्ट्र मंत्री असताना झालेले भाषण ऐकले तेव्हा त्यात त्यांच्यावर असलेली जबाबदारी जाणवत होती. १९९६ मध्ये लोकसभेच्या निवडणुकीचे एक्झिट पोलचे निष्कर्ष येत होते व त्यात भाजप सर्वात मोठा राजकीय पक्ष म्हणून येणार हे स्पष्ट झाले होते.त्यावेळी दूरदर्शन वरचे भाषण हे एका परिपक्व राजकीय नेत्याचे भाषण कसे असावे याचा वस्तुपाठ होते. त्यांचे प्रत्येक भाषण हे एखाद्या मैफालीसारखे असायचे.
पुढे मात्र पंत प्रधान पदाची जबाबदारी व सुरु झालेला स्मृती भ्रंश पहिल्यासारखी होत नसत. पण एकूण त्यांची या कालखंडावर पडलेली छाप व त्यांचे भारतीय राजकारणातील योगदान पाहता ते सर्वार्थाने भारत रत्न होते.
त्यंच्या स्मृतीला प्रणाम.

अनिल जोशी २५-१२-2019

Comments

Popular posts from this blog

स्पेशल नात्याचे गाव - देवरुख

डोळे हे जुलमी गडे

राग मधुवंती