तीच चव
तीच चव
आज खूप वर्षांनी स्वीट होम मध्ये गेलो होतो. सकाळची वेळ आणि हवा आल्हाददायक गार होती. तेव्हा वाफाळलेली कॉफी प्यायची इच्छा झाली. सध्या साधी गोड जायफळ युक्त कॉफी दुर्मिळ झाली आहे. पूर्वी लग्नाच्या आदल्या दिवशी सीमांत पूजनाला सर्रास जेवण नसायचे तेव्ह्या कॉफी द्यायची पद्धत होती.
ब्रू, नेस्कॅफे, सीसीडी , latte, coppichinu, अशा अनेक प्रकारची कॉफी आपल्या समोर येत असतात. त्यातून वयपरत्वे शुगर लेस कॉफी अनिवार्य.
सुमारे ४८-४९ वर्षांपूर्वी पुण्यात महाविद्यालयीन शिक्षणासाठी आलो तेव्हा होस्टेलवर पुण्याबाहेरचे अनेक विद्यार्थी होते. त्यापैकीच कुणी तरी स्वीट होम मधील कॉफी बद्दल सांगितले. मग तिचा आस्वाद घेतला. नंतर तेथील साबुदाणा खिचडीने पण भुरळ पाडली. तेथील शेवेची पखरण असलेले इडली सांबार वैशिष्ठ्यपूर्ण होते. त्याच्या पूर्ण मराठी पेहरावामुळे ते तितकेसे रुचले नाही. आता स्वीट होम ने कात टाकली आहे. अनेकविध पदार्थ तुमची जिव्हा तृष्णा तृप्त करायला उपलब्ध आहेत. विशेषत: उपवासाचे पदार्थ. अशा वेळी सध्या तिथे कॉफी मिळेल की नाही याबद्दल मी साशंकच होतो. पण तिथे होकार मिळाला. फरक फक्त तेव्हा जितक्या पैशात कॉफी मिळायची तिला तितके रुपये पडतात. पण हे योग्यच आहे. पहिला घोट घेतला आणि जिभेने दाद दिली. तीच चव थेट त्या सत्तरच्या दशकात घेवून गेली.
असाच एक अनुभव ग्रीन बेकरीच्या ब्रेड बद्दल आला होता. आमच्याकडे एक पाहुणे तो ब्रेंड खावून म्हणाले होते पूर्वी शानिपाराराच्याजवळ ग्रीन बेकरीत असा ब्रेड मिळत असे. त्यांना जेव्हा सांगितले की हा तिथूनच आणला आहे तेव्हा इतक्या वर्षांनी तीच चव मिळाल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले होते. आता ब्रेड सारखा ब्रेड पण ग्रीन बेकारी, कयानी बेकारी यांनी पळ्या चवीचे वैशिष्ठ्य वर्षानुवर्षे जपले आहे.
तीच गोष्ट बाजीराव रोड वरील वाडेश्वर च्या इडलीची. प्रभा च्या वड्याची. आजही दाक्षिणात्य उफारासाठी खवय्ये फर्गुसन कॉलेज रोडवरच्या वैशाली रुपालीची आठवण काढत तेथील गर्दी सहन करून जातात.
पूर्वी इराणी हॉटेल्स मधील चहा, सामोसे, केक यांची चव ठरलेली असे. पण सध्या हे इराणी गायब झालेत. अलका टोकीज जवळील रिगल सध्या इमारतीच्या कामामुळे बंद आहे पण ते एकदम बदलले होते. कुणीतरी तिथे साबुदाणा खिचडी छान मिळते असं सांगितल तेव्हाच त्याचे इराणी पण नावापुरतेच उरले असल्याची जाणीव झाली.
बदल हा स्वाभाविक आणि अपरिहार्य आहे. काळाबरोबर अनेक गोष्टी बदलतात पण कधीतरी अशा काही गोष्टी आपल्याला भूतकाळात घेवून जातात हे मात्र खर. आणि त्यामुळे मन सुखावून जाते.
अनिल जोशी
२९.१२.२०१९
नेहमी प्रमाणे सहज सुंदर
ReplyDeleteवाह, आठवणी जाग्या झाल्या. लिहिते रहा
ReplyDelete