व पु एक भावलेला लेखक

व पु काळे या नावातच एक प्रसन्नता आहे. करत ते व्यक्तिमत्व अतिशय प्रसन्न होते. आज पण वपु या नावाला ग्लॅमर आहे, आज त्यांच्या चाहत्यांनी त्यांच्या नावाचे व्हाट्स अँप ग्रुप बनवलेले आहेत. मुळात कथाकार असलेल्या वपुंनी काही कादंबऱ्या पण लिहिल्या तर त्यांच्या पार्टनर चे नाट्य रूपांतर पण झाले होते.

त्यांच्या प्रसिद्ध पुस्तकांची यादी पहिली तरी त्यांच्या विपुल लेखन संपदेचा अंदाज येतो तर माझ्या सारख्यांना ही सगळी पुस्तके आपण वाचली आहेत हे आठवून एक सुखद धक्का बसतो.
Image result for व पु काळे पुस्तके

इण्टिमेट, एकमेक, ऐक सखे, कथाकथनाची कथा, कर्मचारी, का रे भुललासी, काही खरं काही खोटं,
गुलमोहर, गोफ, गोष्ट हातातली होती !घर हरवलेली माणसं,चक्कर,चतुर्भुज,चिअर्स,
जपून टाक पाऊल,झोपाळा, ठिकरी, तप्तपदी, तू भ्रमत आहासी वाया,दुनिया तुला सरेल!,दोस्त,
नवरा म्हणावा आपला, निमित्त, पाणपोई, पार्टनर, प्रेममयी, प्लेझर बॉक्स, प्लेझर बॉक्स – २, फॅंटसी एक प्रेयसी, बाई, बायको, कॅलेंडर,भुलभुलैय्या, महोत्सव, माझं माझ्यापाशी,माणसं, मायाबाजार, 
मी माणूस शोधतोय,मोडेन पण वाकणार नाही, रंग मनाचे, रंगपंचमी, वन फॉर द रोड, वपु ८५, 
वपु सांगे वडिलांची कीर्ती, वपुर्झा, वपुर्झा – २, वपुर्वाई, वलय, संवादिनी, सखी, स्वर, ही वाट एकटीची, हुंकार.

त्यांच्या कथा या गोष्ट सांगावी तशा असतात त्यामुळे त्या कथनासाठी अतिशय योग्य. त्यामुळे त्यांचे कथा कथनाचे कार्यक्रम पण खूप रंगत असत. अनेक जण कथनासाठी त्यांच्या कथा निवडत असत. त्या कथांना एक परफॉर्मन्स व्हॅल्यू असते. व्यवसायाने आर्किटेक्ट असलेले वपु मुंबई महानगरपालिकेच्या स्थापत्य विभागात नोकरी करत होते. त्यांचे वडील आर्टिस्ट पु श्री काळे हे नेपथ्यकार . हे पुण्यात प्रभात रोड येथे राहत असल्याने त्यांच्या पुणे मुंबई पुणे अशा फेऱ्या सुरु असत . सांस्कृतीक किडा डोक्यात असल्याने ते हृदयनाथ मंगेशकर यांच्या भाव सरगम मध्ये निवेदन पण करत . ते उत्तम पेटी वाजवत. ते काय किंवा पु ल काय त्यांच्या पेटी वादनामुळे वाचक प्रिय लेखक होण्यासाठी पेटी वाजवणे अत्यावश्यक असावे असा माझा समज झाला होता.

आपल्या सभोवतालच्या व्यक्ती, त्यांच्या आयुष्यातील घटना आणि त्यांचीच भाषा त्यामुळे वाचक त्यांच्या साहित्याशी लगेच जोडला जायचा. सध्या सरळ प्रसंगातून वपु सहज जीवन दर्शन घडवून जातात. त्यांच्या दोंदे या कर्मचारी कथेत हे दोंदे लोकांना कर्जे देता देता स्वतः जगायचे विसरून जातात आणि त्यांच्या निधनानंतर त्यांचे सर्व कुटुंबीय घराचा चेहरा मोहरा बदलून टाकतात. घर चालाचक करतात.हा बदल टिपता टिपता वपु सांगतात त्यांच्या बायकोच्या अंगावर मात्र तशीच साधी वायल ची साडी होती. त्यावर त्या म्हणाल्या इतक्या वर्षांचा सहवास आणि सवय , बदलणार कशी? तर ऐक सखे या कथेत एका मित्राच्या अकस्मात मृत्यूची गोष्ट सांगतात. त्या प्रसंगी दूर ठेवावे म्हणून त्याच्या छोट्या मुलीला घरी आणतात, तिला फिरायला नेतात , भेळ आईस्क्रीम होते. दुसऱ्या दिवशी मुलगी निघताना नमस्कार करते तेव्हा ते म्हणतात आधी देवाला नमस्कार कर. त्यावर ती शाळकरी मुलगी म्हणते -मी नाही करणार कारणबाप्पा माझ्या बाबाना त्याच्याकडे घेऊन गेला. तिच्या एका मैत्रिणीच्या बाबतीत असेच घडलेले असते . वडील गेले म्हणून त्यांचा मित्र तिला घरी नेतो , तिला आनंद देतो. पण हे वास्तव उरतेच. त्यामुळे ही मुलगी खरे काय ते समजून सुद्धा काही दाखवत नाही . तेव्हा वपु म्हणतात काल  आम्ही हिला सांभाळले की हिने आम्हाला?

त्यांची पार्टनर कादंबरी तर स्वप्न आणि सत्य या एकाच नाण्याच्या दोन्ही बाजू असल्याची ग्वाही देणारी आहे.
एखादी सुंदर मुलगी अचानक आयुष्यात येते अगदी स्वप्न वाटावं अशी तर पुढचा संसार मात्र नेहेमीसारखाच रुक्ष ,सुखापेक्षा दु:खाचे , अपेक्षाभंगाचे धक्के देणारा. त्यामुळे पार्टनर म्हणजे नायकाचा स्वतः:शी संवाद घडवणारी व्यक्तिरेखा वाटते. आणखी एक वास्तव यात ते सांगतात की जरी आपला भाग्योदय झाला तरी आपली म्हणून सभोवतालची जी माणसे असतात ती तिथेच असतात आणि तुमच्यात व त्यांच्यात एक अदृश्य दरी निर्माण होते.(नायकाची आई , भाऊ, वाहिनी वगैरे)

वपुंच्या साहित्याला वाचक आणि रसिक मान्यता खूप लाभली पण समीक्षकांनी त्यांचे साहित्य दुर्लक्षित केले. पण त्यांनी त्याची कधी खंत बाळगली नाही.वाचकांसाठी ते एक भावलेला लेखक राहिले आणि तीच त्यांच्या साहित्याला दिलेली मोठी दाद आहे.

एका कार्यक्रमात शेवटी लोकाग्रहास्तव वपु नी पेटीवर कामा पुरता मामा या चित्रपटातील जीवनात ही घडी अशीच राहूदे हे गाणे वाजवल्याचे वाचले होते ते आज सकाळी ऐकताना वपुंच्या सगळ्या गोष्टी व आठवणी मनात रेंगाळू लागल्या.
जीवनात ही घडी अशीच राहूदे 
प्रीतीच्या फुलांवरी वसंत नाचू दे
रंगविले मी मनात चित्र देखणे 
आवडले वेडीला चित्र खेळणे 
स्वप्नातील चांदवा जीवास लाभू दे 
हळूच तुला बघण्याचा छंद आगळा 
लज्जेचा त्यावीण का अर्थ वेगळा 
स्पर्शातून अंग अंग धुंद होवूदे 
पाहू दे असेच तुला नित्य हासता 
जाऊदे असाच काळ शब्द झेलता 
मिलनात प्रेमगीत धन्य होवू दे 
(यशवंत देव)

व्यक्ती म्हणून पण वपु मानाने उमदे होते. एक दोन वेळा त्यांना भेटण्याचा योग्य आला होता. ते जसे वाचक प्रिय लेखक होते तसे वाचकांशी त्यांचा छान रॅपो होता. अनेक वाचक त्यांचे पेन फ्रेंड होते. अनेकांनी मला त्यांची सुंदर हस्ताक्षरात आलेली पत्रं दाखवली आहेत. त्यांनी त्यांच्या भाच्याची लग्नपत्रिका इतकी सुरेख लिहिली होती हा भाचा (अजित टिळक माझा कॉलेज मधील व नंतर टेल्को मधील मित्र) आज ही ती पत्रिका मी जपून ठेवली नाही याची हळहळ वाटते.
आज वपु नाहीत, तो मित्र पण हयात नाही. तेव्हा उरली फक्त आठवण.

व. पु. काळे यांचे विचार[संपादन]

  1. मैत्रीचे धागे कोळ्यापेक्षाही बारीक असतात, पण लोखंडाच्या तारेपेक्षाही मजबूत असतात..! तुटले तर श्वासानेही तुटतील, नाहीतर वज्राघातेनेही तुटणार नाहीत..!!
  2. संवाद दोनच माणसांचा होतो, त्याच्यात तिसरा माणूस आला की त्या गप्पा होतात..!!
  3. कोमलतेत प्रचंड सामर्थ्य असतं कोमलता म्हणजे दुर्बलता नव्हे ..! म्हणूनच खडक झिजतात प्रवाह रुंदावत जातो..!!
  4. जाळायला काही नसलं तर पेटलेली काडीसुद्धा आपोआप विझते..!!
  5. खर्च झाल्याच दु:ख नसतं, हिशोब लागला नाही की त्रास होतो..!!
  6. प्रॉब्लेम्स नसतात कुणाला..? ते शेवटपर्य असतात..! पण प्रत्येक प्राॅब्लेमला उत्तर हे असतंच. ते सोडवायला कधी वेळ हवा असतो,कधी पैसा तर कधी माणस..!या तिन्ही गोष्टी पलीकडचा प्राॅब्लेम अस्तित्वातच नसतो..!!
  7. आठवणी या मुंग्यांच्या वारुळाप्रमाणे असतात..! वारूळ पाहून आतमध्ये किती मुंग्या असतील याचा अदमास घेता येत नाही. पण एका मुंगीने बाहेरचा रस्ता धरला की एकामागोमाग असंख्य मुंग्या बाहेर पडतात. आठवणींचही तसंच आहे..!!
  8. शस्त्रक्रिया होण्यापूर्वी रोगी घाबरलेला असतो, बरा झाल्यावर शिवलेली जखम तोच कौतुकाने दाखवत सुटतो..!!
  9. घेणाऱ्याच्या अपेक्षेपेक्षा देणार्‍याची ऐपत नेहमीच कमी असते..!!
  10. माणूस अपयशाला भीत नाही.अपयशाचं खापर फोडायला काहीच मिळालं नाही तर..? याची त्याला भीती वाटते..!!
  11. बोलायला कुणीच नसणं यापेक्षा आपण बोललेलं समोरच्यापर्यत न पोचणं हि शोकांतिका जास्त भयाण..!!
  12. कुणीही कसं दिसावं यापेक्षा कसं असावं याला महत्व आहे. ते शक्य नसेल तर जास्तीत जास्त कसं नसावं याला तरी नक्कीच महत्व आहे.
  13. पाण्यात राहायचे तर माश्यांशी नुसती मैत्री करून भागत नाही तर स्वत:ला मासा बनावे लागते.
  14. वादळं जेव्हा येतात तेव्हा आपण आपल्या मातीला घट्ट रुजुन रहायचं असतं. ती जितक्या वेगाने येतात तितक्याच वेगाने निघून जातात. वादळ महत्वाचे नसते प्रश्न असतो आपण त्याच्याशी कशी झुंज देतो आणि त्यातून कितपत बऱ्या अवस्थेत बाहेर येतो याचा.
  15. कबुतराला गरुडाचे पंख लावता येतीलही, पण गगन भरारीचं वेड रक्तातच असावं लागतं, कारण आकाशाची ओढ दत्तक घेता येत नाही .
  16. आकाशात जेव्हा एखादा कृत्रीम ग्रह सोडतात तेव्हा गुरुत्वाकर्षणाच्या सीमेबाहेर त्याला पिटाळुन लावेपर्यतच सगळा संघर्ष असतो. त्याने एकदा स्वतः गती घेतली की उरलेला प्रवास आपोआप होतो.
  17. समाजात विशिष्ट उंची गाठेपर्यत जबर संघर्ष असतो. पण एकदा अपेक्षित उंचीवर पोचलात की आयुष्यातल्या अनेक समस्या ती उंचीच सोडवते.
  18. संध्याकाळच्या संधीप्रकाशातही जो टवटवीत राहीला त्याने दिवस जिंकला.
  19. अंत’ आणि ‘एकांत’ ह्यापैकी माणूस एकांतालाच जास्त घाबरतो.
  20. वाहतो तो झरा आणि थांबते ते डबकं! डबक्यावर डास येतात आणि झऱ्यावर राजहंस!
  21. खऱ्या विद्यार्थ्याला कधीच सुट्टी नसते.सुट्टी ही त्याच्यासाठी नवं काहीतरी शिकण्याची संधी असते.
  22. सुरुवात कशी झाली यावरच बऱ्याच घटनांचा शेवट अवलंबून असतो.
  23. चुकतो तो माणूस आणि चुका सुधारतो देवमाणूस!
  24. तुम्ही आयुष्यात किती माणसे जोडली यावरुन तुमची श्रीमंती कळते.
  25. औदार्य म्हणजे तुमच्या क्षमतेपेक्षा अधिक देणं आणि आत्मसन्मान म्हणजे तुमच्या गरजेपेक्षा कमी घेणं.
  26. गंजण्यापेक्षा झिजणे केव्हाही चांगले.
  27. अत्यंत महागडी, न परवडणारी खर्‍या अर्थाने ज्याची हानी भरुन येत नाही अशी गोष्ट किती उरली आहे ह्याचा हिशोब नसताना आपण जी वारेमाप उधळतो ती म्हणजे “आयुष्य”.
  28. भूक आहे तेवढे खाणे ही प्रकृती,भूक आहे त्यापेक्षा जास्त खाणे ही विकृती आणि वेळप्रसंगी स्वत: उपाशी राहून दुसऱ्याची भूक भागवणे ही संस्कृती!
  29. आपण किती पैसा मिळवला यापेक्षा, तो खर्च करून आपण किती समाधान मिळवले, हे जो पाहतो तो खरा आनंदी व्यक्ती असतो.
  30. कागदाला अहंकार चिकटला की त्याची डिग्री होते.
अनिल जोशी 
२१.०२.२०२० 
कृपया आपली प्रतिक्रिया आपल्या नावासह द्यावी 

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

स्पेशल नात्याचे गाव - देवरुख

डोळे हे जुलमी गडे

राग मधुवंती