खंडाळ्याचा घाट

घाटाव मंदी घाट हा मोठा
खंडाळा हा अवघड
 Image result for खंडाला घाट

असं एक गाणं आहे. मुंबई पुण्याच्या लोकांना हा घाट परिचित आहे. कारण मुंबईहून पुण्याला जायला हा घाट पार करायलाच लागतो. या घाटाचे वैशिष्ठ्य म्हणजे सुमारे २४ लहान मोठ्या बोगद्यांतून गाडी प्रवास करते. लहानपणी पुण्याला जातांना या बोगद्यांचे विलक्षण आकर्षण वाटायचे. आणि त्यावेळी जरी रस्ता असला तरी बरीच वाहतूक रेल्वेने व्हायची. या घाटाची चाहूल लागायची ती कर्जत ला मागे आणखी इंजिन लागायचे. आणि प्रत्येक वळणावर खिडकीतून ही दोन्ही इंजिने पाहता यायची. घाटाची चढण जाणवायची. सगळं अद्भुत होत.आणि गाडी लोणावळ्याहून सुटली की पुण्याच्या दिशेने सुसाट सुटायची. बोगदा आला की घाट सुरु हे समीकरण इतकं डोक्यात होत की एकदा मी गाडीत जागा असल्याने (पूर्वी गाडीने वेग घेतला की आमची विकेट पडायची )ठाण्यानंतर बोगदा आला तेव्हा आता इतर बोगदे कधी येणार याची वाट पाहत होतो. नंतर समजलं की हा पारसिक बोगदा आणि घाट यांचा काही संबंध नाही. मग नागपूरला जाताना कसारा
घाट लागला. त्याला ६-७ बोगदेच होते त्या मुळे तो घाट काही खास नाही वाटला. पुढे कधी तरी पुण्याहून बसने
मुंबईला गेलो तेव्हा बोगदे नाहीत म्हणजे प्रवास झालाच नाही असा फील आला.

पुढे एकदा खंडाळ्यापर्यंत रेल्वेने जाऊन पायी घाट उतरायची पावसाळी सहल निघाली होती त्या वेळी पावसात
भिजत तो घाट अक्षरश: अनुभवला. मंगिरबाबाच्या वळणापासून रस्ता सोडून ओढ्याच्या काठाकाठाने पायवाट तुडवत जाण्यातला थरार काही वेगळाच होता. नंतर बऱ्याच वेळा या घाटात पाऊस झेलायला आलो आहे. त्या बरोबरच ड्युक्स नोज, टायगर्स लीप , आयएनएस शिवाजी, वळवण व भुशी धरणे अशा लोणावळ्यातील ठिकाणी पण भटकंती केली आहे. या घाटाच्या इतक्या प्रेमात पडलो की पावसाळ्याव्यतिरिक्त ऐन रात्री पण अंधारात डोंगरांच्या सुळक्यांचे वेगवेगळे आकार पाहणं, कधी दरीत पसरलेले चांदणे पाहणे, वरून खोपोलीच्या दिव्यांचे दरीतील तारांगण पाहणे हे पण आगळे अनुभव घेतले आहेत.

इथला पाऊस पण वेगळाच आहे. तो मुंबईच्या पावसासारखा जोरदार झोडपणारा नसतो किंवा पुण्याच्या
पावसासारखा रिपरीपणारा नसतो. एखादी सर पडून जाते, मग कधी स्वच्छ ऊन पडतं, कधी वाट हरवणारे धुके पसरते. कधी डोक्यावर हाताच्या अंतरावर ढग फिरताना दिसतात. मन लुभावणारी किती म्हणून दृश्ये दिसावीत?

या निसर्ग सौंदर्य संपन्न परिसराचे दोन वेग वेगळे दाखले मिळाले. १९८० मध्ये आम्ही काश्मीर मध्ये प्रवास करत होतो.बहुधा सिझन नसल्याने निसर्गाचे काही नजारे दिसत नव्हते . तेव्हा एक सह प्रवासी वैतागून म्हणाला अरे ये क्याकाश्मीर है? उसासे तो खंडाला घाट बढिया है.

कविवर्य वसंत बापट यांनी डेक्कन क्वीन मधून प्रवास करणारे कसे आनंदाला मुकतात याचे छान वर्णन केले आहे.

दख्खन राणीच्या बसून कुशीत
शेकडो पिले ही चालली खुशीत
सुंदर मानव तुंदिल अंगाचे
गालिचे गुलाब शराबी रंगाचे
ठेविल्या बाहुल्या बांधून बासनी
गोजिरवाणी लाजिरवाणी
पोरटी घेऊन पोटाशी कुशीत
... दख्खन रानी ही चालली खुशीत
निसर्ग नटला बाहेर थाटात
पर्वत गर्वात ठाकले थाटात
चालले गिरीश मस्तकांवरून
आकाशगंगांचे नर्तन गायन
झेलून त्यांचे नुपूर घुंगुर
डोलती डौलात दुर्वांचे अंकुर
मोत्यांची जाळी घालून भली
रानाची चवेणी जाहली प्रफुल्ल
... दख्खन राणीला नव्हती दखल
ड्यूकचे नाकड सरळ अजस्त्र
राहिले उभे हे शतके सहस्त्र
त्याच्याही पाषाण हृदया कळाली
सृष्टीची शोभा ही वृष्टीत वेगळी
नीला तो तलाव तांबूस खाडी ती
पांढरा प्रपात हिरवी झाडी ती
डोंगरकडे _________
अवतीभवती इंद्राची धनुष्ये
... दख्खन राणीत मुर्दाड मनुष्ये
ख्खन राणीच्या कुशीत पोटात
बुडाली जाणीव चहाच्या घोटात
किलवर चौकट इसपिक बदाम
फेकीत फेकीत जिंकित छदाम
नीरस पोकळ वादांचे मृदंग
वाजती उगाच खमंग सवंग
खोलून चंची पोपटपंची
करीत बसले बुद्धीचे सागर
... दख्खन रानी ही ओलांडे डोंगर
धावत्या बाजारी एकच बालक
गवाक्षी घालून बसले मस्तक
म्हणाले "आई गं, धबधबा केवढा
पहा ना चवेणी, पहा हा केवडा
ढगांच्या वाफेच्या धूसर फेसात
डोंगर नहाती पहाना टेसात"
म्हणाली आई "पूरे गं बाई,
काय या बेबीची चालली कटकट"
... दख्खन राणीचा चालला फुंफाट
दख्खन राणीच्या पोटात कुशीत
शेकडो पिले ही चालली खुशीत
मनाने खुरटी दिसाया मोठाली
विसाव्या तिसाव्या वर्षी ही आंधळी
बाहेर असू दे उन वा चांदणे
संततधार वा धुक्चे वेढणे
ऐल ते पैल शंभर मैल
एकच बोगदा मुंबई पुण्यात
... दख्खन राणी ही चालली वेगात
... दख्खन राणी ही चालली वेगात

नंतर मेघालय मध्ये चेरापुंजी इथे पाऊस अनुभवत होतो. सगळेच खुश होतो. तेव्हा तो सुमोचा ड्रायव्हर म्हणाला अरे ये क्या बात है आपका वो खंडाला भी ऐसाही अजीब है ना? ही किमया अमीर खानच्या "आती क्या खंडाला " या गाण्याने फेमस केलेल्या खंडाळ्याची होती.

अशा या घाटाचे प्रतिक म्हणजे बोगदा यावर बापट लिहून जातात ही गाडी म्हणजे-
ऐल ते पैल शंभर मैल
एकच बोगदा मुंबई पुण्यात

आपल्या साम्रुद्ध सौंदर्याचे दान आम्हा रसिकांना भरभरून देणाऱ्या खंडाला घाटास मनोमनप्रणाम.

अनिल जोशी 


Comments