अमृताहुनी गोड



माणिक वर्मा यांचे मी ऐकलेले पहिले ध्वनिमुद्रित गाणे म्हणजे अमृताहुनी गोड नं तुझे देवा हा संत नामदेव महाराजांचा अभंग. साधी सोपी शब्द रचना आणि तशीच सधी प्रासादिक स्वर रचना. बाळ माटे यांनी भीमपलास रागात बांधलेली ही राचा अवीट गोडीची आहे.

पुढे मग त्यांची अनेक गाणी ऐकतच गेलो. काही ध्वनी मुद्रित तर काही प्रत्यक्ष मैफलीत . त्यांची लडिवाळ भावगीते, भक्तीगीते, नाट्यगीते, खयाल, ठुमरी , लावणी आणि काय नाही? माणिक वर्मा या पूर्वाश्रमीच्या माणिक दादरकर . त्यांनी त्यांच्या मातोश्री हिराबाई यांचे गाणे खर्या अर्थाने विकसित केले. पुढे त्यांना हिराबाई बडोदेकर यांची तालीम मिळाली व त्या किराणा घराण्याच्या गायिका म्हणून प्रसिद्धीस आल्या. अतिशय परिश्रमी गायिका म्हणून ओळखल्या जातात.घरात पाहुणे वगैरे आले की त्यांच्या झोपेत व्यत्यय नको म्हणून त्या बाथरूम मध्ये दर लावून दाराला पाठ लावून रियाझ करत असत. एवढे यांच्या गाण्याच्या निष्ठे विषयी पुरेसे आहे. जिथून जिथून म्हणून मिळेल तिथून त्या संगीत वेचत गेल्या. जगन्नाथ बुवा पुरोहित. इनायत खान , अप्पासाहेब भोपे , सुरेश बाबू माने .. किती नावे घावीत.

त्यांची गायकी ही साधी सरळ व सोपी मानली जाते. ऐकताना त्यांची गाणी सोपी व सरळ वाटतात पण गायला बसल्यावर ती सोपी गाणी गायला किती अवघड आहेत हे जाणवते. प्रसिद्ध गायिका अर्चना कान्हेरे यांनी आपल्या शिष्यांना त्यांची गाणी शिकवताना हे मर्म सांगितले .

घरात नवीन टेप रेकॉर्डर आणला तेव्हा वेगवेगळी गाणी रेकॉर्ड करायचा छंद लागला होता. यावेळी रेडिओ वर शास्त्रीय संगीताची आवड हा कार्यक्रम लागत असे त्यातून माणिक वर्मा यांचा जोगकंस आणि ठुमरी जमुनाके तीर ही ठुमरी रेकॉर्ड करून त्याची पारायणे केली होती. मग लक्ष्मी क्रीडा मंदिरात त्यांच्या मैफली ऐकल्या. अगदी शरदाचे चांदणे सारखे भावगीत किंवा धनराशी जाता मूढा पाशी सारखे नाट्यगीत असो.

एका संयुक्त मैफलीत त्यांचा जोगकंस व सावळाच रंग तुझा हे अवीट गोडीचे गीत ऐकले. त्यावेळी अप्पा जळगावकर पेटी च्या साथीला , व्ही जी जोग व्हायोलीनच्या साथीला तर आनंद चटोपाध्याय तबल्याच्या साथीला होते. ही मैफल मी कधीच विसरू शकणार नाही.

किराणा गायकी त्यांच्या रक्तात भिनली होती. त्याची प्रचीती पंडित जसराज यांच्याशी झालेल्या बोलण्यात आली. विषय निघाला अब्दुल करीम खान यांची गायकी पुढे नेण्याचा तेव्हा त्यांनी तीन नावे घेतली होती. एक होते सवाई गंधर्व, पंडित माणिक बुवा ठाकूरदास व तिसरे नाव होते माणिक वर्मा यांचे.

त्यांच्या निधनानंतर एक वर्षांनी अशोक हांडे यांनी माणिक मोती हा कार्यक्रम केला होता. त्याय त्यांच्या सुविद्य कन्या भारती, राणी यांच्याबरोबर अर्चना कान्हेरे होत्या तर सूत्रसंचालन भक्ती बर्वे यांनी केले होते. गाणी होत होती , आठवणींचा पट पुढे सरकत होता. दृष्ट लागण्यासारखा हा कार्यक्रम सांगतेच्या जवळ आला आणि त्यात अमृताहुनी गोड हे गाणे नाही म्हणून मन खट्टू होत होते पण भैरवी नसूनही कार्यक्रमाची सांगता अमृताहुनी गोड या गाण्याने झाली आणि मन भरून आले.

हा अभंग आम्हाला शाळेत अभ्यासाला पण होता.

अमृताहुनी गोड नाम तुझे देवा
मन माझे केशवा का बा न घे

सांग पंढरीराया काय करू यासी
का रूप ध्यानासी न ये तुझे

कीर्तनी बैसता निद्रे नागविले
मन माझे गुंतले विषयसुखा

हरिदास गर्जती हरिनामाच्या कीर्ती
न ये माझ्या चित्ती नामा म्हणे

या अभंगाविषयी  एक हृद्य आठवण माणिक वर्मा यांनी एका मुलाखतीत सांगितली . पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराच्या मंडपात त्यांना हा अभंग गायची संधी मिळाली होती आणि साक्षात विठूरायासमोर हा अभंग गावून धान्य झाल्याचा आनंद त्यांना मिळाला. परम प्रिय शिष्य नामदेव याची रचना माणिक वर्मा यांच्या दैवी स्वरात ऐकून विठू रायाला पण संतोष झाला असणार आणि म्हणूनच त्याने हा योग जुळवून आणला असणार. 

अनिल जोशी 
१०.०४.२०२०
आपली प्रतिक्रिया कृपया आपल्या नावासह द्यावी.




Comments

Post a Comment

Popular posts from this blog

स्पेशल नात्याचे गाव - देवरुख

डोळे हे जुलमी गडे

राग मधुवंती