पिउनी चंद्रतुषार
चंद्राची शीतलता ,प्रणयी
जीवांची ओढ,चांदण्यांच्या निरभ्र आकाशामुळे निर्माण होणारे सुखद वातावरण या
सर्वांचा स्पर्श चंद्रकंस च्या सुरांना आहे. मालकंसच्या तुलनेत चंद्रकंस खेळकर
वाटतो. या रागाची निर्मिती अपघाताने झाली असे सांगतात. एकग बी.आर.देवधर हे
हार्मोनियम वर मालकंस वाजवत बसले होते. आणि चुकून त्य्नाचा हात कोमल निषादा ऐवजी
शुद्ध निषादाच्या पट्टीवर पडला. काही तरी छान वाजतंय असं वाटलं म्हणून ते पुन्हा
पुन्हा मालकंस मध्ये शुद्ध निषाद वाजवून बघत होते. आणि चंद्रकंस राग जन्माला आला.
याला मालकंस अंगाचा चंद्रकंस म्हणून ओळखले जाते. एका शुद्ध निशादामुळे आणि रिषभ या
स्पर्श स्वरामुळे या रागाचा वेगळा माहोल बनतो.
देवधर यांचे शिष्य पंडित
कुमार गंधर्व गुरुंची “येरी पिया बिन मोहे चैन नाही आये” ही झपतालातील बंदिश
गाताना लयीच्या बोल अलापातून चंद्रकंस चा व्रात्यपणा ,खेळकरपणा व अल्लडपणा दाखवून
मैफलीत रसरसलेपण आणत.
एकेकाळी सोलो
ताब्लावादानासाठी लेहरा हा चंद्रकंस मधलाच हवा असा बहुतेक दंडक असायचा.
चंद्रकंस म्हटले की मित्र दिवाकर बुरसे याच्या कवितेची आठवण येते. आज चंद्रकंस ची आठवण आली आणि एका निरोपावर दिवाकरने त्याची कविता व पार्श्वभूमी पाठवली.
अश्विन शुद्ध पौर्णिमेचे ते पूर्णाकार, काहीसे केशरी रंगाचे शशिबिंब नारळीच्या आडून डोकावताना पाहिले की अंतःकरणात वीणा छेडली जाते.प्रियेच्या धुंदिल सहवासाच्या स्मृती पुनःपुन्हा उजळून उठतात. उचंबळून वर येतात. कुंजात, वाटिकेत ठाई ठाई स्मृतींचे काजवे चमचमतात.
सरोवरात विहरताना दिसतो एकटाच राजहंस
चंद्रतुषार पिऊन कोण गातोय हा धुंद 'चंद्रकंस'?
राग चंद्रकंस
चंद्रकंस हा कोण गातसे पिउनी चंद्रतुषार
आठवणींच्या प्राजक्ताला आला धुंद बहार।।धृ।।
अशीच होती रात्र बावरी
नभात होता चंद्र बिलोरी
तू, मी दोघे सागरतीरी
प्रेमा अपुल्या केवळ होता चंद्रच साक्षीदार!
आठवणींच्या प्राजक्ताला आला धुंद बहार।।१।।
चंदेरी या रेतीवरती
कर माझा तव कटीभोवती
मनात अपुल्या फुलली होती-
असंख्य स्वप्ने, ज्यांना आपण केले गे साकार
आठवणींच्या प्राजक्ताला आला धुंद बहार।।२।।
मंत्रघोष घुमविला सागरे
बिंब इंदुचे जळीं थरारे
विसरुन आपण जग हे सारे
काया, वाचा, मने जाहलो एकच, पूर्णाकार!
आठवणींच्या प्राजक्ताला आला धुंद बहार।।३।।
कातळ हा तो, हीच नारळी
मुग्ध अशी तू, अशिच लाजली
आवेगाने घेता जवळी
मेघांमागे अलगद दडला त्याच क्षणी शशि पार!
आठवणींच्या प्राजक्ताला आला धुंद बहार।।४।।
टीपः- १९७८ आँगस्ट मधे "टेल्को कलासागर"ने कोजागिरीच्या निमित्ताने संगिताचा एक आगळा वेगळा विशेष मराठी कार्यक्रम सादर करण्याचा निर्णय घेतला. त्यात मराठी भावगीते,नाट्यगीते, चित्रपटगीते, लोकगीते, शास्त्रीय संगीत इ. चा समावेष होता. कार्यक्रमाचे शीर्षक ठरले "घे पिउनि चंद्रतुषार". सूत्रसंचलन मी स्वतः आणि रमेश भाटकर यांनी केले होते. या कार्यक्रमाला एक आपले वेगळे शीर्षकगीत असावे असा विचार पुढे आला. हे दायित्व मी स्वीकारून केलेले हे वरील गीत आहे. याला संगीत दिले होते श्री सुहास वाळुंजकर यांनी.
दिवाकर बुरसे, पुणे
याच कवितेचा मुखडा १९८० मध्ये सादर झालेल्या मालविकाग्निमित्रम या नाटकातील राग्मालीकेच्या प्रवेशात नृत्याविश्कारासह पेश केला होता आणि त्याला उत्कृष्ट प्रकाश योजनेमुळे आकर्षकता लाभली होती ती आज ही स्मरणात आहे.
याच कवितेचा मुखडा १९८० मध्ये सादर झालेल्या मालविकाग्निमित्रम या नाटकातील राग्मालीकेच्या प्रवेशात नृत्याविश्कारासह पेश केला होता आणि त्याला उत्कृष्ट प्रकाश योजनेमुळे आकर्षकता लाभली होती ती आज ही स्मरणात आहे.
१९८० मध्ये एका मैफलीत
(रात्री २ नन्तर) पंडित शिवकुमार शर्मा यांनी तुडुंब असा चंद्रकंस वाजवला होता.
त्यांना साथ होती उस्ताद झाकीर हुसेन यांची. सुमारे साडे तीन वाजता चंद्रकंस संपला
पण श्रोते दिल मांगे और या मूड मध्ये होते. तेव्हा पंडितजी या तर जुळवायला बराच
वेळ लागेल. पण श्रोते स्तब्ध बसून होते .मग पावणे चार वाजता पंडितजींनी पहाडी धुन
ऐकवली व ४ वाजता मैफलीची समाप्ती केली.
अशा या चंद्रकंस च्या मधुर आठवणी.
अनिल जोशी
२८.०४.२०२०
कृपया आपली प्रतिक्रिया नावासह द्यावी.
फारच सुंदर.👌
ReplyDelete