अथांग तो सागर, मउशार वाळूचा किनारा
आपल्या पृथ्वीचा फक्त १/४ भाग हा जमीन असून ३/४ भाग हा पाणी आहे आणि अर्थातच तो समुद्र आहे. आणि आपल्या देशाच्या तिन्ही दिशांना समुद्रच आहे. त्यामुळे समुद्र हा आपल्याला जवळचा वाटणे स्वाभाविक आहे.
समुद्र म्हणजे विशालता, गंभीरता, अव्याहत पण याव्हे प्रतीक. समुद्राच्या नुसत्या दर्शनाने आपण त्याच्या भव्यतेत विरघळून जातो. मूळ गाव हे कोकणातील असले तरी वास्तव्य त्याच्या बाहेर आणि बरेचसे पुण्यात असल्याने हा सखा रोज भेटणारा नाही . पण जेव्हा जेव्हा त्याच्या सान्निध्यात जायची संधी मिळते तेव्हा मात्र ती घेतोच. समुद्राची पहिली झालेली मुलाखत ही फारशी सुखद नाही. लहानपणी कोकणात बोटीने जाताना भाऊच्या धक्क्यावरून जेव्हा बोट हळू हळू किनार्यापासून दूर समुद्रात जायची तेव्हा त्याच्या त्या दर्शनाने धडकी भरायची. शिवाय ते उन्हाळ्याचे दिवस असल्याने समुद्र खवळलेला असायचा , बोट हलायची आणि अनेकांना त्याचा त्रास, उलट्या व्हायच्या. शिवाय गर्दी, घामाचा चिकचिकाट याने प्रवास नकोसा व्हायचा . पण जसजशी उन्हे उतरायला लागायची तसतशी हवा खेळू लागायची आणि मग तो प्रवास सुखद व्हायचा.
पण समुद्रात एक छोटीशी राईड इतपतच त्याच्या जवळ जावे. बाकी त्याची भव्यता किनार्यावरून अनुभवावी. फार तर किनार्याजवळ डुंबत लाटांचा आनंद घ्यायचा. समुद्रात उभे राहून पायाखालून वाळू सरत जाण्याचा अनुभव घ्यावा. तांबडे लाल सूर्यबिंब त्या दुसर्या क्षितिजावरून अस्ताला जाताना डोळे भरून पाहावे. त्यात आपले अस्तित्व विरघळत जाण्याचा अन्हुभव घ्यावा. अगदी नि:शब्द होवून.
या किनार्यावरून हा समुद्र आपल्याशी खूप जवळून संवाद साधतो. स्वातंत्र्यवीर सावरकर जेव्हा परदेशात व्याकूळ झाले तेव्ह्या त्यांनी समुद्रकिनार्यावरून ती अजरामर कविता -
ने मजसी ने परत मातृभूमीला , सागरा प्राण तळमळला .
अशीच काहीशी भावना ज्येष्ठ कादंबरीकार श्री ना पेंडसे हे परदेशात असताना व्याकूळ झाले तेव्हा त्यांनी -पेसिफिच्च्या पुळणीवरून या मुक्त चिंतनात्मक लेखात व्यक्त केली आहे. ( कोकणात समुद्र किनार्याला पुळण ) म्हणतात.
लेखक गंगाधर गाडगीळ हे तसे नास्तिक पण जेव्हा ते कन्याकुमारीला गेले तेव्हा त्या समुद्र किनार्यावर उभे राहिल्यावर त्यांना असे जाणवले की सगळा देश आपल्या पाठीशी आहे. मग भावूक होवून ते वळले आणि साष्टांग नमस्कार घालून या भूमीला वंदन केले.
पण या समुद्राशी मैत्री करताना त्याचे मूड (म्हणजे भारती ओहोटी), त्या ठिकाणची खोली (depth) याचे भान ठेवावे लागते अन्यथा त्याच्याशी खेळ धोकादायक ठरू शकतो.
मला जेव्हा केव्हा समुद्रकिनारी जायचो तेव्हा समुद्रात डुंबायला आवडायचे. (पोहता येत नसून) असेच एकदा आंम्ही काही मित्र मुरुडला गेलो होतो. सकाळ भर समुद्राकाठी हिंडत होतो. मग दुपारी मी आणि कर्वे नावाचा माझा मित्र दोघांनी ठरवले की आपण समुद्रात जायचे. ओहोटी असल्याने फक्त गुडघाभर पाण्यात गेलो. लाटा येत होत्या. पण एखादी तरी लाट डोक्यावरून गेल्याशिवाय चिंब भिजण्याची गम्मत नाही म्हणून आम्ही आणखी थोडे आत गेलो. आणि अचानक अनपेक्षितपणे खूपच मोठी लाट आली जी आमच्या डोक्यावर सधारण तीन-चार फुट उंच असावी . कारण ती डोक्यावरून गेली पण इतक्या वरून की आमचे पाय पण वर आले व आम्ही गटांगळ्या खावू लागलो. पायाखालून जमीन सरकण्याचा अनुभव आला. काळजाचा ठोका चुकण्याचा अनुभव त्या काही क्षणात आला. अर्थात हा काही क्षणांचा पण जीवघेणा खेळ होता. जसे पाय जमिनीला लागले तेव्हा आम्ही दोघांनी हात धरले व धावत किनार्यावर परत आलो. तेव्हापासून मात्र कधी डोक्यावरून समुद्राची लाट जाण्यासाठी समुद्रात उतरलो नाही.
पण समुद्र हा माझा सखा मात्र कायमचा राहणार. त्याच्या दर्शनासाठी मन आसुसणार. मग तो मुंबईचा गेटवेचा , जुहूचा, चौपाटीचा, महलक्ष्मी मंदिराच्या मागचा असो. आमच्या गावाजवळचा आरे वारे येथील किनारा असो, गोव्यातील , दक्षिण कर्नाटक मधील विस्तीर्ण असे किनारे, कन्याकुमारीचे किनारे, चेन्नई येथील गोल्डन बीच, कोणार्क येथील सूर्यमंदिर आणि तेथील किनारा, हे सारे निरखून पाहण्याचे भाग्य मला लाभले आहे.
त्यामुळे हा समुद्र्साखा जिवाभावाचा आहे आणि राहणार.
अनिल जोशी
११.०४.२०२०
कृपया आपली प्रतिक्रिया आपल्या नावासह द्यावी.
अप्रतिम
ReplyDeleteधनश्री जोशी