बुजगावणे शेत राखते
आपले सुविद्य माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे सध्या एकदम प्रकाशात येवू पाहत आहेत. आधी देवस्थानांचे सोने ताब्यात घेण्याची सूचना केली आणि ती अंगाशी येते दिसताच बाजपेयी यांच्या काळात अ. से घडले होते असे सांगून सारवासारव करायचा त्यांनी प्रयत्न केला. हे असू शकते. आणि १९९१ च्या काळात जेव्हा क्रूड तेलाच्या किमती भडकल्या व आपली परकीय चलनाची गंगाजळी रिकामी झाली तेव्हा जागतिक बँकेकडे आपले सोने गहाण ठेवावे लागले होते. पण सध्याच्या आर्थिक स्थितीत हा प्रस्ताव अनावश्यक होता हे या सुविद्य माजी मुख्यमंत्र्यांच्या लक्षात येत नाही एवढेच.
पण नंतरची त्यांची वक्तव्ये पहिली की लक्षात येते की त्यांनी या विषयाने सुरुवात केली पण खरी जखम वेगळीच आहे. त्यांनी उघड उघड कोरोना स्थिती हाताळण्यास राजकीय नेतृत्वाचा अभाव दिसतो अशा शब्दात मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे. याचा परामर्श घेणे जरुरीचे आहे.
उद्धव ठाकरे यांचे नेतृत्व हे राजकीय नाही व त्यांना प्रशासनिक अनुभव नाही हे गुपित केव्हाच नव्हते आणि नाही. मग महाविकास आघाडी सरकार बनवतांना त्यांनी हा मुद्दा का उपस्थित केला नाही. त्याची प्रमुख करणे अशी संभवतात.
१) त्या वेळी फडणवीस यांना रोखणे हे पहिले प्राधान्य होते.
२) शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार असेल तरच हे शक्य होणार होते.
३) त्या मुळे मा. शरद पवार यांनी आग्रह धरला की उद्धव यांनी मुख्यमंत्री व्हावे.
या तिन्ही प्रधान्यांना महत्व मिळून आघाडी सरकार अस्तित्वात आले. आता हे सरकार चालविणे हा प्राधान्यक्रम असायला हवा होता. सरकार झाले. जी सत्ता मिळाली आहे तिचा सुयोग्य वापर करण्ण्याला प्राधान्य देणे आवश्यक होते. पण आजवरचा कॉंग्रेस पक्षाचा इतिहास सांगतो की एखाद्या सरकारला कुबड्या हा पक्ष पुरवतो पण ते सरकार नीट चालणार नाही याची काळजी हा पक्ष नेहेमी घेतो कारण त्यांना हे सिद्ध करायचे असते की सत्ता फक्त आणि फक्त कॉंग्रेस पक्षच राबवू शकतो. पण हा इतिहास झाला. हा पक्ष अजून सरंजामशाही पद्धतीनेच चालवला जातो व जनाधार असलेल्या नेत्यांना महत्व दिले जात नाही. आपली सद्दी संपली हे अजून या दुद्धाचार्यांच्या लक्षात येत नाही. त्यामुळे भाजप ला रोखण्यासाठी कुमारस्वामी ना पाठींबा. त्याने झाले काय कुमार स्वामी पण गेले आणि मध्यप्रदेशात कमलनाथ पण गेले. म्हणजे संधी मिळून सत्ता टिकवता येतेच अशी स्थिती आता राहिलेली नाही.
१९९५ मध्ये सेना भाजप युतीने कॉंग्रेस ला सत्ताभ्रष्ट केले आणि पुढे राष्ट्रवादी ने वेगळी चूल मांडली तेव्हापासून महाराष्ट्रात कॉंग्रेस आपली ओळख हरवून बसला. आज ही देशात कॉंग्रेस ला मानणारा एक मोठा वर्ग आहे पण त्याचे मतांमध्ये परावर्तन करण्यात नेतृत्व कमी पडते आहे .
२०१९ च्या निवडणुकीत कॉंग्रेस पक्षाची राष्ट्रवादी सोबत युती होती आणि शरद पवार यांनी जो जोर लावला त्यामुळे कॉंग्रेस पक्षाला बरे यश मिळाले. अर्थात २०१४ मध्ये आघाडी तुटली तरी ठराविक जागा हा पक्ष जिंकतोच हे पण दिसले आहे.
आता थोडे पृथ्वीराज बाबा यांच्या बाबतीत. एखाद्या नेत्याचे कर्तृत्व हे जरी त्याचे असले तरी एक घराण्याची पार्श्वभूमी असतेच. काय आहे या घराण्याची पार्श्वभूमी? त्यांचे वडिल आनंदराव शिंदे हे कराड मधून लोकसभेवर निवडून येत. त्यांची नेहरू गांधी घराण्याशी चांगले संबंध होते. आणि महाराष्ट्राचे कर्तृत्वान नेते यशवंतराव चव्हाण यांना विरोध हे त्यांचे भांडवल. त्यांच्या निधनानंतर त्याच्या पत्नी प्रेमलाकाकी बरीच वर्षे खासदारकी सांभाळून होत्या. पुढे त्यांना विरोध वाढू लागल्यावर पृथ्वीराज बाबा राजकारणात आले पण पुढे कराड मतदारसंघ बराचसा सातारा मतदारसंघाला जोडला गेला तेव्हा बाबा राज्यसभेवर गेले. अनेक मंत्रालयात त्यांनी कम केले व ठसा उमटवला. पुढे अशोकराव चव्हाण यांना मुख्यमंत्री पद सोडावे लागले तेव्हा बाबा मुख्यमंत्री झाले. सध्या ते या महाविकास आघाडी सरकारमध्ये आमदार आहेत.
हे सरकार करतांना कॉंग्रेस काय किंवा राष्ट्रवादी काय यांना या निमित्ताने शिवसेना बदनाम होणे आवश्यक वाटले. त्यामुळे त्यांनी उद्धव ठाकरे नावाचे बुजगावणे उभे केले. पण खरा शेतकरी हा शेतात बुजगावणे उभे करतो ते पिकाचे व शेताचे रक्षण करायला. त्यावर पाखरे किती शिटली हे पाहत मजा नाही घेत. इतर परिस्थितीत कदाचित हे क्षम्य असू शकेल पण अशी जागतिक समस्या उभी राहिली असताना व सगळा महाराष्ट्र त्यात होरपळत असताना यांनी अशी मजा बघणे कितपत योग्य आहे? मुख्यमंत्री अननुभवी आहेत मग तुमच्या अनुभवाचा काय फायदा? अशी माध्यमांमध्ये चर्चा करण्यापेक्षा सरकारला मदत करावी ना?
कारण हे अपयश आले तर ते फक्त मुख्यमंत्र्यांचे नसेल तर ते आघाडी सरकारचे आणि सगळ्या महाराष्ट्राचे असेल याचे भान असायला हवे. मग याला कॉंग्रेस पक्ष पण जबाबदार असेल हे या नेत्यांच्या लक्षात यायला हवे.
अशा परिस्थितीत एक म्हण अशी पण होऊ शकते-
बुजगावणे शेत राखते आणि कुंपण शेत खाते. आता कुंपण कोण हे सांगायची वेगळी गरज नाही.आणि या पक्षाने उभी केेलेली बरीच बुुुुजगाावणी आपण पाहिलीी आहेत.
अनिल जोशी.
१८.०५.२०२०
कृपया आपली प्रतिक्रिया आपल्या नावासह द्यावी.
Comments
Post a Comment