निवेदनातील करामती
निवेदनातील करामती -अनिल जोशी
आज मालती पांडे यांची जुनी भावगीते ऐकत होतो.
लपविलास तू हिरवा चाफा , या कातरवेळी पाहिजेस तू जवळी, त्या तिथे पलीकडे अशी काही. यातील काही ओळी विशेषत्वाने आठवल्या.
गवत उंच दाट दाट वळत जात पायवाट
वळत जात पायवाट
वळणावर आंब्याचे झाड एक वाकडे
माझिया प्रियेचे झोपडे.
याच ओळी आठवण्याचे कारण म्हणजे आम्ही कलासागर तर्फे दर कोजागिरीला विशेष मराठी कार्यक्रम करायचो. म्हणजे तो उपक्रम अजूनही चालू आहे फक्त मी त्यात नाही. कारण माजी झालो. तर बर्याच वेळी त्याचे निवेदन मी लिहित असे. जर निवेदन स्वत: करायचे असेल तर त्याची रूपरेषा लिहून ते आयत्यावेळी करता येते. पण आपण दुसर्या निवेदकासाठी निवेदन लिहायचे असेल तर ते तपशीलवार व सगळे लिहावे लागते. बरे कार्यक्रम पूर्ण आखलेला असेल तर त्या निवेदनात सुसूत्रता येते.. पण बर्याच वेळा गाण्यांची यादी हाती येत असे व त्यांचा क्रम पण ठरलेला नसायचा अशावेळी निवेदन लिहिणे ही कसरत असायची. बरे एकदा लिहिले व मग बदलले असे करायला वेळ पण नसायचा.
अशा वेळी माझी एक पद्धत मी ठरवली होती. यादी आली की लगेच त्या रात्री कार्यक्रमाची तालीम पाहायला जायचे. म्हणजे त्या कार्यक्रमात आपली involvment होते. मग त्या गायकाची /गायिकेची लकब, हालचाली अशा अनेक बाबी पाहून लिहिण्यासाठी काही सुचून जात.
मंतरलेल्या चैत्रबनात या कार्यक्रमात सुधीर गाडगीळ यांचे निवेदन पाहिलेले /ऐकले होये. तसेच भाऊ मराठे, अजेश दामले यांची पण निवेदने पाहिलेली होती. पण निवेदन हे दोन गाणी जोडणारा दुवा इतपत असावे असे माझे मत असल्याने ते लहान असे. म्हणजे एक गाणे झाल्यानंतर एक कलाकार जावून दुसरा कलाकार येणे व त्याच्या साठी काही वाद्ये बदलणे , तो सेट होणे एवढ्या वेळेत किंवा फार तर आणखी एखादे मिनिट इतकेच.मग त्यात गाण्याबद्दल , ते काय्लेल्या कलाकारांबद्दल , त्या गाण्याबाबत काही किस्से घडले असतील तर त्या बद्दल लिहायचे. आता धुंद मधुमती या गाण्याबद्दल लिहिताना त्याचे संगीतकार मास्टर कृष्णराव यांची पार्श्वभूमी सांगितली कारण जेव्हा पहिल्यांदा सिनेमा आले तेव्हा त्यांच्यावर रंगभूमीचा पगडा होता. आणि मास्टर कृष्णराव तर शास्त्रीय कायक होते या दृष्टीने विचार केला की त्या गाण्यातील संगीताचे सौंदर्य उठून दिसे. पण गाणे नवीन असेल तर त्याला पूर्वेतिहास नसल्याने काय लिहायचं असा प्रश्न असायचा.
सुरुवातीला उल्लेख केलेले गाणे जेव्हा सादर होणार होते त्याहे शब्द सौष्ठव अधोरेखित करण्यासाठी मग त्याच गाण्यातील ओळी निवेदनासाठी वापरल्या.एखादे गाणे निवेदन लिहिण्यासाठी फारच त्रास देत असेल तर त्या वेळी कलाकारांची ओळख करून देण्याचा पर्याय निवडून वेळ मारून नेत असू. यात आणखी गम्मत म्हणजे एखाद्या गाण्याला वन्स मोअर मिळाला तर निवेदकाला प्रसंगावधान आखून वेळ साजरी करावी लागत असे.
एकदा असाच कार्यक्रम होता. आम्ही संध्याकाळी कार्यक्रमाला जायला निघणार तर अचानक कधी न येणारे पाहुणे आले आणि कार्यक्रमाला जाणे रद्द करावे लागले. दुसर्या दिवशी जेव्हा ऑफिस मध्ये आलो तेव्हा कार्यक्रमाचा रिपोर्ट जाणून घ्यायला उत्सुक होतो पण अनेकांनी कार्यक्रम चांगला झाला व निवेदन पण चांगले झाल्याचे सांगितले आणि जीव भांड्यात पडला.
अशा कार्यक्रमाचा भाग होण्यात निर्मितेचा जो आनंद मिळत असे त्याला तोड नाही. अगदी गाण्यांच्या निवडीपासून प्रत्यक्ष कार्यक्रम होईपर्यंत छान माहोल तयार होत असे व तो सगळा काळ मंतरलेला असायचा.
सध्या कार्यक्रमाची निवेदने ऐकली आणि पाहिली की हे आवर्जून वाटतं की ह्यात निवेदन कमी आणि वेदनाच जास्त आहेत. काही निवेदकांना तर बहुधा असं वाटतं की कार्यक्रम त्यांच्या निवेदनाचा आहे आणि साथीला गायक- वादक आहेत !
ReplyDeleteपरंतु असेही सूत्रसंचालक आहेत की केवळ ते आहेत म्हणून मंडळी मूळ कार्यक्रमाला येतात. भाऊ मराठे हे एक उत्तम उदाहरण. मंगला गोडबोले, मंजिरी धामणकर हीही इतर काही नावं. अनुप जलोटा पण स्वतःच्या गाण्याच्या कार्यक्रमात स्वयंनिवेदनाने खूप लज्जत आणतात.
बाकी, कलासागरच्या कार्यक्रमांमधल्या निवेदनाचा दर्जा उच्च होता व आहे ही.