एका कादंबरीची डायरी
परवा एक प्रकाशक भेटला. बोलता बोलता म्हणाला तुम्ही एक झकास कादंबरी लिहा . आपण कमीतकमी ५ तरी आवृत्त्या काढूच. जबरदस्त मार्केटिंग करू. त्यावर पिक्चर काढू , डेली सोप साठी पण प्रयत्न करू. आपल्या दोघांची जिंदगी बनून गेली पाहिजे. ही चर्चा फक्त चहावर झाल्याने मी ती उडवून लावली नाही. पण हवेत पण नाही उडायला लागलो. एका आठवड्याने पुन्हा त्याचा फोन आला मग मात्र मी गंभीर पणे विचार करायला लागलो. तशा माझ्या दोन कादंबर्या प्रकाशित झालेल्या असल्याने थोडा आत्मविश्वास होताच. एखादा कथेचा प्लॉट निश्चित करायचा आणि लिहायला सुरुवात करायची. पुढे आपोआप कादंबरीचा प्रवास सुरु होतो. पण चार पाच दिवस उलटले तरी कथानकाचा प्लॉट तयार होत नव्हता. कारण कथानक असे पाहिजे की ज्याला रिपीट वाचक मिळाला पाहिजे. त्यात एखादा चित्रपट तयार होईल असे नाट्य हवे. शिवाय अनेक रोचक प्रसंगांची मालिका हवी जेणेकरून त्यावर मालिका करणे सोपे जाईल. आणि तसे कथानक काही सुचत नव्हते. शिवाय त्यावर बराच विचार करता येईल इतका वेळ पण नव्हता . जास्तीत जास्त दिवसाकाठी एखादा तास काढता येणार होता. मग त्यावर एक तोडगा काढला. दिवसाकाठी जेवढा विचार होई...