यमन - ये मन है
यमन रागाला रागांचा राजा म्हटले जाते . बरेच गुरुजन आपल्या शिष्यांकडून यमन घोटून घेतात. कारण त्यांचा असा विश्वास असतो की एकदा गळ्यावर यमन चढला की मग कोणताही राग त्या गळ्यातून गायला जावू शकतो. बाकी यमन बाबत काही लिहिण्यापूर्वी यमन बाबत एक गोष्ट द्यायचा मोह होतो आहे. एकदा एक गुरुजी रागाचे सूर आळवत बसले होते . तेव्हा त्यांच्या शिष्याने त्यांना विचारले की ये कौनसा राग है? यावर गुरुजी उत्तरले - "बेटा , ये मन है " यमन रागाविषयी एवढ यथार्थ वर्णन अजून तरी कुठे सापडले नाही. यमन म्हणजे मनच. मनात भाव भावनांचे कल्लोळ उठतात. मनाचा ठाव कुणास लागलाय? मन मनास उमगत नाही हेच खर.
यमन हा कल्याण थाटातून थेट येणारा राग आहे. यमन हा कल्याण म्हणून पुरातन काळापासून अस्तित्वात आहे.यमन च्या व्युत्पात्तीबाबत बरेच वाद व मत-मतांतरे आहेत. पण यमनचे स्वर आणि वादी संवादी स्वर याबाबत फारसे वाद नाहीत. यमन हा संपूर्ण राग आहे .गांधार - निषाद हे याचे वाडी संवादी स्वर असले तरी तसे सर्वच सूर महत्वाचे आहेत. त्यामुळे कलाकाराला सर्वच सुरांना गोंजारावे लागते. एका ठिकाणी याचे फार छान वर्णन सापडले.
त्रिपुरी पौर्णिमेच्या रात्री गंगेच्या प्रवाहात सोडलेले मंद तरंगत जाणारे दिवे दिसावेत , तसे यमनचे सूर वाटतात. मोठ्या भावाने धाकट्या भावाची समजूत घालावी तसे इथे गांधार व मध्यम यांचे नाटे आहे. यमन म्हणजे शुद्ध स्वरांचा सरळपणे जाणारा भव्य राजमार्गच. पण या मार्गाला वेगवेगळ्या सुरांच्या , कधी गंधार अगर निषादावर विसावणार्या कितीतरी सुंदर छोट्या छोट्या पावूलवाटा येवून मिळतात. यमन मध्ये सर्व सूर असल्याने कलाकाराच्या कल्पकतेला आणि प्रतिभेला स्वातंत्र्य मिळत. स्वरांचे अमर्याद आकृतिबंध होवू शकतात. यमन मध्ये तीव्र मध्यम आहे तर यमन कायन मध्ये कोमल आणि तीव्र असे दोन्ही मध्यम आहेत.
यमन आणि यमन कल्याण या दोन रागांनी अनेक संगीतकारांना इतकी भुरळ घातली आहे की त्यावर आधारित अनेक मराठी व हिंदी गाणी लोकप्रिय झाली आहेत. भावगीते, भक्तिगीते, नाट्यगीते, अभंग, चित्रपट गीते, भजने , अगदी ठुमरी दादरा सुद्धा. मेहदी हसन यांची विख्यात गजल रंजीशी सही म्हणजे यमनच.
आणि एवढ असून ही अजून ही नवीन संगीतकार यमाचा अविष्कार दाखवणार नाहीतच असे नाही. यमन हा न आटणारा स्वरांचा झरा आहे.
यमनची वेळ पण संध्याकाळ आणि रात्र याच्या मधली . मारवा , पुरिया यांची हुरहूर लावणारी संध्याकाळ उलटल्यानंतर ची ही वेळ. आपल्या मराठी घरांमध्ये याला दिवे लागणीची वेळ म्हणतात .म्हणजे देवासमोर दिवा लावून शुभम करोती म्हणायची ही वेळ . पण ही वेळ पुढे सरकते. त्यामुळे भक्ती रसाबरोबर प्रणय व शृंगार यासाठी पण यमनची सुरावट छेडली जाते. रस भाव कोणताही असला तरी यमन हा मन प्रसन्न करणारा राग आहे. एखाद्या चित्रपटाची सुरुवात एखाद्या यमन मधील भजनाने झाली किंवा नाटकाची नांदी किंवा सुरुवातीचे पद हे यमन रागातील असेल तर पुढे तो चित्रपट किंवा नाटक हमखास रंगतेच. ही वेळ मैफिलीची असल्याने जर सुरुवात यमन , यमन कल्याण किंवा शुद्ध कल्याण ने झाली तर ओपनिंग ला येवून सचिन ने शतक ठोकावे व सामना जिंकून द्यावा तशी कलाकार रसिकांना तुडुंब स्वरानुभव देवून मैफल खिशात टाकतात.
अखेर एक आठवण बेगम अख्तर यांच्या "कोयलिया मत कर पुकार" या दादर्याची. यातील यमनची पुकार तन-मनाला घायाळ करणारी आहे. "भर भर आवत है नैन" असं म्हणणारी आणि प्रियकर येत नाही म्हणून जोगीण बनून संसाराचा त्याग करणारी ती विरहिणी. यमन आणि अख्तरी बाईंचा अवकाश व्यापून राहणारा , आर्ततेचा स्पर्श असणारा तो स्वर. "करेजवा लागे कटार "असा अनुभव देण्याच सामर्थ्य असणारा हा यमन ...
किती शोध घेतला तरी तो अपूर्ण राहणारा पण अपूर्णतेतच विलक्षण आनंद देणारा यमन. शास्त्रीय संगीताने रसिकांना दिलेला एक बहुमुल्य अलंकार म्हणजे यमन.
(साभार संदर्भ : नादवेध -अच्युत गोडबोले व सुलभा पिशवीकर )
अनिल जोशी
२5.०४.२०२०
(कृपया आपली प्रतिक्रिया आपल्या नावासह द्यावी)
Aprtim
ReplyDelete