साहेब-असे आणि तसेही

Image result for cartoon boss is always right

साहेब या शब्दातच एक दरारा व रुबाब असतो आणि अगदी लहानपणापासून हे पाहत आलो आहे. माझे वडील हे सरकारी नोकरीत होते व त्यांचा मुद्दा होता डेप्युटी सुपरिंटेंडंट त्या मुळे प्रत्येक ठिकाणी एक सुपरिंटेंडंट म्हणजे साहेब असायचे. त्याना सगळे वचकून असायचे, शिपाई सॅल्यूट करायचे.त्याना रहायला मोठा बंगला असायचा. पण एक साहेब असे आले की त्यांना चार मुले होती. मोठा मुलगा मोठा होता पण दोन नंबरचा मुलगा माझ्या बरोबरचा होता. आणखी एक लहान बहीण व भाऊ.त्या मुळे तेथील अन्य मुले मिळून छान ग्रुप जमला. आमची शाळा एक मैल लांब होती पण साहेबांच्या मुळे सर्व मुलांना शाळेत जायला व यायला सरकारी बैलगाडीची सोय झाली. त्यांचा रुबाब व दरारा कायम ठेवून पण घरात मुक्त प्रवेश मिळाला. त्यांच्याबरोबर वडिलांचे छान सूर जुळले होते. पण सरकारी नोकरीत एक बदली सगळे बदलून टाकते.
वडिलांच्या पुढच्या नोकरीत पण नंतर अनेक साहेब भेटले पण माझे वय वाढत गेले आणि मग साहेबांशी जरा जवळीक वाढू लागली. अनेक वेळा त्यांचे मार्गदर्शन मिळे. वेगवेगळी व्यक्तिमत्वे व त्यांच्या आठवणी मनात साठत होत्या आणि आता प्रत्यक्ष स्वत:चे साहेब आयुष्यात आले. बव्हंशी सर्व साहेबांशी संबंध चांगले राहिले. कधी कधी अवखळ वयात काही सल्ले न पटल्याने वाद झाले पण नंतर सुरळीत झाले . तरी पण काही साहेबांच्या गमती जमती मात्र विसरता येत नाहीत.
कोणत्याही साहेबाना आपला वाचक बसवायला काही युक्त्या कराव्या लागतात. एक साहेब नवीन रुजू झाले. त्यांचे एक सहाय्यक व्यवस्थापक तसे टेरर म्हणून प्रसिद्ध होते आणि आधीच्या साहेबांशी त्यांचे संबंध चांगले असल्याने ते त्यांच्या केबिन मध्ये कधीपण जात असत. त्या सवयीने ते नवीन साहेबांच्या केबिन मध्ये घुसत असताना साहेब जोरात बोलले-" माझ्या केबिन मध्ये येण्यापूर्वी दरवाजावर टक टक करून येत जा".
बाहेर काही लोकांनी हे ऐकले व ही बातमी सर्वत्र पसरली. नवीन साहेबांचा दरारा सुरु झाला. पुढे त्यांना प्रमोशन मिळाले व आणखी दोन व्यवस्थापक त्यांच्या हाताखाली आले. त्यातील एक असेच टेरर होते. त्यांच्या एरियाट हे गेले व सर्वांसमोर त्यांचा जबरदस्त पाणउतारा केला. हे ऐकून दुसरे व्यवस्थापक त्यांना न भेटताच राजीनामा देवून मोकळे झाले.
एक साहेब असे होते की सर्वांशी मिळून मिसळून वागायचे. कुणी सही साठी कागद नेला तर लगेच सही करायचे. पण सध्याच्या युगात ज्यांना गुड फॉर नथिंग म्हणतात तसे. सर्व कामे , निर्णय हाताखालील लोकांवर सोपवून मोकळे व्हायचे. समजा कुणी हमरी तुमरीवर येवून वाद घालू लागले की समजावून सांगायचे आपापसात भांडून कुणाचे भले होत नाही. एकदा एक दुसर्या विभागातील अधिकारी त्यांना भेटायला आले. व काही समस्या सांगू लागले. यांना त्यात काही स्वारस्य वाटत नव्हत मग ते म्हणाले -ओके . यु कंटिन्यू.
आता मीटिंग मध्ये मीटिंग सोडून जाताना असे म्हटले तर चालते. मीटिंग चालू राहते. पण हे त्या एकट्या व्यक्तीला आत ठेवून स्वत: बाहेर निघून गेले. नंतर ते अधिकारी येवून त्यांच्या स्वीय सहाय्यकाला म्हणाले मी एकटा काय बडबडत बसू? त्या स्वीय सहाय्यकाने हा किस्सा सर्वत्र पसरवला.
काही साहेबांचा असा ठाम विश्वास असतो की आरडा ओरडा , शिवीगाळ, या द्वारे सगळ्यांवर वचक ठेवता येतो . पण पाठीमागे सगळे हसतात व टिंगल करतात. काही साहेब मोजक्या शब्दात पण परिणामकारक बोलतात. कदाचित सुरुवातीला त्यांना कुणी जुमानत नाही पण हे साहेब पुढे यशवी होतात.
आपल्या खात्याचा आवाका , आणि आपली उद्दिष्टे याबाबत स्पष्टता असणे आजच्या काळाची गरज आहे. काही लोकांना हाताशी धरून इतरांना खेळवण्याच्या पद्धती आता बाद झाल्या आहेत.
आता महत्वाचे म्हणजे आपण साहेबांच्या किती जवळ जायचे याचे तारतम्य बाळगणे गरजेचे आहे. ते आपले साहेब आहेत हे मनात स्पष्ट ठेवून संबंध प्रथापित करणे महत्वाचे. एखाद्या मुद्द्यावर ते तुमच्याशी खूप जवळ आले तरी इतर वेळी तसे होईलच असे नाही.
एकदा एका साहेबांकडे एका प्रकल्पासाठी रात्री त्यांच्या घरी जायचा प्रसंग आला. ती मीटिंग अतिशय सौहार्दपूर्ण वातावरणात पर पडली . आता गम्मत अशी होती की त्यांचे जे कार्यकारी अधिकारी होते ते या वेळी हजार नव्हते. आमचे जे ठरले होते व एकूण प्रगती या बाबत ते अनभिद्न्य होते. सकाळी साहेबांनी त्या अधिकार्याला या बद्दल माहिती विचारली. त्यांना काही माहीत नाही म्हटल्यावर त्यांना फैलावर घेतले. झाले . त्यांनी आम्हाला बोलवून विचारायला सुरुवात केली. आम्ही त्यांना सांगितले तर ते म्हणाळे- अरे या साठी सकाळपासून माझी हजामत चालू आहे. तेव्हा आम्ही त्यांना सांगितले अहो हे सर्व साहेबाना काळ रात्रीच सांगितले होते. तेव्हा त्यांच्या लक्षात आले की साहेबांनी आपली जबरदस्त फिरकी घेतली आहे.  यांचाच आणखी एक किस्सा म्हणजे एक अधिकारी त्यांच्या अगदी निकटचे होते. आणि त्याच्या खात्यात काही तरी गडबड झाली होती. साहेबांनी यांना फैलावर घेतले. आता काही माहित नसल्याने मुकाट्याने ऐकून घ्यायचे शहाणपण त्यांच्याकडे होते. त्यांनी ऐकून घेतले . साहेब शांत झाल्यावर त्यांनी विचारले- " साहेब काय झाले? "
"आता तुमच्या खात्यातील भानगडी तुम्ही माझ्याकडून जाणून घेणार काय? ताबडतोब निघा आणि काय ते शोधून मला भेटा.
असे कितीतरी किस्से सांगता येतील. एकदा आमच्या एका मित्राला प्रमोशन मिळून तो साहेब झाला म्हणून आम्ही त्याच्या केबिन मध्ये गेलो होतो. त्याने आपल्या खुर्ची मागे एक पोस्टर लावले होते. एका खुर्चीवर सूट घालून साहेबाच्या वेशात एक माकड बसलेले असते. त्यावर लिहिले होते -

BOSS IS ALWAYS RIGHT.असे कितीतरी किस्से सांगता येतील. एकदा आमच्या एका मित्राला प्रमोशन मिळून तो साहेब झाला म्हणून आम्ही त्याच्या केबिन मध्ये गेलो होतो. त्याने आपल्या खुर्ची मागे एक पोस्टर लावले होते. एका खुर्चीवर सूट घालून साहेबाच्या वेशात एक माकड बसलेले असते. त्यावर लिहिले होते -
BOSS IS ALWAYS RIGHT.

अनिल जोशी 
२७.०४.२०२० 
कृपया आपली प्रतिक्रिया नावासह द्यावी.


Comments

Post a Comment

Popular posts from this blog

स्पेशल नात्याचे गाव - देवरुख

डोळे हे जुलमी गडे

राग मधुवंती