टाळ्या आणि दाद

कुणालाही आपल्या प्रस्तुतीला टाळ्या व दाद मिळाली तर आनंद होतो. नाही म्हटल तरी मूठभर मांस चढतच. एकदा प्रसिद्ध लेखक व पत्रकार वि स वाळिंबे यांच्याकडे बसलो असताना काही लोक त्याच्याकडे आले व आपला परिचय देवू लागले तेव्हा ते म्हणाले - अहो तुम्ही माझा सत्कार केला होता. तेव्हा वाळिंबे यांचे नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या वरील पुस्तक प्रसिद्ध झाले होते. आणि बोलताना ते  पुढे अस म्हणाले होते आपला झालेला सन्मान आणि अपमान कुणी विसरत नसत. अतिशय कठोर वास्तव ते एका वाक्यात बोलून गेले. आता हे सगळ आठवायचं कारण म्हणजे परवा यंदाच्या सवाई गंधर्व समारोहात पंडित जसराज यांच्या गाण्याबद्दल बोलणे चालू होते. यंदा मी गेलो नव्हतो पण आधीच एक प्रतिक्रिया ऐकली होती की गाणे अतिशय बेकार झाले. दुसरी प्रतिक्रिया अशीच होती. त्यांनी आपल्या गाण्यातून आजवर जो आनंद रसिकांना दिला आहे तो स्मरून लोकांनी ते गाणे सहन केले. दोन वर्षांपूर्वी मी गेलो होतो त्या वर्षी पण त्यांचा सगळा विलंबित खयाल हा आवाज लागण्यात खर्ची पडला व मग पुढे गाणे झाले. त्या आधी पण एक वर्ष ते आले व गावू शकत नसल्याने त्यांची मुलखात व शिष्यांचे गाणे असा पर्याय काढला गेला होता.
पंडित जसराज यांचे गाणे म्हणजे सवाई गंधर्व संमेलनाची शान असायचे. अगदी चुकवू नये असे. सगळ वातावरण भारून जाणारे. पण अखेर वय आहे , शरीर थकते. आवाज साथ देत नाही . हा कलाकाराचा दोष नाही म्हणता येणार. पण एखादा कलाविष्कार सादर करण्यासाठी शरीर सक्षम असायलाच हवे. यासाठी मी संयोजकांना जास्त दोष देईन. आज जर पंडित जसराज नसले तर महोत्सव होणार नाही असे नसते. अखेरची काही वर्षे प्रकृतीची साथ नसल्याने पंडित भीमसेन जोशी पण महोत्सवात हजेरी लावून जायचे पण गात नसत. एका वर्षी अजय पोहनकर यांचे गाणे सुरु होते. आणि मधल्या काळात उद्घोषणा झाली की या नंतर पंडित भीमसेन जोशी गाणार आहेत. .आता खरे तर पंडितजींचे गाणे महोत्सवात नसण्याची श्रोत्यांना सवय झाली होती. पण हा आश्चर्याचा धक्का होता. प्रकृती ठीक नसताना पण पंडितजी आले व म्हणाले मागच्या वर्षी शब्द दिला म्हणून गायला आलोय. शुद्ध सारंग गायले. पण त्यांच्या पेक्षा मागचे शिष्यच त्यांचे  गाणे पुढे नेत होते. एकूण त्यांचे गाणे हे नेहेमीच्या गाण्याच्या तुलनेत १०% पण नव्हते पण श्रोते फक्त ते गायला आले यावर खुश होते.
बालगंधर्व यांनी पण अगदी उतार वयात तरुण नायिकांच्या भूमिका केल्या . माझ्या वडिलांनी त्यांच्या एकच प्याला या नाटकाच्या प्रयोगाची आठवण सांगितली. स्टेजवर सिंधू मरून पडली असून चौकशी चालू आहे असा प्रसंग होता आणि त्या वेळी बालगंधर्वांना जोरात खोकल्याची उबळ आली. बालगंधर्व म्हणून प्रेक्षकांनी ते सहन केल. बर्याच वेळा बालगंधर्वांना गाण्यासाठी उचलून आणत असत आणि तेव्हा ते असे म्हणत पण की देवा आता हे होत नाही. पण लोकांच्या आग्रहाला ते मान देत असत.
इथे प्रेक्षकांनी / श्रोत्यांनी व संयोजकांनी कलाकारांच्या वार्धक्याचे प्रदर्शन टाळावे. उतार वयात कलाकारांना आपल्या चाहत्यांना भेटावे, त्यांची दाद घ्यावी असे नक्की वाटत असेल. आणि त्यांचे ते टोनिक पण असते. तरी हे प्रदर्शन ओंगळवाणे होण्यापूर्वी थांबलेले बरे.
जेव्हा आपल्या प्रयोगात तेचतेच पण येते असे जाणवले तेव्हा पु ल बटाट्याची चाळ करायचे थांबले. किंबहुना साठी नंतर सर्वजनिक कार्यक्रमात जाणे पण  खूप मर्यदित केले.
आणि डॉ काशिनाथ घाणेकर या चित्रपटात घाणेकरांच्या तोंडी एक वाक्य आहे . ते म्हणतात जर मला सुरुवातीलाच अशी दाद मिळाली नसती तर मी जास्त चांगला कलाकार व माणूस झालो असतो . या दाद व टाळ्यांचे मला व्यसनच लागले.
दाद आणि टाळ्या हे प्रोत्साहन ठरावे , व्यसन नको.

अनिल जोशी 
१२.०१.२०२० 

(कृपया आपल्या प्रतिक्रिया नावानिशी द्याव्यात)

Comments

  1. अगदी बरोबर, दाद आणि टाळ्या हव्यात पण प्रोत्साहन पुरत्या, डोक्यात जायला नव्हेत. अशांनाच मग रसिक डोक्यावर घेतात. सुधांशु

    ReplyDelete
  2. आठवणी जागवणारा लेख..

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

स्पेशल नात्याचे गाव - देवरुख

डोळे हे जुलमी गडे

राग मधुवंती