संक्रमण याने बदल

परवा बोलता बोलता एका मित्राने किस्सा सांगितला. एका प्रशिक्षण कार्यक्रमात विचारले गेले -
कुणा कुणाला बदल घडावा असे वाटते?
सर्वांनीच हात वर केले. म्हणजे बदल सर्वांना हवा होता.
मग दुसरा प्रश्न शब्द फिरवून विचारला-
कोण कोण बदलायला (बदल घडवून आणायला) तयार आहेत?
यावर सगळे चूप झाले. कुणीच बदलायला तयार नव्हते. एक कठोर वास्तव की बदल सगळ्यांनाच हवा असतो पण बदलायला कुणीच तयार नसते. काय अवघड आहे बदलण्यात?
बदल हा निसर्गाचा, प्रकृतीचा स्थायीभाव आहे. रोज उगवणारा दिवस हा वेगळा असतो. सूर्य,चंद्र यांच्या उगवण्याच्या व मावळण्याच्या वेळा वेगख्या असतात. आकाशातील ग्रह तारे चांदण्या यांची स्थाने बदललेली असतात किंवा पृथ्वीचा अंश बदलल्याने ते तसे भासत असते पण बदल असतोच. झाडावरच्या कळ्यांची फुले झालेली असतात . कच्ची फळे पिकतात. झाडावरची जीर्ण पाने गाळून पडतात. नवी पालवी फुटते
असं असताना मग आपणच का आपल्याला बंधनात जखडून ठेवायचं ? का घाबरतो आपण बदलला सामोरे जायला? सहसा कुणाला आपलं चालू असलेले आयुष्य बदलायला नको असते किंबहुना ती सहज प्रवृत्ती असते. आपण आपल्या कोशात रममाण झालेले असतो. तरीपण आपण कधीतरी सोय म्हणून का होईना राहते घर बदलतो. तोच तोच पण नको म्हणून असलेले कपडे बदलून बदलून घालतो.चार दिवस उलटले की नेहेमीच्या जेवणात बदल हवा असतो. काही महिने उलटून गेल्यावर नेहेमीच्या रुटीन बाहेर पडून आपण सहलीला जातो. जुनी झाली म्हणून गाडी , फ्रीझ, वॉशिंग मशीन ,फर्निचर बदलतो. घराचा रंग बदलतो.कधी कधी घराची रचना बदलतो. म्हणजे हे असले बाह्य बदल आपण आपल्या नकळत करत असतोच. हल्ली नोकरी सुद्धा पटापट बदलतात. जर बदलीची नोकरी असेल तर गाव बदलतो.त्यामुळे मुलांच्या शाळा बदलतात.

पूर्वी माणसे अन्न, पाणी, सुरक्षा यासाठी स्थलांतर करायची. त्यामुळे बदलानेच मानवी संस्कृती विकसित होत गेली.म्हणजे हे बाह्य बदल आपण परिस्थितीने का होईना स्वीकारत गेलो पण आपली मानसिकता मात्र बदल न स्वीकारण्याकडे राहिली. आहे त्या स्थितीत राहणे आपल्याला प्रिय वाटते. अशीच एक गोष्ट आठवली. एकदा एका आश्रमात एक साधू महाराज आपल्या शिष्यांना सांगतात की माझा अंतकाळ जवळ आला आहे आणि काही कारणाने मला मोक्षप्राप्ती पूर्वी डुकराचा जन्म मिळणार आहे . मला तास जन्म मिळाला की मी तुम्हाला कुठे जन्म घेतला याचा दृष्टांत देईन. मग तुम्ही माझा आत्मा असलेल्या त्या डुकराला मारून टाका म्हणजे मग मला मोक्ष मिळेल. कालांतराने साधू महाजाचें निधन होते . काही दिवसांनी शिष्यांना दृष्टांत होतो की त्यांच्या आश्रमाबाहेरच्या उकिरड्यावर एक डुकरीण व्यायली आहे तिच्या एका पिल्लात मी जन्म घेतला आहे. मग शिष्य तिथे जातात व त्या पिल्लांमधील एक गोंडस पिलू उचलतात. त्याच्या मानेवर सुरी फिरवणार एवढ्यात साधू महाराज म्हणतात अरे नका मारू.

मला इथे बरं वाटतंय. मी खुश आहे. मला बरं वाटतंय आणि मी खुश आहे ही आपली स्थितीवादाची लक्षणे आहेत.त्यामुळे बदल स्वीकारणे हेच प्रगतीचे लक्षण आहे . बदल स्वीकारणे म्हणजे प्रवाहाविरुद्ध पोहणे आहे .त्यात धाडस आहे,धोका पण आहे तरीही वाट प्रगतीची आहे. मग आपल्याला जर ट्राफिक मध्ये अडकायला नको असेल तर वाहतुकीचे नियम पाळायला हवेत. स्वच्छता हवी तर आपण पण घाण करायची नाही हे स्वतः:ला शिकवावे लागेल. आधी केले मग सांगितले तर सांगण्याचा परिणाम होऊ शकतो. इथे पण एक गोष्ट सांगायचं मोह होतो. एकदा एक स्त्री साधू महाराजांकडे मुलाची तक्रार घेऊन आली की हा मुलगा गूळ फार खातो. साधू महाराज सांगतात की पंधरा दिवसांनी या. पंधरा दिवसांनी साधू महाराज त्या मुलाला सांगतात की बाळा, गूळ खाऊ नये. हे ऐकून ती स्त्री म्हणते हे तुम्ही पंधरा दिवसांपूर्वी सांगू शकला असता. तेव्हा साधू महाराज म्हणाले तेव्हा मीच फार गूळ खात होतो. पंधरा दिवसात मी गूळ खाणे बंद केले तेव्हा आता मी उपदेश करू शकतो.हे सगळं मनात आलं की प्रशिक्षणात कोण बदलायला तयार आहे या प्रश्नावर कुणी हात का वर केले नाहीत?
बदलणं खरंच एवढं अवघड आहे ? तर खरंच ते अवघड नाही. आपली मानसिकता तशी असल्याने ते अवघड वाटत. आणि आपली मानसिकता तशीच राहिली की आपण म्हणतो तो स्वभाव आहे, बदलणार नाही. किंवा स्वभावाला औषध नाही. पण अनुभवाने आपण उत्क्रांत होत जर सतत आत्म परीक्षण करत राहिलो तर बदल ही सातत्याने घडणारी प्रक्रिया होईल आणि आपण अधिक प्रगल्भ होऊन प्रगतीकडे वाटचाल करत राहू.
मकर संक्रांती निमित्त नुसत तीळगूळ घ्या म्हणतांना जाणवलेला संक्रमणाचा अर्थ.

अनिल जोशी
१५.०१.२०२०
(कृपया आपल्या प्रतिक्रिया नावानिशी द्याव्यात.)

Comments

  1. बदल हा अपरिहार्य आहे.
    आपण किंवा आपली पिढी सर्वात जास्त बदलांना सामोरे गेलेली आहे आणि अजूनही जातच आहे.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

स्पेशल नात्याचे गाव - देवरुख

डोळे हे जुलमी गडे

राग मधुवंती