हवा हवासा हिवाळा

पाऊस संपता संपता एखाद्या सकाळी सर्वत्र धुके पसरलेले दिसते आणि आपण म्हणतो संपला आता पावसाळा
आणि तिथेच चाहूल लागते हिवाळ्याची. साधारण ऑक्टोबर संपता संपता ही चाहूल लागते. त्याच सुमारास
दिवाळी असली की पहाटेच्या अभ्यंग स्नानाची मजा काही औरच. साधारण ऑक्टोबरच्या शेवटच्या
आठवड्यापासून सुरु होणार हिवाळा फेब्रुवारी च्या पहिल्या पंध्रवड्यापर्यंत टिकतो. प्रत्येक ऋतूची एक खासियत असते तशी हिवाळ्याची एक खासियत आहे. आपल्यासारख्या उष्ण कटिबंधात राहणार्यांना हिवाळ्याचे अप्रूप जे शीत कटिबंधात उन्हाळ्याचे व सूर्यप्रकाशाचे असते. आम्हा शहराच्या गर्दीत राहणाऱ्यांना अंगावरचे पांघरुण पुरेनासे झाले की समजायचे की हिवाळा सुरु झाला. दुसरी पण लक्षणे आहेत म्हणजे पाणी गरम होण्यासाठी गिझर जास्त वेळ घेतो. खोबरेल गोठते इ. मग स्वेटर , शाली , हातमोजे बाहेर निघतात.

हिवाळ्याचे निसर्गात होणारे बदल शहरातून फारसे जाणवत नाहीत पण रंगी बेरंगी स्वेटर, कानटोप्या,शाली दिसू लागल्या हिवाळा आला हे नक्की. स्वेटर , शाली यांचा महोत्सव पूर्वी जेव्हा सवाई गंधर्व महोत्सव रात्री असे तेव्हा पाहायला मिळायचा. आता महोत्सव पण रात्री नसतो आणि थंडी पण दुर्मिळ झाली. यंदा आता संपेल मग संपेल करत पावसाळा लांबतच गेला. पाऊस जास्त झाला म्हणूत वाटत होतं यंदा कडाक्याची थंडी पडणार पण जानेवारीच्या मध्याला थोडी थंडी जाणवायला लागली. एकूण ऋतुचक्र बदलले आहे हे खरे. जरी उशीरा सुरु झाली तरी थंडी ती थंडीच.

लहानपणी आम्ही जेव्हा खेड्यात राहत होतो तेव्हा आठवडी बाजारात या मौसमात पेरू, बोरे,ऊस, भुईमूग शेंगा
यांची रेलचेल असायची. हुरडा पार्टी आणि ती पण शेतावर म्हणजे उत्सव असायचा. कणसे भाजायला पेटवलेली खास शेकोटी. शेकोटी पेटवून त्या भोवती रांगणारे गप्पाष्टक औरच. बाहे थंडी असली तरी जठराग्नी मात्र फुललेला असतो या दिवसात. अशावेळी आठवतं मग खास गाणं -
कोल्हापूरचा म्हातारा शेकोटीला आला.
खास कोरस मध्ये गायचं गाणं.आमची आई हिवाळ्यात दगडी कोळसा घालून मोठी शेगडी पेटवायची व त्यावर मंद विस्तवावर दूध तापायला ठवलेले असे . आम्ही भावंडे व वडील त्या भोवती शेकत शेकत थंडीचा प्रतिकार करत असू. विसापूरच्या असताना गरम पाणी तापवायला चूल होती. ती पेटलेली  असताना तिच्या जवळ पण शेकत बसायचो.जेव्हा सवाई गंधर्व महोत्सव रेणुका स्वरूप मध्ये असायचा तेव्हा लांब एका कोपऱ्यात एक शेकोटी पेटवलेली असायची तेव्हा चहा २५ पैसे होता तर शेकोटीचा दार ६० पैसे होता. एकदा राजगडावर मुक्कामाला गेलो असता देवीच्या देवळात अनेक लोक झोपले असताना काही लोकांनी थंडी सहन न होऊन शेकोटी पेटवली व तिचा धूर पसरल्याने इतरांना त्रास होऊ लागला . ज्यांनी शेकोटी पेटवली त्यांच्याजवळ काही पांघरुण नव्हते म्हणून त्यांनी शेकोटी पेटवली होती. आणि सकाळी तेथील पाणी इतके गार होते की तोंड धुणे अशक्य होते. मग उन्हे वर आल्यावर चूल पेटवून स्वयंपाक करून जेवलो ती मजा वेगळीच होती.

कॉलेज मध्ये असताना पण दिवाळीची सुटी व नाताळची सुटी याच्या मध्ये धमाल असायची. स्पोर्ट्स, गॅदरिंग,
सहली अशी. कारण नाताळची सुटी झाली की प्रिलिम परीक्षा असायची आणि मग अभ्यासाचे वातावरण म्हणून त्या आधी सगळी धमाल. खेड्यांमध्ये पण या दिवसात गावोगावी जत्रा भरतात. पिके हातात आल्याने हा सुगीचा काळ असतो. याच सुमारास लगीन सराई सुरू होते. ती पण एक गडबड. पण हा मौसम पुढे उन्हाळ्यात पण सुरु राहतो.

युरोपात मात्र हिवाळा म्हणजे संकट असतो. अर्थात तीच स्थिती इथे हिमालयात म्हणजे काश्मीर, हिमाचल,
उत्तराखंड इथे पण असते. हिवाळ्याने रशियाचे संरक्षण पण केले आहे. जगज्जेता नेपोलियन व हिटलर दोघांना रशियाच्या हिवाळ्याचा अंदाज न आल्याने रशियावरील मोहिमा सोडून द्याव्या लागल्या होत्या. तरी पण याच हिवाळ्यात तिथे नाताळ साजरा होतोच.या सणाच्या मोठ्या सुटीमुळे तेथील भारतीय भरतात येतात व आप्तेष्टांचे मेळावे होतात.

असा हा हिवाळा . कुणीतरी म्हटलं आहे रोगी पावसाळा, त्यागी उन्हाळा आणि भोगी हिवाळा. निसर्गात पण
पानगळ सुरु होते . जीर्ण पाने गाळून पडतात कारण नवीन पालवी फुटण्यासाठी पानगळ आवश्यक असतेच .
आपण पण मनाची मरगळ त्यागून नवीन आशा आकांक्षा पूर्ण करण्यास सिद्ध होण्यासाठी या हव्या हव्याशा
वाटणाऱ्या हिवाळ्याचा उपभोग घेऊया.

अनिल जोशी
(आपल्या प्रतिक्रिया कृपया नावासह द्याव्यात )

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

स्पेशल नात्याचे गाव - देवरुख

डोळे हे जुलमी गडे

राग मधुवंती