शिवसेनेचा इतिहास आणि चारित्र्य
शिवसेनेचा इतिहास आणि चारित्र्य
विधानसभा निवडणुकीनंतर तब्बल एक महिना व ४ दिवसांनी महाराष्ट्राला तीन पक्षांच्या आघाडीचे सरकार (व्हाया राष्ट्रपती राजवट व २८ तासांचे एक तात्पुरते सरकार )मिळाले व त्यानंतर मंत्री मंडळाचा विस्तार व शपथ विधी होवून पुन्हा एक महिना व चार दिवसांनी खाते वाटप व्हायचा अंदाज आहे.यात शिवसेना प्रमुखांची मुख्यमंत्री होण्याची इच्छा पूर्ण झाली हा महत्वाचा मुद्दा. त्या निमित्ताने सेनेचा इतिहास व चारित्र्य याचा घेतलेला आढावा.गेला महिना दीड महिना महाराष्ट्रात राजकीय रंगमंचावर जे काही नाट्य चालू होते त्याने भल्या भल्या विचारवंतांची व विश्लेषकांची भंबेरी उडवलेली आपण पहिली. आज ही या सर्व घटना क्रमाचा सगळा अंदाज आला असे कुणी ठामपणे म्हणू शकत नाही . अजून काही काही प्रश्नांची उत्तरे गुलदस्त्यात आहेत. अर्थात मीडियावर सगळे जण आपापल्या आकलनानुसार व विचारसरणी नुसार निष्कर्ष काढून मोकळे झाले आहेत हा भाग अलाहिदा. या सर्व घाटनाक्रमाचा नीट अंदाज येण्यासाठी काही गोष्टींचा भूतकाळात जाऊन वेध घेणे जरुरीचे आहे.
या सगळ्या घटनाक्रमात एक घटना केंद्रस्थानी आहे ती म्हणजे भाजप शिवसेना यांची युती असताना पण शिवसेनेने मुख्यामंत्रीपदासाठी भाजपची साथ सोडून काँग्रेस राष्ट्रवादीला जवळ केले. यासाठी ही युती का व कशी झाली आणि या प्रदीर्घ कालखंडात तिने कसे वळण घेतले हे पाहणे महत्वाचे आहे.
शिवसेनेची सुरुवात झाली दक्षिणात्यांना विरोध करण्याने. मार्मिक या साप्ताहिकात वेगवेगळ्या आस्थापनांमध्ये काम करणाऱ्या अधिकाऱ्यांची नवे प्रसिद्ध व्हायची आणि त्यानं प्रामुख्याने दाक्षिणात्य नवे असायची. १९६९ मध्ये मुंबईत दंगल उसळली ( ती का व कशी हे आठवत नाही) पण ती शिवसेना पुरस्कृत होती आणि त्यात अनेक उडुपी हॉटेलची नासधूस करण्यात आले. दादरचे विसावा हे हॉटेल जाळून खाक करण्यात आले .बाळ ठाकरे (तेव्हा ते बाळासाहेब झाले नव्हते ) यांना अटक करून डोंगरी येथील तुरुंगात ठेवण्यात आले आणि त्यांनी शिवसैनिकांना शांतता राखण्याचे (दंगल थांबवण्याचे ) आवाहन केले ते
पोलिसांनी आपल्या वाहनावरून वाजवून दाखवले आणि दंगल शमली. ही दंगल म्हणजे शिवसेनेचे वर्चस्व सिद्ध करण्याचा मैलाचा दगड ठरली. त्याच सुमारास किंवा थोडे आधी शिवसेनेने प्रथमच ठाणे नगरपालिका निवडणूक लढवली आणि जिंकली. त्या मुळे १९६९ मध्ये शिवसेनेने मुंबई महापालिका निवडणूक लढवून लक्षणीय यश मिळवले व शिवसेनेचे डॉ हेमचंद्र गुप्ते महापौर झाले.
त्या आधी १९६७ च्या सार्वत्रिक निवडणुकीत शिवसेना सहभागी झाली नव्हती पण मार्मिक च्या माध्यमातून त्यांनी आचार्य अत्रे व कृष्ण मेनन यांच्या विरोधात प्रचार केला व तिथे काँग्रेसचे आर डी भंडारे व स गो बर्वे निवडून आले. अन्यथा त्यावेळी मुंबईत काँग्रेस विरोधी वातावरण होते त्यात स का पाटील यांना पडून जॉर्ज फर्नांडिस व श्रीपाद अमृत डांगे हे विजयी झाले होते गिरणगावातील परळ मधील कम्युनिस्ट आमदार कृष्ण देसाई यांची हत्या झाली आणि तिथे झालेल्या पोट निवडणुकीत शिवसेनेचे वामनराव महाडिक कृष्णा देसाई यांच्या पत्नीचा पराभव करून विजयी झाले. त्यांना जनसंघाने पाठिंबा दिला होता तर श्रीमती देसाई यांना काँग्रेसने पाठिंबा दिला होता. अशा तऱ्हेने शिवसेनेचा विधानसभेत प्रवेश झाला.
वामनराव महाडिक यांचा सत्कार करायला एक सभा डोंबिवलीत झाली होती त्यावेळी बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते की डोंबिवलीत जनसंघाचे वर्चस्व आहे पण हे दोन्ही भगवे परस्पर विरोधात लढणार नाहीत. अर्थात तसे झाले नाही. पुढे १९७१ साली शिवसेनेने आपले उमेदवार उभे केले तर ईशान्य मुंबईत जनसंघाच्या उमेदवाराच्या विरोधात जनरल करिअप्पा यांना उभे केले.१९७२ च्या विधानसभा निवडणुकीत वामनराव महाडिक पराभूत झाले तर गिरगावातून प्रमोद नवलकर निवडून आले व शिवसेनेची १ ही आमदार संख्या कायम राहिली. पुढे ठाकरे यांचे राजकारण काँग्रेस धार्जिणे राहिले. सरकारी नोकरांच्या संपात त्यांनी सरकारची बाजू घेतली व संप बारगळला. तर आर डी भंडारे बिहारचे राज्यपाल झाल्याने झालेल्या पोट निवडणुकीत त्यांनी काँग्रेस उमेदवार रामराव आदिक यांना पाठिंबा दिला त्या मुले कम्युनिस्ट रोझा देशपांडे जनसंघाचे वसंतकुमार पंडित यांचा थोडक्या मताधिक्याने पराभव करून निवडून आल्या. आणीबाणीत पण त्यांनी काँग्रेस सोबत राहणेच पसंत केले.पुढे जनता लाटेत काँग्रेस बरोबर राहिल्याने शिवसेना निष्प्रभ राहिली. १९७८ मध्ये विधानसभेत शिवसेनेचा एकही आमदार निवडून आला नाही (बहुतेक कुणी उभे नव्हते).१९८० नंतर ठाकरे व अंतुले यांचे संबंध सौहार्दपूर्ण होते.मध्यंतरीच्या काळात जनता पार्टी कडे असलेली मुंबई महापालिका परत शिवसेनेने ताब्यात घेतली. १९८४ मध्ये इंदिरा गांधी यांच्या हत्ये नंतर झालेल्या निवडणुकीत शिवसेना काँग्रेस पासून दुरावली व त्यांनी प्रथमच भाजपशी समझोता केला. पण एकूणच सर्व
विरोधकांची धूळधाण उडाल्याने त्यातून काही निष्पन्न झाले नाही.
नंतर या सर्व वाटचालीला कलाटणी देणारी घटना म्हणजे विधानसभेची एक पोटनिवडणूक शिवसेनेने हिंदुत्वाच्या मुद्द्यावर लढवली व जिंकली (डॉ रमेश प्रभू) .१९८५ मध्ये भाजप पुलोद मध्ये गेल्याने सेनेपासून दुरावला पण छगन भुजबळ आमदार झाले.
पुढे राजीव गांधी यांच्या काळात भाजप अस्तित्वासाठी मुद्दा शोधत होता. भाजपचे नेतृत्व लालकृष्ण अडवाणी यांच्याकडे आले होते. राजीव गांधी यांनी शाहबानो प्रकरणात कच खाल्ली व अयोध्येतील राम मंदिराचे दरवाजे उघडले तेव्हा अडवाणी यांना हा (हिंदुत्व) मुद्दा परिणामकारक ठरेल याचा अंदाज आला होता. त्यामुळे प्रमोद महाजन यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्याशी संपर्क वाढवला आणि महाराष्ट्रापुरती बहूप शिवसेना युती झाली. अर्थात कोणतीही कल्पना रुजायला यश मिळणे महत्वाचे असते.आणि १९८९ मध्ये युतीने तब्बल १४ लोकसभेच्या जागा जिंकल्या, शिवसेनेचे ४ खासदार लोकसभेत गेले आणि शिवसेनेला प्रादेशिक पक्ष म्हणून मान्यता मिळाली. १९९० च्या विधानसभेत युतीला सत्ता नाही तरी लक्षणीय यश मिळाले व अधिक संख्या
सल्याने मनोहर जोशी विरोधी पक्ष नेते झाले. पण पुणे छगन भुजबळ १२ आमदारांसह काँग्रेसवासी झाल्याने विरोधी पक्ष नेते गोपीनाथ मुंडे झाले.
विरोधी पक्षनेते होताच त्या संधीचा योग्य फायदा उठवत मुंडे व बाळासाहेबी ठाकरे यांनी महाराष्ट्र पिंजून काढला आणि १९९५ मध्ये शरद पवार यांच्याकडून सत्ता हिसकावून घेतली. नंतर २००० मध्ये सत्ता गेली पण अधिक संख्या असल्याने सेनेचे नारायण राणे विरोधी पक्ष नेते झाले. पुढे ते काँग्रेस मध्ये गेले आणि शिवसेनेच्या मोठा भाऊ या पडला गैरहं लागले . तेव्हापासून कमी जागा लढवून पण भाजप मोठा भाऊ राहिला पण सेनेला ते पचले नव्हते. त्यामुळे २०१४ मध्ये सेनेने लवचिकता न दाखवल्याने
युती तुटली आणि वेगळे लढून भाजपने आपले स्थान बळकट केले व सत्ता स्थापन करून नंतर सेनेला जुजबी पदे देऊन सत्तेत घेतले. आणि या घटनेत २०१९ च्या घटनेची बीजे रोवली गेली. २०१९ लोकसभेत परत युती करून सेनेने आपली खासदार संख्या कायम ठेवली आणि युती करून ते मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली निवडणुकीला सामोरे गेले. युती झाल्याने अनेक ठिकाणी उघड तर काही ठिकाणी छुपी बंडखोरी झाली आणि अपेक्षित यश नाही मिळाले पण युतीला बहुमत होते.युतीला बहुमत होते तरी सेनेला डावलून भाजपचे सरकार बनत नव्हते मग मुख्यमंत्री पदासाठी सेना हटून बसली. पुढे काय काय झाले हे आपण जाणतोच.
हा सगळा घटनाक्रम पहिला की मला दाजी पणशीकर यांच्या महाभारत एक सूडाचा प्रवास या
पुस्तकाची आठवण येते. त्यांनी या पुस्तकात अंकेकच्या सूडातून महाभारत घडत गेले असे विश्लेषण केले आहे. सुरुवात सत्यवतीने पराशराचा सूड घेण्यासाठी भीष्माला प्रतिज्ञेत बांधून घेतले . पुढे भीष्माचा सूड राजकन्या आंबा हिने शिखंडी होऊन घेतला. मयसभेत झालेल्या फजितीला द्रौपदी हसली तिचा सूड म्हणून भर सभेत तिचे वस्त्रहरण झाले तर त्या अपमानाचा सूड भीमाने दु:शासनाची मांडी फोडून घेतला. अशी अनेक उदाहरणे आहेत.
लहान भाऊ म्हणून सेनेने सदैव केलेला अपमान भाजपने वेळोवेळी सहन केला पण संधी मिळताच त्याचा बदला घेतला. या अपमानाचा बदला सेनेने काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर जाऊन मुख्यमंत्रीपद घेऊन घेतला. पण १९९५ मध्ये हे दोन पक्ष एकत्र आले व त्यामुळे आपली सत्ता गेली या अपमानाचा बदला शरद
पवार यांनी या दोन्ही पक्षांना वेगळे करून घेतला.
या सगळ्या सरळसोट घटनाक्रमात एक ट्विस्ट आहे आणि त्याचा सस्पेन्स अजून कायम आहे.तो म्हणजे आघाडी तर्फे उद्धव यांचे नाव जवळपास निश्चित झाल्यावर अजित पवार फडणवीस यांना भेटून पाठिंबा
देतात , रातोरात हालचाली होऊन राष्ट्रपती राजवट उठते आणि फडणवीस मुख्यमंत्री आणि अजित दादा उपमुख्यामंत्री म्हणून शपथ घेतात आणि तीन दिवसांनी पवार राजीनामा देतात आणि फडणवीस पण. त्यावेळी फडणवीस उद्धव ठाकरेंवर तोंडसुख घेतात पण पवार यांच्या बाबत काही बोलत नाहीत. तसेच पवार पण काही बोलत नाहीत. त्यांचे एकाच उत्तर- योग्य वेळी बोलू. आता ही योग्य वेळ कधी येणार हे ते दोघेच
जाणोत.याचा अर्थ अजून कुणालाही समजलेला नाही आणि या सगळ्या घटनाक्रमातील ही महत्वाची घटना व तिचा सस्पेन्स मात्र अनाकलनीय आहे.
राजकारणात काही होऊ शकते पण एक निश्चित आता शिवसेना व भाजप एकत्र येणे अवघड. आता आघाडीचे सरकार अडखळतच चालणार कारण ते स्थिरावणे राष्ट्रवादी आणि काँग्रेस दोघांना परवडणारे नाही.
आणि मध्यावधी निवडणूक झाली तर सहानुभूती भाजप कडे राहील म्हणून त्या लवकर होऊ नयेत म्हणून काँग्रेस राष्ट्रवादी प्रयत्न करणार. त्यामुळे उद्धव हे दिखाऊ मुख्यमंत्री राहतील व कारभार काँग्रेस राष्ट्रवादी करतील असे दिसते. म्हणून उद्धवना काँग्रेस , राष्ट्रवादी व केंद्रातील भाजप सरकार यांच्याशी सामना करावा लागेल आणि त्यातून त्यांचे प्रवक्ते राऊत काय काय घोळ घालून ठेवतील ते वेगळेच.
आणखी एक बाब म्हणजे जो शेतकऱ्यांबद्दल एवढा कळवळा होता तो सत्ता स्थापन झाल्यावर एकदम गायब झालेला दिसतोय.उद्धवना शिवशाही अवतरल्याचा आनंद दिसतोय तर शरद पवार यांना चाणक्य म्हणून त्यांचे कौतुक करण्यात मीडिया मश्गुल आहे.
अरुण साधू यांच्या सिंहासन कादंबरीत म्हटल्याप्रमाणे सामान्य जनांचा जीवन संघर्ष तसाच सुरु आहे त्यात काही बदल नाही.
फक्त त्या वेळी सोशल मीडिया नव्हता आता तिथे मात्र चर्चा जोरजोरात सुरु आहे.शिवसेनेच्या वाटचालीतील महत्वाचे टप्पे
* मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी स्थापना.
* दक्षिणात्यांना विरोध.
*आधी ठाणे नगरपालिका आणि मग मुंबई महापालिका ताब्यात.
* १९६९ दंगलीच्या निमित्ताने दहशत निर्माण करण्यात यश.
* १९७० मध्ये पोट निवडणुकीतून विधानसभेत प्रवेश.
* सरकारी नोकर संप , आणीबाणी यावेळी काँग्रेस सोबत.
*हिंदुत्वाच्या मुद्द्यावर पार्ले विधानसभा निवडणूक जिंकली.
*हिंदुत्वाचा उघड पुरस्कार.*१९८९ मध्ये भाजपशी युती करून ४ खासदार लोकसभेत व पुढे विधान सभेत लक्षणीय यश.
*बाबरी मशीद नंतर उसळलेल्या दंगलीत हिंदूंना संरक्षण.
*१९९५ युतीच्या माध्यमातून महाराष्ट्रात सत्ता हस्तगत.
*२०१४ विधानसभा युती मोडल्याने स्वबळावर लढून ६३ जागी विजय.
* २०१९ विधानसभा युती तर्फे लढवून काँग्रेस राष्ट्रवादीशी हात मिळवणी करून मुख्यामंत्रीपद.
या सत्तेच्या सूडाच्या प्रवासात जनता राजकारण्यांचा सूड कधी घेते याची प्रतीक्षा आहे.
अनिल जोशी
२ जानेवारी २०२०.
( कृपया आपली प्रतिक्रिया नावासकट द्यावी.)
फारच छान, अभ्यासपूर्ण
ReplyDeleteखूपच छान
ReplyDelete