कविता साद घालते

कविता नुसती वाचून चालत नाही. ती  भावायला लागते. तिने वाचकाच्या मनाची तार छेडायला हवी. थोडे तरी भाव विश्वात डोकवायला हवे. नाहीतर गद्य उतारे आणि कविता यात फरक तो काय? कविता आपल्यावर प्रसन्न व्हावी म्हणून कवी तिला साद घालतो. कवितेला किंवा ती जिच्यामुळे स्फुरते त्या प्रतिभेला. ती कधी , कशी आणि कुठे भेटेल , साद देईल ते सांगता येत नाही. कवी अनिल याच अवस्थेवर लिहितात-
आज अचानक गाठ पडे
भलत्या वेळी भलत्या मेळी
असता मन भलतीच कडे
ते असे ही लिहून जातात -
नयन वळविता , सहज कुठेतरी
एका एकी तूच पुढे
आज अचानक गाठ पडे.
दचकूनी जागत जीव निजेतच
क्षणभर अंतर्पट उघडे
गूढ खूण तव कळून नाकळून
भांबावून मागे मुरडे
निसटुनी जाई संधीचा क्षण
सदा असा संकोच नडे
अनिल असे व्यक्त होतात तर व्याकुळ होऊन सुधीर मोघे लिहितात
सखी मंद झाल्या तारका आता तरी येशील का येशील का?
मधुरात्र मंथर देखणी
आली तशी गेली सुनी
हा प्रहर अंतिम राहिला
त्या अर्थ तू देशील का
हृदयात आहे प्रीत अन
ओठात आहे गीत ही
तू प्रेमगाणे छेडणारा
सूर तू होशील का
जे जे हवे ते जीवनी
ते सर्व आहे लाभले
तरीही उरे काही उणे
तू पूर्तता होशील का
या दोन्ही कविता अतिशय आर्त साद प्रतिभेला घालतात. त्यातील प्रतिमा सुद्धा किती तरल वापरल्या आहेत. ती आर्तता, व्यथा, कविता वाचताना भिडते . कवी अनिल यांनी तर जेव्हा ही कविता व अजुनी रुसूनी आहे लिहिली तेव्हा सांगून ठेवलं होतं की याचं गाण केलं तर ते फक्त कुमार गंधर्वच करतील आणि ते जेव्हा कुमार गायले  तेव्हा कवीची अनुभूती कैक पटींनी रसिकांना भावली.तसेच सुधीर मोघे यांची कविता राम फाटक यांच्या हातात आली तेव्हा ती त्यांनी विशिष्ट हेतूने पंडित भीमसेन जोशी यांच्याकडून गाऊन घेतली व नंतर ध्वनिमुद्रिका सुधीर फडके यांनी गायली. याची आठवण सांगताना सुधीर मोघे म्हणाले होते की काय या कवितेचं भाग्य की दोन महारथी गायकांनी ती गायिली.

काही कविता गायक अजरामर करतात तर गदिमांची जेवणाच्या पंगतीची कविता किंवा शुभदा जोशीचा शेपटा ही कविता या कवितांना विविध कार्यक्रमात सादर करून निवेदकांनी फेमस केल्या. तरी पण कविता तुम्हाला एखादी ओळ सुचवून जाते उदा. अंधारात चांदण्या काळवंडल्या.ही असते ठिणगी. मग पुढे

प्रवास आपसूक सुरु होतो.

दिशा अंधारून आल्या अन अंधारात चांदण्या काळवंडल्या
थरथरणारी दिव्याची ज्योत सुद्धा काजळून गेली.
पौर्णिमेचा शुभ्र चंद्र सुद्धा, ढगाआड लपून बसला
अलवार फुलणारी कमळे , आधीच कोमेजून गेली
दिशा अंधारून आल्या अन अंधारात चांदण्या काळवंडल्या
रात्र तशी घनघोर , शहरभर पसरली
काळोख्या सावल्यांतून आले क्रूर नराधम
त्या अंधारातच तोडू लागले लचके वासनांचे
ना उरला कसलाच भेद सर्वत्र नुसता अंधार
दिशा अंधारून आल्या अन अंधारात चांदण्या काळवंडल्या.
खुडल्या गेल्या कळ्या उमलण्या आधीच
फुले पण कुस्करून पाकळ्या पाकळ्या झाली.
उरली नाही भावना, उरली फक्त वेदना
मधुर गीते थिजली कानी फक्त आक्रोश
दिशा अंधारून आल्या अन अंधारात चांदण्या काळवंडल्या.


एक ठिणगी मग सहजपणे एवढा प्रवास करून जाते आणि हीच कवितेने घातलेली साद असते.

अनिल जोशी 
२१.०१.२०२० 
(कृपया आपल्या प्रतिक्रिया नावासह द्याव्यात )

Comments

  1. सहज सुंदर
    धनश्री जोशी

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

स्पेशल नात्याचे गाव - देवरुख

डोळे हे जुलमी गडे

राग मधुवंती