प्रवास आणि सहली

प्रवास म्हटलं की डोळ्यांसमोर येते ती पत्र्याची ट्रॅक, होल्डऑल , फिरकीचा तांब्या . आता या वस्तू इतिहासजमा झाल्या आहेत म्हणजे त्यांची जागा चाके असलेल्या ब्यागा, बिसलेरी पाण्याच्या बाटल्या, सॅक या गोष्टींनी घेतली आहे. प्रत्येक माणसाला प्रवासाची आवड असतेच.आणि जर प्रवास करायला जमले नाही तर ती भूक आपण प्रवास वर्णने वाचून अंशतः: भागवतो. वारसाईच्या गोडसे भटजींचा माझा प्रवास १८५७ मधील असल्याने तो ऐतिहासिक महत्वाचा ठरतो . गंगाधर गाडगीळ गोपुरांच्या प्रदेशात मधून दक्षिण भारताचे दर्शन घडवतात तर पु ल आपल्याला जगप्रवास घडवतात. शिवाय धुक्यातून लाल ताऱ्यांकडे , खडक कोरतात आकाश प्रवास वर्णने कशी विसरता येतील.तर गो नी दांडेकर पूर्ण न झालेल्या नर्मदा परिक्रमेचे कुणा एकाची भ्रमण गाथा मध्ये असे वर्णन करतात कि त्यांच्या अपूर्ण राहिलेल्या परिक्रमेतून पण परिक्रमेची ओढ अस्वस्थ करते.अशीच एक ओळख वासंती घैसास याची . काही जसे हाडाचे शिक्षक, हाडाचे व्यापारी असे असतात तशा त्या हाडाच्या पर्यटक आहेत. त्यांची प्रवास वर्णने मळलेल्या वाटा सोडून असल्याने जास्त भावतात. मी माझ्या काही सहलींचे नियोजन करताना त्यांचा सल्ला घेण्यासाठी भेटलो आणि मग आमची दोस्तीच झाली.

सहल म्हणजे आनंद. कारण नेहेमीच्या रुटीन मधून वेगळ्या वातावरणात जाण्याचा आनंद औरच . लहानपणी
बोरिवली येथील नॅशनल पार्क व मलबार हिल च्या सहली आठवतात. शाळेतील मित्र मैत्रिणींसोबत च्या सहली म्हणजे प्रवास,खेळ , आणि खादंती. पुढे शाळेबरोबर नाही तरी अजिंठा, हैदराबाद,नागपूर अशी ठिकाणे पहिली होती. पुण्यात आले की पेशवे पार्क मध्ये जाणे हा एक कार्यक्रम असायचा. पुढे कॉलेज साठी पुण्यात आल्यावर सायकल मिळाली मग थेऊर व बनेश्वर ला सायकलने सहल केली. विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांबरोबर पुणे विद्यापीठात पण सहल केली होती. पावसाळ्यात लोणावळ्याला जाऊन पायी घाट उतरणे व मनसोक्त भिजणे हे पुण्यातील तरुणांना आवश्यक असते. मग कात्रज ते सिंहगड ट्रेक, कळसुबाई हे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर सर करणे, राजगडावर मुक्कामाला जाऊन तिथे स्वयंपाक करून जेवणे असे पण साहसी प्रकार केले. शिवाय माथेरान, पाचगणी अशा छोट्या सहली पण केल्या.पण मोठ्या सहलीची सुरुवात गोवा सहलीने झाली. प्रवास करून जाणे, हॉटेल मध्ये राहणे, टुरिस्ट बस मधून स्थळ दर्शन करणे. हा एक वेगळा अनुभव होता. जरी कोकण पहिले होते तरी त्यासारखा निसर्ग असून पण गोवा हे वेगळे भासत होते. कारण तेथील संस्कृती, रस्ते, रेल्वे, बोटी असे वेगळेपण होते.

त्या नंतर एकदा बोलता बोलता नवीन झेलम एक्सप्रेस सुरु झाली होती तिने काश्मीरला जाऊया का असा विचार आला आणि तो प्रत्यक्षात पण आला. तेव्हा जम्मूपर्यंत सुमारे ४० तासांचा रेल्वे प्रवास व जम्मू ते श्रीनगर पहिला विमान प्रवास केला. मग तिथे बसने, शिकार्यातून हिंडलो.त्यानंतर मग मात्र मागे वळून पाहिलंच नाही. साधारणपणे हनिमून ला महाबळेश्वर ला जायची पद्धत होती त्या ऐवजी आम्ही बंगलोर,
म्हैसूर , उटी अशी सहल केली. मग पुढे दक्षिण भारताच्या दोन सहली, दिल्ली -जयपूर-आग्रा-मसुरी-
हृषीकेश -हरिद्वार, राजस्थान,मध्य प्रदेश, ओरिसा-कोलकत्ता-दार्जिलिंग-सिक्कीम, अमृतसर-डलहौसी-वैष्णोदेवी अशा सहली केल्या. प्रत्येक वेळी किमान १० ते ३० जणांचा ग्रुप असयचाच त्यामुळे फिरणे, पाहणे या बरोबर ग्रुप चा असा एक वेगळा आनंद पण अनुभवला. या शिदोरीवर जेव्हा स्वेच्छा निवृत्ती घेऊन टूर्स व ट्रॅव्हल्स चा व्यवसाय केला तेव्हा आसाम-मेघालय-दार्जिलिंग-सिक्कीम-नेपाळ अशी सहल ग्रुप ला घेऊन केली.या सर्व सहलींमधून देशाची विविधता -सांस्कृतिक व भौगोलिक जवळून पाहता आली. नेपाळ साठी सीमा ओलांडली तर अत्तारी येथील सीमेवर ध्वज उतरवताना जी परेड असते ती पण पहिली. सिक्कीम च्या डोंगराळ भागात लष्कराच्या खडतर जीवनाचा परिचय झाला. मन तृप्त झाले. वेगळा परदेश प्रवास अमेरिका, युरोप,वा अन्य काही पाहावे असे वाटत नाही. सहल झालीच तर ती एकाच ठिकाणी जाऊन यायची असावी. रोज उठून वेगळ्या ठिकाणी पळापळ नको वाटते. शक्य झालेच तर लक्षद्वीप ला जायची इच्छा आहे. कारण सगळी सहल बोटीत व समुद्रात व वेगवेगळ्या बेटांवर आहे. हे जरा वेगळेपण म्हणून.नाहीतर आता सहल कशी असावी असे कुणी विचारले तर म्हणेन सकाळी उठून दोन तास प्रवास व्हावा. मग छान
अल्पोपहार कॉफी सह व्हावा. दुपारी थोडा उशीर झाला तरी मुक्कामी पोचावे. यथेच्छ भोजन करून वामकुक्षी घ्यावी.संध्याकाळी छान पायीच फिरावे. संध्याकाळी गप्पांची मैफल जमावी. रात्री उशिरा पर्यंत पत्ते खेळावेत व दुसऱ्या दिवशी आरामात उठावे. नाश्ता करून दूरच्या ठिकाणी जावे. तिथेच दिवस भर फिरून मुक्कामी यावे. असे दोन तीन दिवस व्यतीत करून घरी परत यावे. उगाच धावपळ, दगदग, ताण तणाव नको. हवा फक्त आनंद.नाहीतर आता सहल कशी असावी असे कुणी विचारले तर म्हणेन सकाळी उठून दोन तास प्रवास व्हावा. मग छान अल्पोपहार कॉफी सह व्हावा. दुपारी थोडा उशीर झाला तरी मुक्कामी पोचावे. यथेच्छ भोजन करून वामकुक्षी घ्यावी.संध्याकाळी छान पायीच फिरावे. संध्याकाळी गप्पांची मैफल जमावी. रात्री उशिरा पर्यंत पत्ते खेळावेत व दुसऱ्या दिवशी आरामात उठावे. नाश्ता करून दूरच्या ठिकाणी जावे. तिथेच दिवस भर फिरून मुक्कामी यावे. असे दोन तीन दिवस व्यतीत करून घरी परत यावे. उगाच धावपळ, दगदग, ताण तणाव नको. हवा फक्त आनंद.

अनिल जोशी
२७.०१.२०२०

(कृपया आपल्या प्रतिक्रिया नावासह द्याव्यात.

Comments

  1. हे वाचून आता प्रवासाची इच्छा बळावली

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

स्पेशल नात्याचे गाव - देवरुख

डोळे हे जुलमी गडे

राग मधुवंती