ढोल बाजे
ढोल बाजे
सध्या ब्लॉग लिहायला सुरुवात केल्यापासून घरात जरा कुतूहल निर्माण झाले आहे. कारण यात सातत्य असणे आवश्यक आहे म्हणून रोज घरी आल्यावर लिहायला बसने क्रम प्राप्तच आहे. पण निदान जवळचे लोक हा ब्लॉग वाचतात असे ऐकल्यावर थोडा हुरूप येतोच. आमच्या बायकोच्या मते हे नाव यथार्थ आहे कारण हे लिखाण म्हणजे आपला ढोल वाजवणे आहे. आपला ढोल जोरात वाजवणे. या ढोल वाजव्ण्यावरून एक जुनी आठवण झाली.
त्यावेळच्या टेल्को मध्ये नोकरी करत असताना तेथील कर्मचार्यांच्या कालागर या संस्थेशी संबंध आला. १९७९-८० च्या सुमारास नाट्य,संगीत, कला व साहित्य या चार शाखांमध्ये अनेक उपक्रम सुरु असायचे .नाट्य शाखेतर्फे नाटके, एकांकिका,संगीत नाटके होत असत. संगीत शाकेतर्फे वाद्यवृंद याने ऑर्केस्ट्रा, मराठी सुगम संगीताचे कार्यक्रम होत असत तर कला शाखे तर्फे कलाप्रदर्शन, प्रत्यक्ष जागेवर जावून चित्रे काढणे असे उपक्रम होत असत. त्या तुलनेत साहित्य शाखेतर्फे वार्षिक कथा कविता स्पर्धेव्यतिरिक्त काही होत नसे .मग फक्त कर्मचार्यांच्या साहित्त्याचा अंतर्भाव असलेला दिवाळी अंक करुया अशी कल्पना निघाली. १९८१ साली पहिला अंक निघाला आणि २०१९ मध्ये ३९ वा अंक निघाला. यात आम्ही संपादक मंडळी खूप बिझी असायचो. म्हणंजे साहित्य गोळा करणे, त्याची निवड करणे, मग संपादकीय संस्करण करून छपाई करून घेणे , कंपनीत अंकासाठी बुकिंग करणे ,अंक वेळेत तयार करणे, प्रकाशन समारंभ आयोजित करणे , अंकाचे वितरण होते ते पाहणे, मुद्रक, कागद, चित्रकार या सर्वांची बिले देणे इ. हे सर्व झाले की मग आम्ही आमची दिवाळी साजरी करायला मोकळे होत असू. यावर आमचा सहकारी सुधीर हसमनीस एकदा म्हणाला होता हा म्हणजे डोंबार्याचा खेळ आहे. आधी प्रेक्षक जमा करायचे , खेळ करयचा मग थाळी फिरवायची. यातला विनोदाचा भाग सोडला तरी वास्तव कुठेतरी जवळच असतं.
आणि आपलं आयुष्य म्हणजे तरी दुसर काय असतं ? फक्त या खेळाच्या दोर्या ज्या मदर्याच्या हातात असतात तो सर्व शक्तीमान मदारी मात्र अखेरपर्यंत अदृश्य राहून ढोल वाजवतच असतो.
अनिल जोशी
०३.०१.२०२०.
(कृपया आपल्या प्रतिक्रिया नावासह द्याव्यात.)
छान जमलंय - स्मिता गडकरी.
ReplyDelete