अवघा रंग एक झाला - एक अनुभूती -अबाचा ढोल

अवघा रंग एक झाला
रंगी रंगला श्रीरंग
मी तूपण गेले वाया
पाहता पंढरीच्या राय
नाही भेदांचे ते काम
पळोनि गेले क्रोध काम
देही असोनि विदेही
सदा समाधिस्त पाही
पाहते पाहणे गेले गेले दूरी
म्हणे चोखियाची महारी
संत चोखामेळा
हा अभंग गानसरस्वती किशोरी आमोणकर यांनी रसिकांच्या मनात रुजवला. त्यांचा आर्त सूर, तन्मयता,या मुळे हा अभंग ऐकल्यानंतर एक सुकून मिळतो. रसिक त्याच्याशी तादात्म्य पावतात.   तो ऐकता ऐकता समाधी चा अनुभव येतो. मन एका विलक्षण अवस्थेत जाते. डोक्यातील विचारांचे काहूर शांत होते असा सगळा अनुभव म्हणजे हा अभंग. हा अभंग त्यांच्या कोणत्या मैफलीत ऐकायचा योग्य काही आला नाही . ऐकले ते ध्वनी मुद्रण.
या अभंगाने अनेक गायकांना भुरळ घातली आहे . भरत बेलवल्ली, आर्या आंबेकर , महेश काळे , आरती अंकलीकर ही काही नावे.

हाच अभंग जेव्हा सूर नवा ध्यास नवा या कार्यक्रमात शरयू दाते हिने सादर केला. तिने पण पूर्ण तन्मयतेने हा अभंग सादर केला व तो ऐकताना सगळा श्रोतृवृंद अवाक झाला. किशोरी ताई असा अभंग सादर करतात तेव्हा त्या मागे त्यांची अनेक वर्षांची साधना व तपश्चर्या असते आणि त्या मुळे त्यांचे गाणे अलौकिक होते. पण शरयू सारखी मुलगी जेव्हा हा अभंग असाच सादर करते तेव्हा तो दैवी चमत्कार मानला जातो. कारण त्यावर बोलताना महेश काळे व अवधूत गुप्ते असेच म्हणाले की असं गाणं हे इथलं वाटत नाही ते कुणी शक्ती गाऊन घेते असेच वाटते.तोच अनुभव जेव्हा आर्या ने गायलेला अभंग ऐकला तेव्हा तोच सुकून अनुभाला.

या पार्श्वभूमीवर परवा या अभंगाचे एका कार्यक्रमातील ध्वनी मुद्रण ऐकले. कार्यक्रमात हा अभंग किशोरी आमोणकर यांच्या शिष्या आरती अंकलीकर यांनी सादर केला होता. मैफलीत त्यांचे सादरीकरण अफाट असत. श्रोते जागोजागी दाद देत होते ते पण ऐकू येत होत. तबल्यासोबत साथीला मृदूंग पण होता त्यामुळे साहजिकच वातावरण भक्तिमय व्हायला मदत होते. शिवाय बासरी पण होती. हा अभंग ऐकून कान तृप्त झाले. म्हणजे सकाळ सूरमयी झाली .
भरत बेलवल्ली ने सादर केलेला हा अभंग पण असंच भक्ती रसाचा प्रत्यय देणारा होता. चढा आवाज हे त्यांचे बलस्थान त्याचा उपयोग त्यांनी आर्तता आणण्यासाठी केला. बराचसा अभंग ते खालच्या सुरातच गावून सुकून द्यायचा प्रयत्न केला. पण आरती काय किंवा भरत काय त्यांच्या गायनातील आक्रमकता लपत नाही

पण ही दोन्ही सादरीकरणे  किशोरी ताईंच्या , आर्या आंबेकर किंवा  शरयू दाते यांच्या सादरीकरण पेक्षा अगदी वेगळे होते. त्यांचे गाणे अतिशय आक्रमक होते, तानांची  आतषबाजी होती. अनेक हरकती , मुरक्या यांच्या साहाय्याने त्यांनी हा अभंग खुलवला. म्हणजे पूर्वी मैफलीत मास्तर कृष्णराव हे असे अभंग आळवून आळवून खुलवायचे व ते रंगतदार,रंजक  व्हायचे. तसेच काहीसे या अभंगाबाबत झाले .

मग मनात विचार आला की किशोरी ताई ज्या पद्धतीने अभंग सादर करतात तो जशी अनुभूती देतो
तशीच अनुभूती हा पूर्णपणे रंजकतेने सादर केलेला अभंग पण देतो. हे कसे काय हा प्रश्न दिवसभर छळत होता आणि त्या प्रश्नाचे उत्तर काही मिळत नव्हते.मग विचार करताना असे जाणवले की किशोरी ताई हा अभंग ज्या पद्धतीने सादर करतात ती म्हणजे ध्यान धारणा केल्यासारखी जिथे कलाकार थेट संवाद परमेश्वराशी करतो व तादात्म्य पावतो. आणि आरती ताई जे सादरीकरण करतात तो  म्हणजे सामूहिक साधनेचा अविष्कार असतो. यात कलाकार श्रोत्यांना सोबत घेऊन सामूहिकरित्या संवाद साधतात. ही साधना साधारण पणे आरती किंवा कीर्तन या प्रकारासारखे असते.म्हणजेच अविष्कार किंवा सादरीकरण भिन्न असले तरी अनुभूती तीच असते.

माझ्या प्रश्नाचे उत्तर मिळाले आणि विचारांचे वादळ संपले.

अनिल जोशी
३०.०१.२०२०

(कृपया आपली प्रतिक्रिया नावानिशी द्यावी) 

Comments

Post a Comment