भीमसेनजींचा राग तोडी

आज सकाळी बस मध्ये बसलो आणि फोनवर संगीत सुरु केलं तो साक्षात पंडित भीमसेन जोशी यांच्या एका मैफलीतील तोडी रागाचे आलाप सुरु झाले. आणि मग सभोवतालचं सगळं विश्व त्या तोडीच्या स्वरांनी भरून गेलं. आलापातून हळू हळू तोडी रंगात चालला होता. बस आपल्या मार्गावरून पळत होती. पण हे सगळं विसरून मन मात्र गेलं होतं सवाई गंधर्व समारोहाच्या सांगता सोहळयात. तीन रात्री रसिकांना स्वरांच्या वर्षावात चिंब भिजवून झाल्यावर रविवार सकाळ उजेडात असतांना पंडितजी मंचावर येत असत. सगळं वातावरण भरून गेलेलं असताना तंबोरे गुंजन करू लागत आणि त्यात अलगद पंडितजींचा षड्ज संपूर्ण मांडवभर पसरत असे. त्या मांडवाचे रूपांतर अक्षरश: स्वर दरबारात होतं असे आणि त्या दरबारात पंडितजी एखाद्या सम्राटासारखे भासत. सर्व इंद्रियांनी साठवून ठेवावा असा तो सोहळा.
तोडी, गुजरी तोडी, आसावरी , रामकली, गुणकली असे सकाळचे कितीतरी राग पंडितजींकडून ऐकले आहेत पण तोडी म्हणजे विलक्षण . विलंबित चीज नयनोवाली ते अशा काही नजाकतीने पेश करत की श्रोते आणि पंडितजी यांच्यात अद्वैत निर्माण होतं असे.
आज तोडी ऐकताना हीच अनुभूती येत होती. जणू पंडितजी त्या समारोहात आपला तोडी सादर करत आहेत. आपण त्या तल्लीन श्रोतृवर्गाचा एक भाग आहोत. विलंबित संपून द्रुत एरी माई आज शुभ मंगल गाओ सुरु होते. बसचा प्रवास संपलेला असतो पण चीज सुरूच ठेवतो. मग कॅन्टीन मध्ये कॉफी घेता घेता गाण्याचा आस्वाद घेताना  वाटत होतं हे कॅन्टीन नसून सवाई गंधर्व समारोहासाठी गोखले मंडप वाल्यांनी उभारलेला स्वर दरबार आहे. अर्थात याला सुपर क्वालिटी चे इअर फोन पण जबादार आहेत. त्यामुळे अक्षरश: स्वरांचा माहोल अनुभवता येतो.
तोंडी टाळ्यांच्या कडकडाटात संपतो. मी तसाच निशब्द . वाटत आता पंडितजी ठुमरी सुरु करतील किंवा माउली येऊन बसले की समजावं आता पंडितजी अभंग सादर करणार. पण अखेर आभास झाला तरी ते स्वप्न संपून वास्तवात यावेच लागते. पण त्या तोडीने किंवा त्या आठवणींनी मन भरून आले. एक दिव्य अनुभूती नेहेमीच्या रुटीन मध्ये त्या तोडीच्या सुरांनी दिली .

अनिल जोशी 
०७.०१.२०२०
(कृपया आपली प्रतिक्रिया नावानिशी द्यावी.)

Comments

  1. अगदी हाच अनुभव. पहाटेने पुढे सरकूच नये असा. गेले ते विश्व लया. सुधांशु

    ReplyDelete
  2. सुंदर शब्दांकन

    ReplyDelete
  3. अप्रतिम..धनश्री

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

स्पेशल नात्याचे गाव - देवरुख

डोळे हे जुलमी गडे

राग मधुवंती