पुस्तकांच्या जगात
आज असं लक्षात येतंय की आपलं म्हणून जे म्हणणं किंवा शहाणपण दिसतंय किंवा जाणवतं आहे ते बरचसं पुस्तकांतून आलंय. आपले विचार प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष पणे काही पुस्तकांच्या वाचनातूनच विकार गेले. इतकंच काय पण आपल्या भाषेवर देखील आपल्या वाचनाचा प्रभाव जाणवतो.हे अगदी जसेच्या तसे नसते. त्यात अनेक मिश्रणे असतात तर थोडा अनुभवांचा साज पण असतो.
काही पुस्तके आपल्या आठवणींच्या कोंदणात असतात. वि स खांडेकरांचं ययाती एका बैठकीत वाचलं होतं. तसंच श्री ना पेंडसे यांचं लव्हाळी रात्री एक तासभर वाचून झोपू असं ठरवून वाचायला घेतलं आणु वाचून संपल्यावर पाहिलं तर पहाटेचे तीन वाजले होते.पु. शि. रेगे यांचं सावित्री पॆसेंजर गाडीतील प्रवास सखावह करुन गेला. त्यातली पत्रं,कूर्ग प्रदेशाचं वर्णन, आनंदभाविनी ही उपमा केवळ अविस्मरणीय. त्यांची अवलोकिता ही छोटेखानी कादंबरी वाफाळलेल्या कॊफीचा घुटके घेत आस्वाद घ्यावा तशी वाचावी. विश्राम बेडेकरांची मृत्यूच्या छायेतील उत्कट प्रीतिकथेची नायिका हॆर्टा मनात कायम घर करुन राहते. पु लं नी रंगवलेल्या व्यक्ती आपल्या दोस्तखान्यात सामील होतात तर प्रवास वर्णनात त्या त्या ठिकाणी वावरणारे पु ल जाणवतात.व पु आपल्या कथांतून कागदाला अहंकार चिकटला की त्याची डिग्री होते अशी सुभाषिते सहजपणे देतात. द मा मिरासदार आपल्याला गप्पांच्या फडाचा फील देतात तर व्यंकटेश माडगूळकर आपल्याला थेट शिकारीच्या मचाणावर घेऊन जातात. माझा बस प्रवासाच्या वेळात माझे बरेचसे वाचन झाले आहे.एकदा सकाळी बसमधे पॆपिलॊन वाचायला सुरुवात केली तर ऒफिस आल्याने वाचन थांबवावं लागलं याचं मनापासून वाईट वाटलं. कधी एकदा ऒफिस संपतंय आणि पुस्तक हातात घेतो असं झालं होतं.
अशी अनेक पुस्तके व त्यांच्या आठवणी. आज त्या बुकशेल्फवरची फक्त थोडी धूळ झटकली इतकंच.
अनिल जोशी
१२.०२.२०२०
आपली प्रतिक्रिया कृपया आपल्या नावासह द्यावी.
अगदी खरं आहे....पुस्तक वाचनाच्या आनंदाची तुलना कोणत्याही आनंदाशी नाही...त्यातून लेखक भेटतात ...
ReplyDeleteधनश्री जोशी
अनिल, त्या तारूण्यसुलभ काळात वाचलेल्या "मॅडम" नावाच्या "सावित्री" सारख्याच छोटेखानी पुस्तकाची आज सरसरून आठवण आली.
ReplyDeleteतसंच, अजून एक पुस्तक म्हणजे - थँक्यू मिस्टर ग्लाड.
त्या काळात ज्ञानप्रबोधिनीच्या ग्रंथालयातल्या सुरेश खैरनार नावाच्या आपल्या मित्रवर्याची सुद्धा तीव्र आठवण होतेय कारण त्याने भागविलेली उत्तम साहित्य वाचनाची आपली भूक. थँक्यू मिस्टर सुरेश !! - अवी