एका लग्नाची गोष्ट
काल ५० वा ब्लॊग लिहिला.यात दररोज अवेगळा विषय द्यायचा प्रयत्न केला. सर्वांचा प्रतिसाद उत्साह वाढवणारा आहे. आज एक गोष्ट किंवा कथा लिहित आहे.
अशीच एक ती भेटते. तरुण,सुंदर,सदा उत्साही.रसिक. सगळ्यात गती. साहित्य,संगीत,भटकंती,तत्वज्ञान, अध्यात्म,स्वयंपाक,सिनेमे पाहणे,खरेदी करणे. आणि कोणतीही गोष्ट करायची ती मनस्वीपणे.तिचे मित्र मैत्रिणी लग्नाबाबत चिडवत पण मनासारखा जोडीदार मिळत नाही तोवर लग्नाचा विचार नाही यावर ती ठाम होती.
हिला पाहिजे तसा जोडीदार मिळावा अशी सगळ्यांबरोबर माझी पण इच्छा होती. त्याच बरोबर तो आपल्या माहितीतील असावा असा पण स्वार्थी विचार होता. पण तसा जोडीदार मिळणे तितकेच अवघड होते. तिच्या या सर्व गुणसंपन्नतेची कदर करण्याइतपत तरी त्याची संवेदनशीलता हवीच.
दिवस जात होते. तिचं व्यक्तिमत्त्व बहरतच होतं. साथीदार मात्र मिळत नव्हता. आणि एके दिवशी एका मित्राने त्याच्या मुलाच्या साखरपुड्याला बोलावले. संबंध जवळचे होते म्हणून गेलो तर हीच त्या मित्राची होणारी सून. एक प्लेझंट सरप्राईज. उभयतांचे मनापासून अभिनंदन केले. शुभेच्छा दिल्या. पुढचे काही दिवस मग लग्नाची गडबड. खरेदी,बोलावणी,केळवणे सगळं यथासांग चालू होतं. आधीच ती उत्साही त्यातून स्वत:चंच लग्न. त्यामुळे उत्साहाला उधाण आलेलं.
अखेर लग्नाचा दिवस उजाडला. बोहल्यावर पिवळ्या वधू वस्त्रात तिचं रुप अजून खुलून दिसत होतं. रंगलेली मेहंदी, हिरवा चुडा,केसात. भरगच्च गजरे सगळं छान दिसत होतं. मंगलाष्टके सुरु होती आणि वेडं मन पुढे धावत जात होतं.
आता दोघांचा संसार सुरु होईल का प्रापंचिक जबाबदारीने तिचं व्यक्तिमत्त्व कोमेजून जाईल का विसंवाद निर्माण होईल?
शुभमंगल सावधान या मंत्रा ऐवजी दुसर्याच कोणत्या तरी आवाजाने भानावर आलो.
लग्न समारंभ वगैरे काही नव्हता. प्रवासात एक डुलकी लागली होती त्यात ही न झालेल्या लग्नाची गोष्ट दिसली इतकेच.
अनिल जोशी
१३.०२.२०२०
V nice and true'
ReplyDelete