बोलू कवतिके





काही बोलायाचे आहे,
पण बोलणार नाही
देवळाच्या दारामध्ये
भक्ती तोलणार नाही
माझ्या अंतरात गंध कल्प कुसुमांचा दाटे पण पाकळी तयांची,
कधी खुलणार नाही
नक्षत्रांच्या गावातले मला गवसले गुज
परि अक्षरांचा संग
त्याला मिळणार नाही
मेघ जांभळा एकला राहे नभाच्या कडेला
त्याचे रहस्य कोणाला
कधी कळणार नाही
दूर बंदरात उभे एक गलबत रुपेरी
त्याचा कोष किनार्यास
कधी लाभणार नाही
तुझ्या कृपाकटाक्षाने झालो वणव्याचा धनी
त्याच्या निखार्यात कधी
तुला जाळणार नाही
कहो बोलायाचे आहे ही मानवाची आदिम प्रेरणा आहे. मनुष्य प्राणी व इतर प्राणिमात्र यांच्यात हाच एक फरक आहे. मनुष्य बोलू शकतो अर्थात स्वभावा नुसार कमी अधीक.पण बोलतोच. एक तर स्वत: बोलतो व दुसर्याला बोलते पण करतो. काही वेळा एक बोलतो व दुसरा श्रवणभक्ती करतो. याला आम्ही बातचीत म्हणतो. म्हणजे एक बात करतो अन् दुसरा चित होत असतो.
हे बोलणे कसे असावे तर मधुर असावे. ऐकणार्याना प्रिय असावे पण सत्यापासून दूर नसावे. असे म्हणतात की काय बोलायचे यापेक्षा काय बोलू नये हे समजले पाहिजे व त्याला कर्माचे अधिष्ठान असावे.समर्थ म्हणून गेले आहेत क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे. अशा लोकांना वाचाळवीर म्हटले जाते. संतांनी वाणीचे महत्व अधोरेखित केले आहे. माऊली तर म्हणतात
घेई घेई माझे वाचे गोड नाम विठोबाचे.
या रचनेत माऊली सगळ्या इंद्रियाना विठ्ठलमय होण्यास सांगतात.
कधी कधी वाणीला कठोर पण व्हावे लागते पण ते किती मने दुखावणार नाहीत इतपत. तेवढ्यातच परिणाम साधता यायला हवा.
अर्थात या बोलण्यात काव्य पण आहे. वरच्या गीतात पण बोलणार नाही म्हणत किती बोलले गेले आहे. तसेच मानापमान मधली भामिनी पण नाही मी बोलत नाथा म्हणत सगळं मनोगत व्यक्त करतेच.तुकाराम महाराज म्हणतात
बोलू ऐसे बोल प्रेमे बोले विठ्ठल डोले
घरात जन्मलेला नवजात शिशू जेव्हा पहिला शब्द उच्चारही तेव्हा सगळ्याना किती आनंद होतो. त्याचे बोबडे बोल कौतुकाने ऐकले जातात तर वृद्धांचे बोलणे कटकट वाटते.नको असलेले बोलणे आपण कानाआड करतो. मग बोलणार्याच्या लक्षात येतं
नळी फुंकली सोनारे इकडून तिकडे गेले वारे.
एकूण बोलणे हा स्थायी भाव आहे. इंग्जीत म्हटले जाते
Talk less and talk sense
बोलणे जरी मानवाची गरज असली तरी त्यातून बाहेर पडणारे शब्द हे शस्त्रस्वरुप असल्याने ते जपूनच वापरायला हवे.
बोलू कवतुके म्हणजे जोवर कौतुक होते आहे तो पर्यंतच बोलावे.
 

Comments

Popular posts from this blog

स्पेशल नात्याचे गाव - देवरुख

डोळे हे जुलमी गडे

राग मधुवंती