अनोळखी चेहेर्यांच्या शहरात

या शहरात येवून पुढील वर्षी मला ५० वर्षे होतील. एस एस सी नंतर महाविद्यालयीन शिक्षणासाठी या शहरात दाखल झालो. म्हणजे जन्म या शहरातला असला तरी शालेय शिक्षण पुण्याबाहेर झालेले. तसा कधीमधी सुटीत पुण्यात येत असे पण ते वेगळे. कसे होते हे शहर ? सायकलींचे, विद्येचे माहेरघर त्या मुळे अनेक शिक्षण संस्था इथे होत्या. शिवाय थंड हवामानामुळे बरीच सरकारी आस्थापने पण इथे होती. शिवाय हे पेन्शनरांचे शहर म्हणून पण ओळखले जायचे. पानशेत पुरानंतर शहराचा विस्तार सुरु झाला होता. शिवाय बजाज, फिलिप्स, टेल्को, अशा मोठ्या कंपन्या पुण्यात कारभार करू लागल्या होत्या. अशा या वेगाने बदलत जाणार्या या शहराचे साक्षीदार होण्याचे भाग्य लाभले.
कोलेज शिकता शिकता टेल्को सारख्या कंपनीत शिरकाव झाल्याने औद्योगिक जगताशी अपोआप जोडला गेलो. पोषक सांस्कृतिक वातावरणामुळे खूप छान संगीत ऐकायला मिळाले. अनेक मान्यवर साहित्यिकाचा सहवास लाभला. कॉलेज, विद्यार्थी परिषद, होस्टेल आणि कंपनी यामुळे खूप मोठा मित्रपरिवार मिळाला. एकूण विचार करता आतापर्यंतच्या आयुष्यातील ७५% काळ या शहरात गेला. अनेक चढ उतार आले पण हा काळ अनादाचाच होता.
आता शहर मात्र प्रचंड विस्तारले आहे. नेहेमी ज्या भागात जाणे होत नाही तिथे गेलो तर कोणत्या तरी वेगळ्या शहरात आलो असे वाटते. सायकलची जागा स्कूटर किंवा आता तर चार चाकीने घेतली आहे. आता लवकरच मेट्रो पण धावू लागेल. रस्त्यांवरून आरामात रमत गमत चालायचो तिथे आता जीव मुठीत धरून चालावे लागते. वाहतूक कोंडी जीवनाचा अविभाज्य भाग बनली आहे. गावाहून आलो की पूर्वी कात्रज घाट उतरताना पुण्यात आलो असे वाटायचे. पण आता थेट बोगद्यातून बाय पास ला लागतो . तिथे तर दर महिन्याला बदल होत असतात आणि तशी शहराची अशी छाप दिसत नाही. दिसतात ती कॉंक्रीट ची एक छाप जंगले. एकदा सकाळी माझी बहिण पुणे स्टेशन वर उतरली तिथे तिला टेल्को ची बस दिसली व पुण्यात आल्याचे जाणवले. पण तशा शहराच्या अशा खुणा विरळ होत चालल्या आहेत. पूर्वी एखाद्या चित्रपटाचे शूटिंग पुण्यात झाले कि तो भाग लगेच ओळखू यायचा . आता तसे होत नाही.
पूर्वी चालत जाताना अनेक ओळखीचे लोक भेटायचे ते आता दुर्मिळ झाले आहे . कधी काही नेहेमी दिसणारे चेहेरे दिसले व ओळख नसली तरी कुणी तरी ओळखीचे भेटल्यासारखे वाटायचे. त्या मुळे बर्याच वेळा माझ्याच शहरात मला अनोळखी चेहेर्यांच्या शहरात फिरत असल्याचा भास होते.
इस श्हारकि गुमनाम गलीया ,
कैसे लापता हो गायी
ये गुमसुम शकले ये अंजान चेहेरे 
मेरे ही शहर के है
फिरभी कूच पहचान नही मेहसूस होती
तो क्या ये शहर भी अंजान हो गाय मेरे लिये 

आता अनोळखी वाटणाऱ्या या शहरात ३९ वर्षांपूर्वी एका अनोळखी व्यक्तीने जीवनात प्रवेश केला आणि प्रपंच सुरु झाला. शहर अनोळखी वाटले तरी प्रपंच खरा आहे.

अनिल जोशी 
१७.०२.२०२०
कृपया आपली प्रतिक्रिया आपल्या नावासह द्यावी.


Comments

Popular posts from this blog

स्पेशल नात्याचे गाव - देवरुख

डोळे हे जुलमी गडे

राग मधुवंती