रविवारची स्वप्ने


Mockup card and planner on bed with warm plaid. Copy space. Flat lay, top view

कोणे एके काळी रविवारच्या सुटीचे खूप अप्रूप होते कारण १९७४ ते २००७ या व्यावसायिक कारकिर्दीत साप्ताहिक सुटी ही गुरुवार होती आणि त्या मुळे एखाद्या रविवारी सुटी आली तर तिचे अप्रूप असणारच. रविवारी सकाळी वृत्त्पत्राची रविवार पुरवणी निवांत पणे वाचणे हा एक महत्वाचा टप्पा होता. मग बेडेकरची मिसळ किंवा हिंदुस्तान बेकरीचे पेटीस खाणे का एक सोहळा असायचा कारण तेव्हा पेटीस हे फक्त हिंदुस्तान बेकरीचे आणि ते पण फक्त रविवारीच मिळायचे. त्या आधी शनिवारी रात्री एखादी गाण्याची मैफल झालेली असली तर डोळ्यांवर जागरणाच्या सुस्ती बरोबर सूरांची नशा पण असायची. शिवाय दूर दर्शन वर प्रतिभा आणि प्रतिमा सारखा कार्यक्रम म्हणजे सोनेपे सुहागा. दुपारच्या भरपेट जेवणाच्या नंतर मोठी वामकुक्षी म्हणजे सुखाचा कळसाध्याय. कधी कधी एखादी प्रात:कालीन रागांची मैफल असायची तर अनेक रविवारच्या सकाळी सवाई गंधर्व महोत्सवात भीमसेनजींच्या स्वर वर्षावात चिंब भिजलेल्या आहेत. सर्वत्र सुटी असल्याने कोणतीही कामे नाहीत. आणि गुरुवारच्या सुटीतला मेटीनी  पण नाही.
एकूण रविवारची सुटी खूपच कमी वेळा मिळाल्याने ती संस्मरणीय व्हायची. आणि रविवारची सुटी झाली की पुढचा सुटीचा गुरुवार पण लवकर यायचा. २००७ नंतर मात्र या रविवारच्या सुटीचे अप्रूप राहिले नाही. कारण रविवार बरोबर शनिवारची पण सुटी मिळू लागली. आणि रविवार हा आळसवार झाला . जी काही कामे आहेत ती शनिवारीच उरकली की रविवार मोकळा. आता पेटीस कधीपण मिळत असल्याने त्याचे पण कौतुक राहिले नाही. विविध वाहिन्यांच्या भाऊ गर्दीत दूर दर्शन चे दर्जेदार कार्यक्रम हरवून गेले. रविवारच्या पुरवण्यांमध्ये मजकुरापेक्षा जाहिराती जास्त असल्याने रद्दीच जास्त. हल्ली उगाच उठून कुणाकडे गप्पा मारायला जायची पद्धत राहिली नाही.
एक मात्र आनंद अजून अस्तित्वात आहे तो म्हणजे सकाळी मंडई ची फेरी. भरपूर ताज्या भाज्या पाहून मन प्रसन्न व टवटवीत होते. सध्या खपत नाहीत म्हणून भरपूर भाज्या आणल्या जात नाहीत पण भाज्यांचे दर्शन मात्र सुखवून जाते.
अखेर काळ किती पण बदलला तरी रविवार एक सुटीचा फील देतोच. तो काळ गेला तरी नवीन स्वप्ने पाहायला काय हरकत आहे?

अनिल जोशी
१६.०२.२०२०
कृपया आपली प्रतिक्रिया नावासह द्यावी.

Comments


  1. Nostalgic as well as optimistic !

    मनस्वी आणी सकारात्मक !

    ....................................... BK

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

स्पेशल नात्याचे गाव - देवरुख

डोळे हे जुलमी गडे

राग मधुवंती