सूर कट्यार


Image result for pics from marathi drama katyar kaljat ghusaliImage result for pics from marathi drama katyar kaljat ghusali
कट्यार काळजात घुसली हे किती रुक्ष नाव आहे. ते पण एका संगीत नाटकाचे. बहुतेक १९६७ साल असावे. घरात चर्चा सुरु होती. सुरुवात एक नवीन संगीत नाटक येत आहे या वाक्याने झाली. नंतर असं कानावर आलं की मत्स्यगंधा ,ययाती आणि देवयानी अशा नाटकांच्या संगीत दिग्दर्शनामुळे प्रसिद्धीस आलेले पंडित जितेंद्र अभिषेकी या नाटकात काम करणार आहेत. त्या बरोबरच आतापर्यंत कधीच नाटकातून काम न केलेल्या माणिक वर्मा पण यात काम करणार आहेत. पण जेव्हा जाहिरात आली तेव्हा समजलं संगीत जितेंद्र अभिषेकी यांचे आहे . त्यात वसंतराव देशपांडे , प्रसाद सावकार ,शंकर घाणेकर अशी मातब्बर मंडळी काम करणार आहेत. मला जवळची बातमी म्हणजे त्यात शेखर सावकार -प्रसाद सावकार यांचा मुलगा पण काम करणार आहे, शेखर सावकार हा आमच्याच इयत्तेत -तुकडी वेगळी- तेव्हाच्या
किंग जॉर्ज स्कुल मध्ये होता.

नाटकाचे प्रयोग सुरु झाले . माझा मामा -विजुमामा - या नाटकावर बेहद खुश होता. आम्ही लहान असल्याने नाटकाला नेण्याचा प्रश्नच नव्हता. पण रेडिओवर प्रसाद सावकार यांचे घेई छंद, मुरलीधर शाम ही गाणी वाजायला लागली.पाठोपाठ वसंतरावांची या भवनातील गीत, तेजोनिधी लोहगोल ही गाणी पण वाजू लागली आणि एका सकाळी रेडिओ तर वसंतरावांचे घेई छंद ऐकले तेव्हाच लक्षात आले की हे भन्नाट प्रकरण दिसतंय.

पुढे डोंबिवलीत आल्यावर माझा मित्र श्रीकांत केळकर याने त्यांच्या शेजारी राहणाऱ्या सुनील जोशी कडे नेले व तिथे कट्यारची एल पी ऐकली . सुरत पियाकी ने तर भारावून गेलो. पुढे कट्यार ची संहिता असलेले पुस्तक हातात आले. ते वाचले . पण ऐकलेली गाणी आणि नाटकाची गोष्ट यांची सांगड काही घालता येत नव्हती. अशीच ३-४ वर्षे निघून गेली.

कॉलेज मध्ये साहित्य चर्चा मंडळ व इतर सांस्कृतिक बाबींमुळे एकूण आकलन कक्षा विस्तारत होत्या.
१९७३ च्या डिसेंबर मध्ये बालगंधर्व मध्ये कट्यार चा प्रयोग पाहायला गेलो. नाटक पाहून भारावून गेलो.
कथानकातील एक आगळा संघर्ष, त्यातील नाट्य , त्याला कविराज बँके बिहारींनी दिलेली काव्याची जोड- तो वर शन्कर घाणेकर यांच्या निधना नंतर ती भूमिका प्रसाद सावकार करू लागले होते. तर सदाशिव ची भूमिका प्रकाश घांग्रेकर करत होते. प्रसाद सावकार कविराजांच्या भूमिकेत रंग भरत असत तर घांग्रेकर वसंतरावांच्या बरोबरीने गात असत .

वसंतरावांबद्दल काय म्हणावे? हे तर त्यांचेच नाटक होते. गाण्याच्या तोडीसतोड अभिनय असायचा. ते ही
भूमिका अक्षरश: जगले इतकेच नव्हे तर निष्ठेने त्यांनी व फ़ैयाझ यांनी सलग पहिले ५०० प्रयोग केले.५०० प्रयोगानंतर ते प्रकृतीच्या कारणासाठी थांबले . बहुधा त्यांचा या नाटकात तेवढाच शेअर असावा. कारण पुढे ते
गेले. पण एक दंतकथा बनून गेले. ती व्यक्तिरेखा इतकी ताकतवान होती की जेव्हा चित्रपटासाठी सचिन यांना विचारणा झाली तेव्हा त्यांना तो बहुमान वाटला आणि नशिबानेच अशी भूमिका मिळते अशी त्यांची भावना होती. या भूमिकेसाठी त्यांची निवड कशी झाली हा किस्सा योगायोगाने पुरुषोत्तम दारव्हेकर यांच्याकडून ऐकायला मिळाला.मी प्रभाकर पणशीकर यांची पूना गेस्ट हाऊस मध्ये वाट पाहत होतो. ज्या खोलीत मला बसवले होते त्याच खोलीत पुरुषोत्तम दारव्हेकर उतरले होते. ते मस्त गप्पा मारण्याच्या मूड मध्ये होते. (त्या वेळी ते दाढी करत होते आणि ती मनासारखी होत असल्याने बहुतेक मूड चांगला असावा )माझा आणि त्यांचा काही परिचय नव्हता.पण गप्पा मारायला परिचय लागतो असे कुठे आहे. तो होतोच.

कट्यार मधील खांसाहेबाच्या भूमिकेसाठी शोध चालू होता. दारव्हेकरांनी वसंतरावांचे नाव सुचवले होते पण
म्हणावा तसा प्रतिसाद पणशीकरांकडून येत नव्हता. तेव्हा वसंतरावांच्या मेघमल्हारचे प्रयोग सुरु होते . दारव्हेकर पणशीकरांना घेऊन त्या प्रयोगाला गेले. बस्स. तिथेच खांसाहेबांचा शोध संपला. नंतर पणशीकरांबरोबर गाडीत कट्यारीचा विषय निघाला. पणशीकर पुन्हा ते नाटक करायची जुळवाजुळव करत होते. पण खांसाहेब मिळत नव्हते.मी आगाऊपणे त्यांना चिंचवड च्या पद्माकर कुलकर्णी यांच्याबद्दल विचारले. त्यांनी काही प्रयोग केले होते. पण पणशीकर म्हणाले त्यांचे उच्चार ब्राह्मणी आहेत.

पुढे ते नाटक भरत नाट्य मंदिर ने केले. चारुदत्त आफळे त्यात काम करत होते. मग चंद्रकांत लिमये भूमिका करत असलेली सी डी आणली होती. वसंतरावांचे हे नाटक एका दिवाळीत दूरदर्शन ने पूर्ण दाखवले होते. तेव्हा पण पुनःप्रत्ययाचा आनंद घेतला होता. नंतर राहुल देशपांडे यांनी ऑपेरा पद्धतीने वसंतोत्सवात कट्यार सादर केले तो १४००० प्रेक्षकांच्या साक्षीने त्या प्रयोगाचा थरार अनुभवला.

जेव्हा कट्यार चित्रपटाचा पहिला प्रोमो मंगला टॉकीज मध्ये पहिला तेव्हा पुन्हा एक अद्भुत निर्मिती होत असल्याचे जाणवले. शंकर महादेवन यांना सुबोध भावे ने कट्यारच्या संगीत दिग्दर्शनाबाबत विचारले तेव्हा त्याने विचारले तू ताजमहाल पुन्हा बांधणार आहेस का? पण नाटक म्हणून ज्या मर्यादा येतात त्या दुर करून कट्यारीचे नवीन सुरशिल्प साकारले.

याची नाटकाशी तुलना करणे चूक आहे कारण दोन्ही वेगळी माध्यमे आहेत. नाटकात जितके संगीत आहे
तितके सिनेमात येऊ शकत नाही. पण एवढे प्रयोग होऊन ५० वर्षात कट्यार जितक्या प्रेक्षकांपर्यंत पोचले त्याच्या कित्येक पट प्रेक्षकांपर्यंत ही कट्यार पोचली. माझ्या मते नाटक द्विमिती चित्राचा अनुभव देते तर चित्रपण बहुमिती शिल्पाची अनुभूती देतो.

हे सगळं आज आठवण्याचं कारण म्हणजे चारुदत्त आफळे यांची सुरत पियाकी ची क्लिप पहिली/ऐकली . एका गाण्यात किती राग असावेत?सोहनी, मारवा, मालकंस, आसावरी,मल्हार,केदार,बहार आणि मालकंस मधील द्रुत आणि अति द्रुत तराणे. एकूण नाटकताच पंडितजींनी जे काही संगीत निर्माण केले आहे त्याला रंगभूमीच्या इतिहासात तोड नाही.

ही सूर कट्यार म्हणजे आमच्या आयुष्याची महत्वाची साक्षीदार आहे.

अनिल जोशी 
१८.०२.२०२०
कृपया आपली प्रतिक्रिया आपल्या नावानिशी द्यावी.



Comments

  1. Agdi khare ahe. Anek goshtinchi athvan jhali. Chhan lihile ahes

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

स्पेशल नात्याचे गाव - देवरुख

डोळे हे जुलमी गडे

राग मधुवंती