महाभारत
सहज मेलबॉक्स पाहत होतो तेव्हा मे महिन्यात केलेली एक कविता सापडली.
महाराज या कुरूक्षेत्रावर
उभी आहे मधोमध
आपली यादवसेना
दोन्ही बाजूला आहे
विशाल कौरव सेना
समोर आहे पांडवसेना
आणि पार्थाच्या रथावर
आपण साक्षात प्रभू
कोणत्याही क्षणी
रणभेरी वाजतील
शंखध्वनी होईल
आणि समोरासमोर असलेली सैन्यदले
परस्परांना भिडतील
पण तो क्षण अजून
आलेला दिसत नाही
विलक्षण ताण जाणवतोय
सर्व सेना सज्ज आहे
शस्त्रे परजलेली
पण अजून म्यानात
समोर पण तशीच
तणावपूर्ण शांतता
पार्थाने शस्त्रे ठेवली
आपण त्याला काही
सांगत आहात
दिसतंय पण समजत काहीच नाही
वातावरणात काहीतरी
चैतन्य जाणवत होतं
काही तरी आत
पोचत होतं
मनातलं मळभ
दूर होत होतं
अखेर तो क्षण आला
रणदुंदुभी गर्जू लागल्या
शंख ध्वनींनी सगळे
आसमंत व्यापलेला
पार्थाने धनुष्याची प्रत्यंचा
ओढली बाण चढवला
आणि गर्जना करत
सेना परस्परांना भिडल्या
रणसंग्रामाला सुरुवात झाली
एकच ईर्षा एकच ध्यास
प्रतिस्पर्ध्यावर हल्लाबोल
भाऊ भावांवर
गुरु शिष्यांवर
सैनिक फक्त सैनिक
शत्रुवर तुटून पडायचं
प्राण पणाला लावून
मृत्यूला सामोरे जायचं
कोण कुणासाठी कशासाठी लढतोय
जीव पणाला लावतोय
त्यांना कुठे माहित आहे
त्यांच्या या कृतीला
पुढे महाभारत
म्हटलं जाणार.
युद्धस्य कथा रम्य: असे म्हटले जाते . आपण त्या चवीने वाचतो. पण जेव्हा महाभारत ही मालिका पाहत
होतो तेव्हा युद्ध सुरु झाले की सैन्याचा एक लोंढा पुढे जायचा आणि ते परस्परांना भिडले की फटाफट
माणसे मारून पडायची. कधी इकडची तर कधी तिकडची. माझ्या मनात आलं की कौरवांना युद्ध करण्याचा
हेतू होता. पांडवांना पण गेलेले राज्य मिळवायचे होते. पण दोन्ही बाजूने जे सैनिक लढत होते त्यांचे काय
उद्दिष्ट असणार. काही अंशी पोटासाठी तर काही अंशी अंगातली रग म्हणून पण अन्यथा तसे काही कारण
नाही. ज्याच्या सैन्यात आहोत त्याची इचछा किंवा आज्ञा म्हणून शस्त्र घेऊन समोरच्यावर तुटून पडायचे
आणि मारायचे किंवा मरायचे. खरंच मरण इतकं स्वस्त असत का? या विचारातून कविता लिहिली गेली.
महाभारतातील युद्ध प्रसंगी सेने परस्परांसमोर ठाकल्या नंतर प्रत्यक्ष युद्ध बऱ्याच वेळाने सुरु झाले. कारण
भगवंताने अर्जुनाला १८ अध्यायांची गीता सांगितली तेव्हाच्या अस्वस्थतेच्या पार्श्वभूमीवर ही कविता केली
आहे. आजही लढवणारे लोकांना लढवून स्वतः: मजेत राहतात आणि लढणारे उगाच लढत राहतात .मग
आपण माणसे किड्या मुंगीचे जीवन का जगतो आणि कुणाच्या इच्छेने हे प्रश्न उरतातच.
अनिल जोशी
१९.०२.२०२०
कृपया आपली प्रतिक्रिया आपल्या नावासह द्यावी
Comments
Post a Comment