तुळशीबाग

कोणत्याही पुरुषाला काही शिक्षा द्यायची झाली तर सुटीच्या दिवशी बायकोबरोबर तुळशीबागेत जायची शिक्षा द्यावी. अर्थात तिथे वाईट असे काहीच नाही . फक्त प्रचंड गर्दी आणि त्या गर्दीतून वाट काढत काढत अपेक्षित खरेदी करणे हे दिव्य असते. विपुल प्रमाणत नॉव्हेल्टीज, पर्सेस, अंतर्वस्त्रे, ड्रेसेस , ओढण्या, कुर्ते , जीन्स आणि बरेच काही. शिवाय  राम मंदिराच्या भोवताली विविध भांडी, पितळी दिवे व पोळपाट. विळ्या अशा अनेक गोष्टी. पण बव्हंशी सगळे महिलांसाठी . पुरुषांने इथे यायचे ते हमाल, ड्रायव्हर व कॅशिअर म्हणून. आणि पूर्ण पेशन्स ठेवून हसतमुखाने वावरायचे.

परवा मी पाहत होतो अतिशय छोट्या जागेत हे दुकानदार भरपूर माल ठेवतात आणि ग्राहकाला पाहिजे ती वस्तू पटकन काढून देतात. शिवाय इथे सांगितल्या भावात कधीच होत नाही. घासाघीस ही ठरलेली असते. कितीही गर्दी व गडबड असली तरी घासाघीस निवांतपणे होत असते. मला असा प्रश्न पडतो की एवढ्या मोठ्या प्रमाणातील मालाचा हे लोक हिशेब कसा ठेवत असतील. कारण जास्त मालाचा साठा म्हणजे त्यात गोंधळ होण्याची शक्यता जास्त. हे आमचे व्यापार विषयक ज्ञान . त्यामुळे या प्रचंड मोठ्या मालाच्या साठ्याचे दडपण येते. दुकानान्व्यातिरिक्त फिरस्ते फेरीवाले पण असतात . यांच्याकडे वेगवेळी खेळणी असतात आणि आपल्या पालकांसोबत आलेली बालके पाहत असतात. काही भाग्यवान बालकांना ती मिळतात . बाकी त्या खेळण्यांकडे पाहत पाय ओढत चालत राहतात. एकाने तर त्या गर्दीत सुद्धा स्कूटर लावली. त्याची बायको खरेदी करत होती. कुरकुरणाऱ्या मुलासाठी त्याने खेळणे घेतले पण ते लगेच हवे म्हणून मुलाचा हट्ट करत होता आणि कशीबशी तो त्याची समजूत घालत होता आणि तेवढ्यात त्याची बायको आली पण तिला पाहिजे ती वस्तू मिळाली नव्हती. अखेर त्याने तिच्या ताब्यात मुलाला दिले व स्कूटरला किक मारली.

ही तुळशीबाग रात्री उशिरा पर्यंत जागी असते. हजारो नव्हे तर लाखो लोक इथल्या छोट्याशा जागेत खरेदीला येतात आणि खुश होवून जातात. कोणत्याही गावच्या स्त्रीला तुळशी बागेबद्दल आकर्षण असतेच. शहरात मॉल संस्कृतीने हातपाय पसरले आहेत. आज उच्चभ्रू लोक तुल्शीबागेकडे पाहत ही नाहीत. पण तुळशीबाग तशीच जिवंत आणि टवटवीत आहे. आणि ती तशीच राहणार यात शंका नाही. पूर्वी वाचल होत की मोरीशास च्या एक मंत्री ज्या मराठी होत्या त्यांनी भारत भेटीत तुळशी बागेत जावून पोळपाट किंवा तत्सम काहीतरी खरेदी केली होती.

अनिल जोशी 
०२.०२.२०२०

Comments

  1. अनिल, आमच्या संसाराची सुरुवातही तुळशीबागेतूनच झाली आहे. रजिस्टर्ड लग्न झाल्यानंतर इथेच स्वयंपाकातल्या सर्व उपकरणांची (परात, तवा, पोळपाट, लाटणं, जर्मनचे डबे, ताटं, वाटया, चमचे वगैरे ) खरेदी करुन रिक्षाने चाळीतल्या घरी आलो होतो. काय अप्रूप त्या खरेदीचं आणि रिक्षा प्रवासाचही ! आमच्या सौ. ह्या तिथल्या काही दुकानांच्या Loyal customer आहेत. उदा. सम्राट हे दुकान. इथे लोकरीच्या व तत्सम वस्तू मिळतात. अस्मादिक मात्र त्याच्या समोरच्या मिसळीच्या दुकानाचे Loyal customer.
    बाकी तू केलेलं वर्णन तंतोतंत खरय. बँक ऑफ महाराष्ट्रच्या साईडला एक फाफडयाचं दुकान होतं ( बहुधा दवे यांचं) तेथेही बऱ्याचदा गेलो आहे. तसच, कावरेंकडेही. असो. छान स्मरणरंजन झालं तुझ्या ब्लॉगमुळे. धन्यवाद ( अवी )

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

स्पेशल नात्याचे गाव - देवरुख

डोळे हे जुलमी गडे

राग मधुवंती