डाव मांडून भांडून मोडू नको
बऱ्याच दिवसांनी कुणी तरी भेटत आणि संवाद होतो आपण इतक्या दिवसात का भेटलो नाही? आपलं काही भांडण नाही. म्हणजे भांडण असेल तर संबंध दुरावतात. पण खरंच तसं असतं का? भांडण न होता पण संबंध दुरावलेले असू शकतात. या भांडणाच्या पण वेगवेगळ्या छटा आहेत. त्याचे एक स्वरूप म्हणजे मतभेद . आता मतभेद हे काही विषयांपुरतेच मर्यादित असल्याने तेवढे विषय वगळता संबंध ठीक राहू शकतात. भांडणाचीच अजून एक छटा म्हणजे ईर्षा किंवा द्वेष . या जरा गंभीर बाबी आहेत. या मुळे संबंध तुटतात व ते जोडणे अतिशय कठीण होते. याचीच पुढची पायरी म्हणजे वैर. हे तर महाभयंकर असते. इथे केवळ संबंध दुरावतात असे नाही तर बदला घेण्याची भावना निर्माण होते. आणि हे वैर पुढे कित्येक पिढ्यांपर्यंत चालू राहू शकते आणि पुढच्या काही पिढ्यांना हे वैर का आहे हे पण समजत नाही. याला खानदानी वैर म्हणतात.
भांडण या शब्दाची मराठीत फार साधी आणि सोपी व्याख्या केली आहे. भांडण म्हणजे भांड्याला भांडे लागणे त्यामुळे आवाज होतोच पण भांड्याला भांडे लागल्यानंतर जो ध्वनी निर्माण होतो तो कमी वेळात बंद पण होतो. भांडणाचे पण तसेच आहे. जसे सुरु होते तसेच ते शमते पण.
भांडणाबद्दल एक संवाद कट्यार काळजात घुसली या नाटकात कवी बांकेबिहारीच्या तोंडी आहे. खान साहेबांबरोबरचे
भांडण वर्णन करताना तो म्हणतो-
";खां साहेबांचा आणि माझा वाद झाला , तो पण तारसप्तकात. सामान्य लोक त्याला भांडण म्हणतात.";
दुसरा असाच संवाद पु ल देशपांडे यांच्या रावसाहेबांच्या तोंडी आहे. त्यांची कोर्टात एक केस चालू असते आणि
प्रतिपक्षी त्यांचा परिचित असतो. कोर्टात तारखेला येऊन तो रावसाहेबांच्या घरी न उतरता अन्य ठिकाणी उतरतो तेव्हा रावसाहेब म्हणतात -
अरे भांडण करायला कोर्टात वकील नेमले आहेत की. भांडू दे त्यांना. आपण का संबंध
तोडायचे?
हे झाले दिलदार भांडण.भांडण शक्यतो अळवावरच्या पाण्यासारखे असावे . भांडून , बोलून झाल्यावर पाण्यात काठी ने जसे तात्पुरते दोन भाग झाल्याचा आभास होतो व काठी काढून घेताच पाणी पुन्हा पाहिल्यासारखे होते तसे व्हावे. भांडण हे मनाच्या आरोग्यासाठी आवश्यक असले तरी ते वाढू न देणे शहाणपणाचे.
एका गाण्यात म्हटले आहे -
डाव मांडून भांडून मोडू नको.
म्हणजे मांडलेला डाव भांडून मोडायचा नाही. या एका ओळीत सारे सार आले आहे.
अनिल जोशी.
२४.०२.२०२०
कृपया आपली प्रतिक्रिया नावासह द्यावी
Chhan
ReplyDelete