यंत्र युगातील महाकाव्य

सकाळी उठून आवरता आवरता जर काही गाणी सुरु असली तर मन प्रसन्न होते व नवीन दिवसाची सुरुवात करायला हुरूप येतो. रेडिओ सिटी वर सकाळी ५.३० पासून मराठी गाणी सुरु असतात. यामध्ये बरीच नवनवीन गाणी ऐकायला मिळतात तर काही जुनी गाणी पण ऐकायला मिळतात. बऱ्याच वेळा तीच तीच गाणी रिपीट होतात. फक्त विनासायास संगीत कानावर पडत असते पूर्वी आकाशवाणी वर गीत रामायण म्हटले की कुश लव रामायण गती,पराधीन आहे जागती, दशरथा घे हे पायस दान,स्वयंवर झाले सीतेचे  अशी ठराविक गाणी ऐकायला मिळायची. गेले काही दिवस रेडिओ सिटी वर मात्र -
ज्येष्ठ तुझा पुत्र मला देई दशरथा, नको रे जाऊ रामराया, चला राघवा चला पहाया जनकाची मिथिला, अशी फारशी ऐकायला न मिळणारी गाणी पण लागतात. ही गाणी काही दिवस सतत कानावर पडत असल्याने त्यातील सौन्दर्य हळू हळू मनात झिरपत जाते.


गीत रामायण हा तास सुगम संगीतातील चमत्कार आहे. एका गुढी पाडव्याला पुणे आकाशवाणी वर सुरुवात झाली व वर्षभर ५२ गाणी करायची असे ठरले . पण त्यावर्षी नेमका अधिक महिना आल्याने ४ गाण्यांची भर पडली व ५६ गाणी झाली. १९८० मध्ये गीत रामायणाला २५ वर्षे झाली म्हणून एक मोठा सोहळा ७ दिवसांचा न्यू इंग्लिश स्कुल टिळक रोड येथे संपन्न झाला. त्याचे स्वरूप असे होते एखाद्या प्रमुख पाहुण्यांचे भाषण , मग अन्य भाषेतील काही गीत रामायणातील गाणी (बंगाली, हिंदी, गुजराती अशी) व मध्यंतरानंतर स्वतः: सुधीर फडके ८ गाणी क्रमाने सादर करत.

अतिशय देखणा व संस्मरणीय असा तो सोहळा होता. पाहुणे म्हणून अटलजी, वसंतराव साठे, यशवंतराव चव्हाण, बासू भट्टाचार्य ,दादा कोंडके असे मान्यवर आले होते. या कल्पनेचे जनक सीताकांत लाड यांचा पण त्या वेळी सत्कार झाला होता.

या सोहोळ्याच्या निमित्ताने अनेक आठवणींना उजाळा मिळाला. बाबूजी म्हणाले होते की हे गीत रामायण कोणत्या तरी शक्तीने आमच्याकडून करून घेतले. असे पुन्हा होणे नाही. पहिल्या गाण्याच्या वेळी गाणे हरवणे व माडगूळकरांनी ते पुन्हा लिहून देणे, आयत्या वेळी गाणे मिळाल्यावर रिक्षातून आकाशवाणीवर जाताजाता चाल करणे सगळेच अद्भुत होते.बाबूजी म्हणाले होते अनेक चित्रपट गीते करता करता काही तरी संस्कारक्षम करावं या उद्देशाने ही निर्मिती झाली.

माडगूळकरांच्या प्रतिभेला तर विलक्षण बाहेर आलेला होता. संगीत सहाय्यक प्रभाकर जोग नेहेमी माडगूळकरांकडे गाणे घ्यायला जात . ते सांगत होते की तुळशी रामायण समोर ठेवून माड्गुकर बसलेले असायचे. त्यातील एखादा प्रसंग भावला की त्यावर ८-९ कडव्यांवे गाणे एका ओघात लिहायचे. काय विलक्षण प्रतिभा. आणि माडगूळकर फडके म्हणजे शब्द सुरांचे जणू अद्वैतच. अशा अनेक सुरेल रचना या जोडीने केल्या आणि गीत रामायण हा त्यावरचा कळस.

आपल्या प्रासादिक शब्दांसोबत माडगूळकर सुरेख तत्वज्ञान पण सांगतात.
दोन ओंडक्यांची होते सागरात भेट एक लाट तोंडी दोघा पुन्हा नाही गाठ
अशी अनेक वचने आढळतात यासाठी बाबूजींनी भारतीय शास्त्रीय संगीताचा केलेला वापर , राग व ताल यांची
विविधता थक्क करणारी आहे. शब्द आणि सूर याबरोबरच माडगूळकरांच्या रचनांमधील चित्रमयता पण भावते. सगळं प्रसंग डोळ्यांसमोर उभा राहतात .नंतर गीत रामायणाचा सुवर्ण महोत्सव सकाळ समूहाने रमण बागेत केला होता. रौप्य महोत्सवी वर्षाची आठवण म्हणून मुद्दाम अटलजींना बोलावले होते. आणि पंतप्रधान पदाच्या जबाबदाऱ्या असतांना पण गीत रामायणाच्या प्रेमापोटी अटलजी आले. फक अचानक पावसाने कार्यक्रमाचा विचका केला. त्यांचे भाषण झाले इतकेच.
माता न तूं, वैरिणी
अश्वपतीची नव्हेस कन्या, नव्हेस माझी माय
धर्मात्म्यांच्या वंशी कृत्या निपजे, नांदे काय?
वध नाथाचा करील मूढे, पतिव्रता का कुणी?
शाखेसह तूं वृक्ष तोडिला, फळां इच्छिसी वाढ
आत्मघातकी ज्ञानाचे या गातील भाट पवाड
स्वीकारिन मी राज्य तुझ्यास्तव, कीर्ती होईल दुणी
वनांत भ्रात्या धाडिलेंस तूं, स्वर्गि धाडिले तात
श्रीरामांते वल्कल देतां कां नच जळले हात?
उभी न राही पळभर येथें, काळें कर जा वनीं
निराधार हा भरत पोरका, कुठें आसरा आज?
निपुत्रिके, तूं मिरव लेवुनी वैधव्याचा साज
पडो न छाया तुझी पापिणी, सदनीं, सिहासनीं
तुला पाहतां तृषार्त होते या खड्गाची धार
श्रीरामांची माय परि तूं, कसा करूं मी वार?
कुपुत्र म्हणतिल मला कैकयी, माता दोघीजणी
कसा शांतवूं शब्दानें मी कौसल्येचा शोक
सुमित्रेस त्या उदासवाणे गमतिल तिन्ही लोक
कुठल्या वचनें नगरजनांची करुं मी समजावणी?
वनाहुनीही उजाड झालें रामाविण हें धाम
वनांत हिंडुन धुंडुन आणिन परत प्रभु श्रीराम
नका आडवे येउं आतां कुणी माझिया पणीं
चला सुमंता, द्या सेनेला एक आपुल्या हांक
श्रीरामाला शोधण्यास्तव निघोत नजरा लाख
अभिषेकास्तव घ्या सांगातीं वेदजाणते मुनी
असेल तेथें श्रीरामाचा मुकुट अर्पिणें त्यास
हाच एकला ध्यास, येथुनी हीच एकली आस
काळरात्रसी रहा इथें तूं आक्रंदत विजनीं

रौप्य महोत्सवी कार्यक्रमाच्या वेळी माडगूळकर नव्हते , सुवर्ण महोत्सवी वर्षात बाबूजी नव्हते. पण आनंद माडगूळकर,हृषीकेश रानडे यांनी ती कमतरता जाणवू दिली नाही. यंत्रयुगातील महाकाव्य आशा शब्दात ज्येष्ठ लेखक दि बा मोकाशी यांनी गीत रामायणाला संबोधले आहे ते यथार्थच आहे.काळ हा कुणासाठी थांबत नसतो. तो प्रवाही असतो.
जो वर या भूमीवर रामनाम आहे तोवर गीत रामायण राहणार.

अनिल जोशी
२५.०२.२०२०
कृपया आपली प्रतिक्रिया आपल्या नावानिशी द्यावी.

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

स्पेशल नात्याचे गाव - देवरुख

डोळे हे जुलमी गडे

राग मधुवंती