असा ही एक मेघ मल्हार

भारतीय संगीताला थोर परंपरा आहे तसाच मोठा इतिहास पण आहे. आणि इतिहास म्हटला की त्यात आख्यायिका पण येतात. काही आख्यायिका इतक्या विलोभनीय असतात की लेखक त्यावर लिहायला उद्युक्त होतात. भारतीय संगीताचा इतिहास तानसेन हे नाव घेतल्याशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही. या संगीत नायका भोवती अनेक आख्यायिका सांगितल्या जातात. त्यातील एक आख्यायिका आज आठवली. या आख्यायिकेंतून प्रेरणा घेत सुमती क्षेत्रमाडे यांनी मेघमल्हार ही कादंबरी लिहिली.
एकदा दरबारात ईर्षेला पेटून तानसेन दीप राग गातो. गायन संपते पण त्या रंगामुळे त्याच्या शरीरात दाह उत्पन्न होतो आणि तो काही केल्या शांत होत नाही. आणि मग तानसेन राजधानी सोडून बाहेर पडतो की जेणेकरून त्याच्या शरीराचा दाह कमी होईल .फिरत फिरत तो गुजरात प्रांतात येतो आणि त्याचे वास्तव्य एका धर्मशाळेत असते. त्या धर्मशाळेजवळच एक तळे असते. त्या तळ्यावर पाणी भरायला दोन मुली येतात. पाण्यात घागर बुडवताना बूड बूड असा आवाज येतो. त्या आवाजातून त्या स्वर काढत असतात. त्या अक्षरश: सुरांशी लडिवाळ पणे खेळत असतात.त्या वेगवेगळ्या सुरावटी काढत असतात व त्याचा आनंद घेत असतात. मग त्या मेघमल्हारचे सूर काढतात. आणि मेघमल्हारच्या त्या सुरावटी ऐकून तानसेनच्या शरीराचा दाह कमी व्हायला लागतो. त्याला आश्चर्य वाटते या मुली घागरीच्या बुडबुड आवाजातून इतके सच्चे सूर काढू शकतात तर यांच्या गायनाची तयारी किती असेल. मग तानसेन शोध घेत त्या मुलींच्या घरी येतो व त्यांचे गायन ऐकायची इच्छा व्यक्त करतो. त्या खानदानी स्त्रीया असल्याने त्या परक्या पुरुषांसमोर गाणार नाहीत असे त्याला सांगितले जाते. मग तानसेन आपली ओळख देतो व या सुरांच्या थोड्या शिडकाव्याने त्याचा दाह कमी झालेला असतो तो पूर्ण शांत करण्यासाठी तरी त्यांचे गायन ऐकवा अशी विनंती करतो.मग एकदम घरगुती मैफलीत त्या दोघी ज्यांची नावे ताना व रीरी असतात धुवाधार मेघमल्हार गातात आणि तानसेनच्या शरीराचा दाह पूर्ण शांत होतो.
पुढे तानसेन सांगतो ही रत्ने अशीच जपून ठेवा. यांची कीर्ती बादशहा पर्यंत पोचली तर त्यांच्या प्राप्तीसाठी युद्ध होईल.पुढे तानसेनची भविष्यवाणी खरी ठरते आणि त्यावरच सुमती क्षेत्रमाडे यांनी मेघमल्हार ही कादंबरी लिहिली आहे.
ही दंतकथा किंवा आख्यायिकाच इतकी विलोभनीय आहे की खूप वर्षांपूर्वी वाचलेली असून तिची आठवण ताजी आहे. यावर असे पण ऐकले आहे की त्या दोघींची स्मृती म्हणून बऱ्याच तराण्यांमध्ये ताना रीरी हे बोल वापरले जातात. याच्या सत्यासत्यतेत न जात या आख्यायिका किंवा दंतकथांचा आस्वाद घेणे आनंददायी आहे.
अगदी अजहू न आये बालमा सावन बिता जाये
अशी अवस्था होते मनाची.
अनिल जोशी
२६.०२.२०२०
कृपया आपली प्रतिक्रिया आपल्या नावासह द्यावी.
Comments
Post a Comment