झुंड एक प्रवृत्ती

आदिमानव जेव्हा एकटा न राहता कळपाने राहू लागला तेव्हा कळपाचे नियम, त्याच्या प्रेरणा,संवेदना या त्या व्यक्तीमधे पण पाझरतात. मग त्या कळपावर नियंत्रण ठेवण्याची उर्मी असो किंवा दुसर्या कळपावर अधिराज्य गाजवण्याची आकांक्शा असो हे व्यक्तीमधून कळपामधे परावर्तित होताना परिवर्तन होतेच.
अशा कळपाच्या झुंडीत रुपांतर होते.आणि या झुंडीला कसलेच विधीनिषेध नसतात.आणि ही झुंड मग नरपराधांचे बळी घेते.
अशाच आशयावर समर खडस यांचे झुंड हे नाटक रंगमंचावर आले आहे. ते स्वतः पत्रकार असल्याने आशयासाठी पत्रकार हे माध्यम निवडले आहे.पत्रकार हे कितीही स्वतंत्र विचारांचे असले तरी ते माध्यमाच्या बलदंड चौकटीत बंदिस्त झालेले असतात.त्यांची तडफड दाखवण्याचा इथे प्रयत्न आहे. एक निर्बुद्ध बॊस,त्याच्या पुढे पुढे करणारा एक सहाय्यक व इतर पत्रकार.अशीच एक रुटीन मिटिंग नाटकाची सुरुवात करते.मग सगळे ऒफिसात जाण्यापूर्वी कॆंटीनला टाईमपास मग थोडेसे काम व पहिला अंक संपतो. पूर्ण प्रभावहीन.मिटिंगमधे वरवरची राजकीय शेरेबाजी,कॆंटीन मधे बॊसची टिंगल जी सर्वच ठिकाणी होते व सर्वांचे आपल्या बॊसबद्दल साधारण असेच मत असते व त्याची टिंगल हा सर्वमान्य टाइमपास असतो. या अंगात थोड्या पात्रपरिचयाशिवाय काहीच घडत नाही.
 दुसर्या अंकात त्यातील जरा जहाल व्यक्तिमत्च्या पत्रकारावर शिस्तभंगाची कारवाई होणार असते.या चौकशी दरम्यान आरोपाबद्दल सफाई देण्याऐवजी मुळात जो नियमभंग घडला त्या नियमालाच आव्हान देतो. त्याच्या मते आरोपीला गुन्हेगार ठरवून झाले आहे त्यामुळे सत्य कुणालाच शोधायचे नाही. दिसते ते सत्य नसते आणि ते तर्काच्या पलिकडे असते ते पाहता आले पाहिजे. उतर सहकारी तडजोड करुन नोकरी टिकवायचा सल्ला देतात पण हा राजीनामा पाठवून देतो. बाकीचे सहकारी त्याचे हौतात्म्य हाताशपणे पाहतात.
इथे हा संघर्ष अतिशय उथळपणे मांडला आहे. वास्तविक हा आहेरे आणि नाहीरे मधील सनातन संघर्ष आहे त्या ऐवजी ठसन ला मुस्लीम दाखवून संघर्ष ठोकळेबाज केला आहे.वैचारिक चर्चा हा या नाटकाचा गाभा आहे आणि ती चर्चा फार वरवरची, शेरेबाजी वजा झाली आहे. ठसन हा डाव्या विचारसरणीचा आहे पण सेवा दलातील एक उल्लेख सोडला तर बाकी कुठेच ते जाणवत नाही. रवी पटवर्धन हे मंदबुद्धे बॊस म्हणून शोभतात.नंदू गाडगीळ यांना बॊसची मर्जी व सहकार्यांना एकाच वेळी सांभाळण्याची कसरत आपल्या अभिनयातून साकारण्याची छान संधी लाभली आहे. ठसन ची व्यक्तिरेखा बव्हंशी संवादातून साकारली आहे. त्या मानाने बावनकुळे ही व्यक्तीरेखा खरी वाटते. बाकी दोन सहकारी म्हणजे तुमाने हे सतत दबलेले तर दुसरे सहकारी निव्वळ वाचाळवीर. द्रौपदी मॆडमची व्यक्तिरेख एकदम टिपिकल.चर्चा महत्वाची बाकी व्यक्तीगत अभिनय व मंचावरील वावर यालाही महत्व नाही.पण ऒफिस,कॊन्फरन्स रुम व कॆंटीन अशी तीन लोकेशन असलेला सेट मात्र कल्पकतेने लावला आहे.
एकूण नाटक म्हणजे अपेक्षा भंग आहे. मान्यवरांनी खूप चांगल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.पण त्या औपचारिक असाव्यात कारण तोंडावर सगळेच स्तुती करतात.
अनिल जोशी
०९.०२.२०२०

Comments

  1. गद्य नाटके मला आवडत नाहीत. अष्टकोने या कलाकारा साठी नाटक बघितले, त्या व्यक्तीला भेटलो. इतर ओळखीचे मित्र, शाळेपासुनचे होतेच तो आनंद जात होता. द्रौपदि कलाकार छान दिसल्या, अगदि कुलवधु नाटकातील भानुप्रमाणे आकर्षक वेष. पण आरोपीची चौकशी करणारी स्त्री हि कठोर दिसली पाहीजे, नाजुक-साजुक का दाखवली? तसेच मंदबुद्धे व द्रौपदि लांब बसून आरोप प्रत्यारोप करतात, त्यामुळे चौकशीपेक्षा ऑफीसमधील एक भांडण वाटले. शिवाय चौकशीचा अंतिम निर्णय काय झाला, फक्त राजीनामाच कसा दाखवला? त्यामुळे नाटक वठले नाही. हे व्यावसायिक करण्यात खूप मोठे धाडस केले आहे एवढे खरे. नेपथ्य, रंगमंच ठिक आहे.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

स्पेशल नात्याचे गाव - देवरुख

डोळे हे जुलमी गडे

राग मधुवंती