हे आपलेच हात

कुणी धड धाकट जर भीक मागत असेल तर आपण म्हणतो अरे देवाने दोन हात दिलेत ते काय भीक
मागायला? थोडक्यात त्या हातांचा वापर काही काम करण्यासाठी व्हावा अशी अपेक्षा असते. माडगूळकर
पण म्हणून गेले आहेत.-
जिथे राबती हात तेथे हरी
म्हणजेच काम आणि कर्म इथेच परमेश्वराचे वास्तव्य असते. एखाद्या कलाकाराच्या बाबतीत आपण सहज म्हणून जातो त्याच्या हातात जादू आहे. असे जादुई हात अनेक करामती करून जातात. काही हातांचे कौशल्य जसे असेल तसे त्या हातांना म्हटले जाते. म्हणजे तांत्रिक हात ( Technical Hand ) ज्या हातांनी तांत्रिक कामे कुशलतेने होतात.
दुसरा प्रकार म्हणजे शल्यविशारद हात (surgical hand ) या प्रकारच्या हातात शस्त्रक्रियेचे कौशल्य असते. असे पण ऐकले आहे की surgery ला प्रवेश देताना मार्कंबरोबर हातांचे कौशल्य पहिले जाते. अति कुशल हात असतील तर डोळ्यांच्या शास्त्रक्रियेसासाठी प्रवेश दिला जातो. त्या खालोखाल हृदय व त्या नंतर पोटाच्या
शस्त्रक्रियांचा क्रमांक लागतो .शेवटी अस्थिरोग शस्त्रक्रिया येते.
अशी हातांची गम्मत असते .मग विचार करता करता पुढील ओळी सुचल्या.
हातात हात घेतला
तर मैत्री होते
दोन्ही हात जोडले
तर भक्ती होते..
हातावर हात आपटला
तर टाळी होते
कुणाला हात दिला
तर मदत होते
कुणाला हात दाखवला
तर धमकी होते
हात वर केले
तर असहाय्यता दिसते
हातावर हात ठेवले
तर निष्क्रियता दिसते
हात पुढे केला
तर मदत दिसते
हात पसरले
तर मागणी होते
हातांचं महत्व इतकं
अनेक हात पुढे आले
तर अशक्य ते शक्य होते
साने गुरुजींनी एक देशभक्तीपर गीत लिहिले त्यात सुद्धा देश बांधवाना हातात हात घालून अशीच अपेक्षा
व्यक्त केली आहे.
हातात हात घालून
हृदयास हृदय जोडून
ऐक्याचा मंत्र जपून
या कार्य करायला हो
करी दिव्य पताका घेऊ
हे हात कार्य् पताका हाती घेण्यासाठी ,दान देण्ण्यासाठी आहेत, ना भिक मागण्यासाठी.
अनिल जोशी
०१.०३.२०२०
कृपया आपली प्रतिक्रिया आपल्या नावासह द्यावी.
Comments
Post a Comment