चहाची वेळ



आमच्या घराजवळच्या एका दुकानात पाटी आहे- चहाला वेळ नसते पण वेळेला चहाच लागतो. त्या दुकानदाराच्या कल्पकतेला दाद द्यायला पाहिजे. कमीत कमी शब्दात मोठा अर्थ सामावला असेल आणि आपली पण तीच अनुभूती असेल तर दिल खूष तर होणारच ना.
पूर्वी चहा घ्यायची पद्धत नव्हती म्हणे आणि ती प्रचलित केली ब्रिटीशानी. पण हे तितकेसे पटत नाही करण चहा उत्पादनाच्या बाबतीत आपला क्रमांक बराच वर आहे. म्हणजे कदाचित महाराष्ट्रात ती पद्धत नसेल पण आसाम ,बंगाल इथे ती असावी. पण वाफाळलेल्या चहाचे घुटके घ्याचचे सोडून उगाच निष्फळ चर्चा कशाला?
सकाळ झाल्यावर चहा हे महत्वाचे आन्हिक झाले आहे. नंतर थोड्या वेळाने नाश्ता झाल्यावर चहा म्हणजे सोनेपे सुहागा आणि जेवायला जर वेळ असेल तर मध्ये एखादा चहाचा राउंड होतोच.
जेवणानंतर दोन अडीच तासांनी तीनच्या सुमारास एक चहा हवाच. मला तीनच्या चहाची सवय आहे. तेव्हा मी चहा घेत होतो तेव्हा कंपनीत नव्याने रुजू झालेले पण शनवार पेठेत आमच्या घराजवळ राहणारे श्री. पानसर मला क्रॉस झाले आणि पुढे गेलेले ते परत फिरले व मला म्हणाले - पेठेतले लोक तीनची वेळ नाही चुकवणार.यावरून आणखी एक आठवण आहे. आमच्या गावाला गणपतीत किंवा अन्य कार्यक्रमाच्या निमित्ताने सगळे जमले की उत्साहाचे वातावरण असायचे. साधारण एक दीड वाजता पुरुषांची जेवणे व्हायची . जेवण झाल्यावर ते वामकुक्षी घेत. मग बायकांची पंगत पण जेवणापेक्षा गप्पा जास्त. जेवणे झाली व हात कोरडे झाले तरी गप्पा , हास्यविनोद सुरूच. दरम्यान पुरुषांची डुलकी काढून झालेली असायची व ते जागे झाले आवाज यायचा तीन वाजले , चहा टाका. यावर बायकांच्या मनात जी धुसफूस व्हायची आणि मानत एकच विचार यांच्या झोपा झाल्या पण बायकांना थोडं म्हणून पडायची सोय नाही.
चहाला वेळ नसली तरी काही वेळा या फक्त चहाच्याच असतात. हॉटेलवर राहत असताना पुण्यात कडकडीत बंद होता आणि आम्हाला दुपारी कुठेही चहा मिळत नव्हता. मग मी व एक मित्र ज्याच्या घरी सहसा जाणे होत नसे त्याच्याकडे सहज म्हणून गेलो. सक्तीची सुटी होती. इकडच्या इकडच्या गप्पा झाल्या पण चहाचा विषय काही निघेना. मित्राला आमची खास खातिरदारी करायची असावी. कुणी पाहत नाही हे पाहून त्याने कपाटातून छोटी Doctors Brandy ची बाटली काढली व आम्हाला दोन दोन बुचे प्यायला दिली. घसा जाळत ती घशाखाली उतरली . मग आम्ही होस्टेल वर परत आलो. संध्याकाळी सहा नंतर बंद मगे घेण्यात आला तेव्हा हॉटेले उघडल्यावर आधी चहा पिवून चहाचा उपास सोडला.
प्रवासात वाटेत रात्री उशिरा गाडी एखाद्या स्टेशन वर बराच वेळ थांबते व गाडी थांबल्यामुळे त्या गतीत लागलेली झोप मोडते. अशावेळी किटली घेवून आलेला चहावाला हा देवदूत वाटतो. एकदा आमच्या गावाला गेलो असताना गणपती पुळ्याला चालत गेलो होतो. समुद्र स्नान व नंतर गोड्या पाण्याचे स्नान झाले. केळकर गुरुजींकडे खास मोदकांचे जेवण झाले. नंतर परतीच्या प्रवासात पाणी पिण्यासाठी म्हणून एका घरात गेलो. बाप्पा बसलेले होते. मुंबईकर पावणे आलेले. दर्शन घेतले , पाणी प्यायलो व निघताना यजमान म्हणाले अहो थांबा चहा टाकलाय. तुमच्या गावाकडे जाई पर्यंत चहा कुठेच मिळणार नाही. आणि तुम्ही शहरातले लोक, चहा शिवाय कसे होणार? आम्हाला भरून आल आणि जाणवलं परमेश्वर आहे , नक्कीच आहे. ही घटना १९७९ मधील. पण आता काही वर्षांपूर्वी गौरी विसर्जनाच्या दिवशी आमच्या दोन गाड्या पुण्याकडे निघाल्या . थोड्या थोड्या अंतराने. गाडी आंबा घाट चढून वर आल्यानंतर आमची पहिली गाडी एका उपहार गृहापाशी दिसली. ते म्हणाले आम्हाला चहा हवा होता पण हातखंबा , पाली, साखरपा कुठे पण चहा साठी कोणतेही हॉटेल उघडे नव्हते. कोकण म्हणजे कोकण . गणपती म्हटले की अपील नाही.
१९७० मध्ये संघ शिक्षा वर्गाला गेलो असताना चा अनुभव. नाशिक येथे मुंबई,ठाणे, नाशिक ,जळगाव व धुळे येथील स्वयंसेवक होते तर उर्वरित जिल्ह्यातील स्वयंसेवकांचा वर्ग पुण्यात होता. प्रांत संघचालक बाबाराव भिडे नाशिकला आले असताना म्हणाले पुण्याच्या वर्गात कॅन्टीन ला चहा अजिबात खपत नाही. बहुधा मुंबईचे लोक इथे आहेत म्हणून असेल.
पहिली सोळा वर्षे मी चहा अजिबात घेत नसे. सकाळी आई कॉफी करून द्यायची पण इतर वेळेला काहीच नको असायचे. कुणाकडे गेल्यावर चहा घेत नाही म्हटल्यावर ते विचारत की कॉफी किंवा दुध घ्या पण मला काहीच नको असायचे. यासाठी पण संघ च जबाबदार ठरला. एकदा आम्ही काही स्वयंसेवक (खरे तर पोरेच) एका व्यक्तीला का उत्सवाचे निमंत्रण द्यायला गेलो. बोलणे झाल्यावर त्यांनी विचारले सगळे चहा घेता ना? इथे नाही म्हणायला माझी चुळबुळ सुरु झाली ती शेजारच्या रमेश बापट यांच्या लक्षात आले. आता मी चहा घेत नाही म्हटल्यावर त्यंनी कॉफी केली असती तर चहाबाज रमेश बापट ला चालले नसते. त्याने माझ्या मांडीवर हात दाबून माझी चुळबुळ थांबवली. मग मी चहाबाज झालो . यातील एक सोय म्हणजे कुणी चहा घेता ना? असे विचारले तर सगळे प्रश्न एकदम निकालात निघतात.
वयोपरत्वे माझे दात दुखायला लागले. ती दातांची मुळे काढून टाकून कवळी बसवण्याचा सल्ला डॉक्टर नी दिला तो तितकासा पटला नाही. मग दात कधी दुखतात याचे संशोधन केले तेव्हा लक्षात आले की चहा प्यायल्यावर दात दुखतात.याची करणे दोन चहा गोड असतो आणि गरम पण. गरम चहा या बाबत तडजोड नाही मग बिनसाखरेचा चहा प्यायला सुरुवात केली आणि परिणामी दात दुखी बंद झाली.
आमच्या ऊतमकथा च्या संपादक व ज्येष्ठ कादंबरीकार वैजयंती काळे याच्याकडे जाणे होत असते. पहिल्यांदाच गेलो तेव्हा अकरा वाजून गेले होते . त्या म्हणाल्या चहा ठेवते . मी म्हटले अहो कशाला त्रास घेताय? यावर त्यांचे उत्तर चहा करण्यात कसला आला आहे त्रास? आणि तुमच्याबरोबर मला पण चहा घेता येईल.मग साखर नको म्हटल्यावर -डॉक्टरनी साखर सोडायला सांगितली का? असा प्रश्न . आता त्यामुळे या विषयावर चर्चा नाही. गेल्यावर चहा घेवूनच जिना उतरायचा हे ठरलेले आहे.
चहा सोबत छान गप्पाष्टके रंगतात. मैत्री दृढ होते. आणि आता तर चहावाल्याला चहावाला म्हणायची सोय पण राहिली नाही.


एक कप चहा
असतो खूप स्पेशल,
प्रत्येक घोट घेत घेत
होतो आपण सोशल...
एक कप संपेपर्यंत
रंगतात खूप सार्‍या गप्पा,
मोजक्या कामाच्या अाणि
बाकी बिनकामाच्या थापा...
येणा जाणार्‍या लोकांवर
फिरत असते नजर,
तेवढाच वेळ का होईना
टेन्शन चा पडतो विसर..
एक कप चहा
उन, पाऊस आणि थंडीत
वेगळीच गोडी घेऊन
आणखी होतो स्पेशल...
मंगेश फुलारी 
असे हे पृथ्वी वरील अमृत . 
अनिल जोशी 
१३.०३.२०२० 
कृपया आपली प्रतिक्रिया आपल्या नावासह द्यावी.

Comments

  1. The best एकच जाणवले की नुसता चहाचं आवडत नाही, तर चहावरचा लेखही तरतरी आणतो --- सूरेश खैरनार

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

स्पेशल नात्याचे गाव - देवरुख

डोळे हे जुलमी गडे

राग मधुवंती