४३ वर्षांपूर्वी असं घडलं होत

Image result for १९७७च्या निवडणुकांची चित्रेImage result for १९७७च्या निवडणुकांची चित्रेImage result for जय प्रकाश नारायण फोटो

(इंदिरा गांधी, मोरारजी देसाई व जयप्रकाश नारायण )
आज २० मार्च. ही तारीख पहिली आणि मन ४३ वर्षे मागे गेलं . असं काय घडलं होत त्या दिवशी? त्या दिवशी एक इतिहास रचला गेला. ३० वर्षांच्या गृहितकांना धक्का बसला होता किंवा आजच्या पत्रकारितेच्या भाषेत दणका बसला होता.
त्या दिवशी लोकसभेच्या झालेल्या निवडणुकांचे निकाल जाहीर होत होते. त्या दिवशी पण कुठेतरी मतदान असल्याने ते संपल्यावर निकाल -कल -जाहीर होवू लागले. मी ऑफिस मधून येत होतो. आम्ही तेव्हा येरवडा येथे राहत होतो आणि घरी येण्यासाठी एका झोपड पट्टीतून चालत जावे लागत असे. त्या वस्तीत मोठ्या आवाजात रेडिओ लावला होता आणि बर्याच ठिकाणी कॉंग्रेस विरोधी उमेदवार कॉंग्रेस उमेदवाराच्या पुढे होते.असे प्रथमच घडत होते. आतापर्यंत तुरळक अपवाद वगळता कॉंग्रेस उमेदवार निवडून यायची परंपरा होती. कॉंग्रेस अपराजित होती. तसा कॉंग्रेस चा विरोधकांनी १९६७ मध्ये काही राज्यात पराभव केला होता. पण विरोधक एकसंध नव्हते. आणि त्यावेळी इंदिरा गांधी यांनी नुकतीच सत्ता स्वीकारली होती. ती सरकारे लवकरच गडगडली आणि कॉंग्रेस चे एकछत्री साम्राज्य उभे राहिले. १९६९ मध्ये कॉंग्रेस विभाजनानंतर इंदिराजीनी पक्षावर, सरकारवर व देशावर मजबूत पकड जमवली. १९७१ मध्ये लोकसभेच्या मध्यावधी निवडणुकीत २/३ बहुमत मिळवले. १९७२ मध्ये बंगला देश निर्मिती करून पाकिस्तानचे विभाजन केले आणि त्या देशाच्या गळ्यातील ताईत बनल्या. पण युद्धाचा खर्च आणि १९७३ मध्ये पडलेला भीषण दुष्काळ यामुळे अर्थव्यवस्था डबघाईला आली. अनेक जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा जाणवू लागला. महागाई व टंचाई यामुळे जनता जेरीला आली. त्या बरोबरच सरकार मधील काही नेत्यांची भ्रष्टाचाराची प्रकरणे बाहेर येवू लागली व त्यांना पाठीशी घातले जात असल्याची भावना बळावत चालली होती. गुजरात मध्ये विद्यार्थ्यांचे एक नाव निर्माण आंदोलन उभे राहिले आणि तत्कालीन कॉंग्रेस मुख्यमंत्र्यांना सत्ता सोडावी लागली आणि गुजरात मध्ये विधानसभेत कॉंग्रेस पक्षाचा पराभव झाला. यातून प्रेरणा घेवून बिहार मध्ये विद्यार्थी आंदोलन सुरु झाले ज्याचे नेतृत्व ज्येष्ठ नेते जयप्रकाश नारायण यांनी स्वीकारले. दरम्यान इंदिरा गांधी यांना आणखी एक धक्का बसला की १०७१ मध्ये त्या ज्या रायबरेली मतदार संघातून निवडून आल्या होत्या तेथील त्यांची निवड अलाहाबाद हायकोर्टाने रद्द ठरवली होती .( १२ जून १९७५) . मग परिस्थितीवर ताबा मिळवण्यासाठी इंदिरा गांधी यांनी देशांतर्गत आणीबाणी लावली. (२६ जून १९७५) सर्व विरोधकांची रवानगी तुरुंगात केली गेली. वर्तमान पत्रे सेन्सॉर मान्यतेशिवाय काही छापू शकत नव्हती. अगदी १९७६ च्या साहित्य संमेलनात अध्यक्षा थोर विदुषी यांनी भाषण स्वातंत्र्याचा संकोच केल्याबद्दल आवाज उठवला तेव्हा त्यांची रवानगी पण तुरुंगात केली गेली. घटना दुरुस्ती करून लोकसभेची मुदत ५ वरून ६ वर्षे केली .
त्यानुसार जानेवारी १९७७ मध्ये लोकसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या. विरोधकांची सुटका केली गेली होती. त्यांच्याकडे तयारीला खूप कमी वेळ होता. पुण्याचे तत्कालीन खासदार व मंत्री कै मोहन धारिया यांनी जयप्रकाश नारायण यांच्याशी इंदिरा गांधी यांनी संवाद साधावा अशी मागणी केली व मंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. त्यांच्या बरोबर त्यांचे सहकारी ज्यांना तरुण तुर्क म्हटले जायचे ज्यात चंद्रशेखर यांचा पण समावेश होता. विरोधकांमध्ये एकत्र येवून कॉंग्रेस चा पराभव करावा असा विचार सुरु होता. पण अशी आघाडी फारशी यशस्वी होत नाही असा अनुभव होता मग एक पक्ष स्थापन करायच्या हालचाली सुरु झाल्या.
२६ जानेवारीला रात्री आम्ही काही मित्र गोव्याला ट्रीपला निघालो होतो. रात्री गाडीत आमच्या सोबत इचलकरंजी येथील दोन कार्यकर्ते होते. त्यांच्या बोलण्यातून समजले की जनता पक्ष स्थापन झाला असून त्या पक्षातर्फे पुण्यातून मोहन धारिया निवडणूक लढवणार असे ठरले आहे. त्यांच्याकडून असे पण समजले की मागच्या गाडीने तत्कालीन जनसंघाचे नेते जगनाथ राव जोशी हे येत असून ते मिरज येथे उतरून पुढे धारवाड ला जाणार आहेत. आम्ही मिरज ला गोव्याच्या गाडीत बसलो होतो . गाडी सुटायला वेळ होता आणि त्या वेळी महालक्ष्मी एक्स्प्रेस आली . जगन्नाथ राव उतरले . आम्ही त्यांना भेटायची संधी सोडली नाही . त्यांनी आमच्याशी छान संवाद साधला आणि सांगितले की १ तारखेला ते पुण्यात प्रचाराचा नारळ फोडायला यणार आहेत. १ फेब्रुवारी नंतर दीड महिना प्रचाराने वातावरण ढवळून निघाले होते. विरोधकांच्या दृष्टीने ही निवडणूक इस पार या उस पार अशी होती. कारण या निवडणुकीत कॉंग्रेस जिंकली -जी शक्यता जास्त होती - तर आणीबाणीला जनतेचा पाठींबा आहे असा निष्कर्ष निघाला असता. पण ही निवडणूक जनता पक्षाने नाही तर जनतेने लढवली होती . म्हणून या निवडणुकीच्या निकालांसाठी ही पार्श्वभूमी माहित असणे आवश्यक आहे.
घरी आल्यानंतर जेव्हा आकाशवाणी वर बातम्या ऐकू लागलो तेव्हा आकाशवाणी ने फक्त जाहीर निकालच सांगायला सुरुवात केली . दर एक तासाने बातमी पत्र असायचे. रात्री १२ वाजता पुण्यातून मोहन धारिया निवडून आल्याचे सांगितले गेले . रात्री तीन वाजता ती ऐतिहासिक बातमी दिली गेली. बातमी अशी दिली गेली होती-
अभी भी रायबरेली चुनाव क्षेत्रसे चुनाव परिणाम आया है. मोठा पॉज. कॉंग्रेस की प्रत्याशी इंदिरा गांधी भारतीय लोक दल के प्रत्याशी राज नारायण से चुनाव हार गयी है. 
आम्ही कुणालाही मतपेटीतून पराभूत करू शकतो हा भारतीय मतदारांनी राजकारण्यांना दिलेला हा धडा होता. आणि यासाठी २० मार्च हा दिवस महत्वाचा आहे.

अनिल जोशी
२०.०३.२०२०
कृपया आपली प्रतिक्रिया नावासह द्यावी. 

Comments

  1. आठवणी जाग्या झाल्या...सही
    धनश्री जोशी

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

स्पेशल नात्याचे गाव - देवरुख

डोळे हे जुलमी गडे

राग मधुवंती