एक कवी बहरत होता
१९७२ साल होते. मी पुण्यात शिक्षणाला येवून स्थिरावलो होतो. दुसरे शैक्षणिक वर्ष सुरु झाले होते. पुणे विद्यार्थी गृहाच्या सदाचार वसती गृहात दुसरे वर्ष सुरु झाले होते. काही नवीन विद्यार्थी आले होते. नवीन ओळखी होत होत्या. अशीच एक ओळख कधीतरी झाली. साधारण शरीर यष्टी , बोलका चेहेरा व स्वभाव. त्याने परिचय करून दिला -मी किशोर पाठक . नाशिक हून आलो. इंजिनीरिंग कॉलेज मध्ये सेकंड इयर ला आहे. मी सेकंड इयर कॉमर्स चा विद्यार्थी. मैत्री जुळायला काहीच समान धागा नाही. पण आम्ही भेटत गेलो, बोलत गेलो. तो म्हणाला मी कविता करतो. मी त्याच्याकडे अजि म्या ब्रह्म पहिले अशा दृष्टीने पहिले. मी तेव्हा लिहित नव्हतो पण साहित्याचा आस्वादक होतो. कॉलेज मधील साहित्य चर्चा मंडळात कार्यरत असल्याने मग आमचा थोडा संवाद होवू लागला. आमचा एकमेव विरंगुळा म्हणजे सारस बागेजवळच्या विश्व हॉटेल मध्ये चहा पित गप्पा मारणे आणि त्या बरोबर तिथे गाण्यांच्या एलपी लागत त्या ऐकणे.
कधी कधी तो आपली एखादी कविता ऐकवायचा. त्याने एकदा प्रभुकुंज मध्ये जावून लता मंगेशकर यांची भेट घेतली होती तो किस्सा सांगितला होता. एकदा बोलता बोलता तो म्हणाला होता -मी मालवून टाक दीप हे गाणे ऐकू शकत नाही. खर तर माणसाने इतक भावनाविवश असू नये , पण तसा मी आहे.
आमचे दोघांचे अभ्यास वेगळे होते , त्याचा पूर्ण दिवस अभ्यासात जायचा तर मी त्या वेळी विद्यार्थी परिषदेत सक्रीय असल्याने दोघांना भेटायला तसा फार वेळ मिळत नसे. कधी कधी जेवायच्या टेबल वर पण भेट होत असे.
एक आठवण मात्र कायम लक्षात आहे. उन्हाळ्याचे दिवस होते. दुपारचे चार वाजले असतील. आभाळ काळ्या ढगांनी भरले होते. वळीव कोसळणार होता. मी गच्चीवर पावूस झेलायला गेलो. आणि माज्यासार्खाच एक जण तिथे होता. तो म्हणजे किशोर पाठक. आम्ही एक तास मनसोक्त भिजलो. मग आम्हाला चहा प्यायची तल्लफ आली. तेव्हा तो म्हणाला -अरे चल , आज मला एका कवितेचे मानधन आले आहे. काही तरी खावू पण.( अन्य वेळी आम्ही सारेच रिकाम्या खिशाचे मालक असायचो. आम्ही विश्व मध्ये गेलो . खूप गप्पा झाल्या आणि ती संध्याकाळ अविस्मरणीय झाली. नंतर तो म्हणाला अजून एक रुपया उरला आहे. मग पैसे देवून बंदुकीने फुगे फोडले. एक गेम जिंकली म्हणून अधिक फुगे फोडायला मिळाले.
नंतर मात्र आमच्या वाटा वेगळ्या झाल्या. त्याच्या संदर्भात काही बातमी ऐकली / वाचली की ती आठवण यायची. तेव्हा वाटून गेले का नाही आपण त्याचा पत्ता वगैरे घेवून ठेवला? का नाही ही मैत्री वाढवली? नंतर कदाचित मी त्याच्या लक्षात पण नसेन. पण मनातली मैत्री टवटवीत होती. काल तो गेल्याचे समजले आणि आठवणी दाटून आल्या.
नंतर तो खूप मोठा कवी झाला. त्याच्या प्रतिभेचा वृक्ष बहरत गेला पण आम्ही जेव्हा भेटलो तेव्हा तो कवी बहरत होता.
अनिल जोशी
२२.०३.२०२०
आपली प्रतिक्रिया कृपया आपल्या नावासह द्यावी.
किशोर पाठक यांच्या काही कविता
मी एक झाड रानचाफ्याचे
लालसर झाडावर पांढर्या पाकळ्यांचे
आणि एक सरळसोट सोललेला देह जखमांनी!
तू जगाला सांग कहाणी लालसर झाडावर पांढर्या पाकळ्यांचे
आणि एक सरळसोट सोललेला देह जखमांनी!
पानांनवाचुन फुलच फुलं आलेल्या सुकलेल्या झाडाची
कुणी विचारलाच प्रश्न तर सांग
ते झाड अत्याचाराने ओरबाडलेल्या एका स्त्रीने
तिच्या नकोश्या नवर्यासाठी लावले आहे!
माझ्या अखंड मायेच्या स्त्रावाने मी सांभाळते, जोजवते
पुरुष नावाच्या अमर्याद अस्तित्वाला
आणि तू म्हणतोस
मी संपलोय, थांबलोय तुझ्यापाशी!
तू कधीच ओलांडले आहेस मर्यादा नावाचे प्रवेशद्वार
तुला गुन्हा ठोकायचा आहे माझ्या कपाळावर
लक्षात ठेव मी भांगात कुंकू भरले नाही तुझ्यासाठी
मळवट भरलाय सती जाण्यासाठी
तू चिता होशील?
पुरुष नावाच्या अमर्याद अस्तित्वाला
आणि तू म्हणतोस
मी संपलोय, थांबलोय तुझ्यापाशी!
तू कधीच ओलांडले आहेस मर्यादा नावाचे प्रवेशद्वार
तुला गुन्हा ठोकायचा आहे माझ्या कपाळावर
लक्षात ठेव मी भांगात कुंकू भरले नाही तुझ्यासाठी
मळवट भरलाय सती जाण्यासाठी
तू चिता होशील?
क्षणात किती विसंगत होत जातो आपण
प्रारब्धाच्या गोष्टी भविष्याला बांधतो
आणि स्वप्नांना भुतकाळाशी सांधतो
आणि पुन्हा जगाला विचारीत राह्तो
’माझी फरफट कोणी केली?’
प्रारब्धाच्या गोष्टी भविष्याला बांधतो
आणि स्वप्नांना भुतकाळाशी सांधतो
आणि पुन्हा जगाला विचारीत राह्तो
’माझी फरफट कोणी केली?’
अप्रतिम. धनश्री जोशी
ReplyDeleteKhup sundar
ReplyDelete