शोध एक लघु कथा

Image may contain: sky, outdoor and nature

पहाटेच त्याने घर सोडले होते. तेव्हापासून तो सतत चालतच होता. सुमारे तीन तास उलटले असतील . तो आता एका डोंगराच्या पायथ्याशी आला होता. क्षणभर तो थबकला आणि त्याने डोंगरावर जाणारी पायवाट तुडवायला सुरुवात केली. आता ती पायवाट जंगल सदृश झाडीतून चालली होती. वळणा वळणाने ती वाट डोंगर चढत होती. आजूबाजूला फक्त झाडी. अनेक प्रकारची काही ताड माड वाढलेली तर काहींची वाढ मधेच खुरटलेली. कुठे वेली पसरलेल्या . काही वृक्ष बहरलेले तर काही वठलेले. तो पाहत पाहत पुढे चालला होता. ही सगळी वनश्रीची किमया त्याला सुखावत नव्हती. कदाचित याचा संबध त्याच्या मनात चालू असलेल्या वादळांशी किवा अस्वस्थ मनस्थितीशी असू शकेल. एका दगडावर तो बसला. त्याला आश्चर्य वाटलं की एवढा वेळ आपण चालतो आहोत पण ना दाम्ल्याची जाणीव, ना तहान , ना भुकेची जाणीव . कोणत्या उर्मीने या आपल्या प्राथमिक भावनांवर नियंत्रण मिळवलं हे त्याच्याच लक्षात येत नव्हते. तो चालतच राहिला. एका पिंपळाच्या झाडाखाली लाल कुंकू लावलेला एक दगड होता. बाजूला दोन हाडे व एक कवटी व पसरलेली कोंबड्याची पिसे पाहून त्याच्या लक्षात आल की इथे कुणीतरी अघोरी शक्तीची उपासना करत असाव. त्याने कुतूहलाने आजूबाजूला पहिले पण कुणाची काही चाहूल लागत नव्हती. त्याने मनातील विचार झटकले आणि तो पुढे चालू लागला.
पुढे एका ठिकाणी त्याला एका वाटेच्या दोन वाटा झालेल्या दिसल्या. एका वाटेकडे त्याने पहिले तर जंगलाची घनता कमी होत असलेली दिसली. तर दुसरी पुन्हा एकदा त्या रानात गेलेली दिसली. त्याने तिथे थोडे विसावा घ्यायचे ठरवले. कारण झाडी विरळ होत गेलेली वाट नक्कीच मनुष्य्वस्तीकडे जात असणार आणि तिथे जाण्यात त्याला स्वारस्य नव्हते कारण त्याच माणसांच्या जंगलातून तो आला होता. थोड्या वेळाने त्या रानात हरवलेल्या वाटेने जावू असा त्याने विचार केला. काही वेळ गेल्यानंतर त्या रानवाटेवरून एक घोडेस्वार भरधाव वेगाने आला व ज्या वाटेने तो आला होता त्या वाटेने डोंगर उतरत निघून गेला. आणि त्याचे आजूबाजूला अजिबात लक्ष नव्हते. त्याचाच तो विचार करत होता. त्याचा वेग, त्याचं झोकून देण व आजूबाजूला अजिबात लक्ष नसण हे सगळंच विलक्षण होत.
या विचारात हरवलेला असताना व कदाचित एवढे चालून आल्यामुळे असेल कदाचित तो जरा जास्तच विसावला असावा. थोड्या वेळाने त्याला तो आलेल्या वाटेवरून तो स्वार पुन्हा त्याच वेगाने येताना दिसला. तोच वेग, तोच आवेग. त्याचे कुतूहल वाढले. तो घोडेस्वार त्याच्या जवळ आला तेव्हा त्याने पहिले तर या वेळी तो एकटा नव्हता . घोड्यावर त्याच्या पुढे एक नवरीच्या वेषात एक मुलगी होती. हे सारे काही क्षणात घडले होते. तो पुन्हा त्या रानातील वाटेने भरधाव निघून गेला. तो या सगळ्या प्रकारचा विचार करण्यात गढून गेला होता आणि त्याची तंद्री भंगली ती हल कल्लोळाने. आता त्याच वाटेने आणखी काही सशस्त्र घोडेस्वार येत होते आणि ते तिथे थबकले कारण कोणत्या वाटेने जावे हे त्यांना समजत नव्हते. त्याच्या लगेच लक्षात आले की या घोडेस्वाराने  लग्न मंडपातून त्या मुलीला उचलून आणले आहे. आणि बाकीचे त्यांचा शोध घ्यायला आले होते. त्याला सहज आठवले की त्याच्याबरोबरची मुलगी खुश दिसत होती. हे मुलीच्या इच्छेविरुद्ध लागत असलेल्या लग्नातून प्रेमवीराने मुलीला पळवण्याचे प्रकरण वाटत होते.
त्या मंडळींची नजर याच्यावर पडली. त्यांनी तो घोडेस्वार कोणत्या वाटेने गेला याची चौकशी केली. तो रान वाटेकडे बोट दाखवणार एवढ्यात त्याच्या लक्षात आले की ते सहज त्यांना गाठतील व पुढचा अनर्थ नक्की होता. त्यांना अधिक लांब जाता यावे या साठी त्याने दुसर्या वाटेकडे बोट दाखवले . ती मंडळी त्या वाटेने निघून गेली. आणि हा पण उठला व आल्या वाटेने तो पुन्हा डोंगर उतरायला लागला. कोणत्या तरी अनामिक ओढीने नेहमीच्या आयुष्या पेक्षा काही शोधायला तो सगळे पाश तोडून बाहेर पडला होता . आणि त्याच्या लक्षात आलं की आपण आपल्या आयुष्या पेक्षा काही वेगळा विचार करूच शकत नाही . त्या लोकांनी जेव्हा वाट विचारली तेव्हा त्याने सत्य दडवले होते. म्हणजे दूर जावून सत्याचा किंवा शाश्वताचा शोध कसा घेणार? आता मात्र त्याचा हा परतीचा प्रवास थकलेला व पावले ओढत चालू होता.

अनिल जोशी 
२४.०३.२०२०
आपली प्रतिक्रिया कृपया आपल्या नावासह द्यावी.

Comments

  1. अप्रतिम
    धनश्री जोशी.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

स्पेशल नात्याचे गाव - देवरुख

डोळे हे जुलमी गडे

राग मधुवंती