सामना महा संकटाशी
आज वर्ष प्रतिपदा. म्हणजे शालिवाहन शकाचा वर्षारंभ. गुढी पाडवा . वसंत ऋतूचे आगमन. या दिवसाच्या सगळ्या आनंदावर, उत्साहावर एक काळी कुट्ट छाया एका महा संकटाची आहे . ते म्हणजे कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव. हजारो माणसे किड्या मुंग्यांसारखी मरत आहेत. या विषाणूचा वाढता प्रादुर्भाव म्हणजे संपूर्ण मानवतेला पडलेला मृत्यूचा विळखा आहे. आता व्यवहारांसाठी माणसे इकडून तिकडे जात असतात. ते अपरिहार्य आहे पण या संक्रमणाने कोरोना विषाणूचे संक्रमण वाढत आहे. त्यामुळे हे संकट अतिशय भयानक आहे. केवळ अतर्क्य आहे. आजवरचा अनुभव पाहता हे जे संकट आहे हे आजवर मानवतेवर जेवढी संकटे आली त्यापेक्षा हे संकट भयानक आहे.
आजवर जगाने दोन महायुद्धे पहिली .त्या वेळचा नरसंहार पहिला . १९४५ मध्ये मानवतेला काळिमा फासणारा अणु बॉम्ब चा विध्वंस पहिला. अनेक दुष्काळ, महापूर, भूकंप अशी एक ना अनेक संकटे पहिली व त्यांना तोंड दिले. अशावेळी सगळे भेदभाव आणि मतभेद विसरून माणूस म्हणून सगळे एकत्र आले व लढले. गेल्या रविवारी आपण स्वेच्छेने संचारबंदी पाळली. आणि आता आपल्याला तीन आठवडे खूप संयमाने या परिस्थितीला तोंड द्यावे लागणार आहे. कारण आपल्या दैनंदिन गरजा या असणारच. काल जेव्हा समजले की आता तीन आठवडे घराबाहेर पडता येणार नाही तेव्हा पहिला विचार आला की दूध नाही म्हणजे सकाळचा चहा नाही . चार दिवसांनी कणिक संपली की जेवणात पोळी नाही. दोन दिवसांनी जेवणात भाजी नसेल. आठ दिवसांनी त्रैमासिक चेक अप आहे , डॉक्टरना भेटायचे आहे ते तरी होईल का? असे एक ना अनेक विचार येवून गेले. हे आपल्यासारख्या त्या मानाने सुस्थितीत असलेल्याची अवस्था. तर ज्यांचे पोट हातावर आहे त्यांचे कसे होणार? आपले प्रश्न , समस्या नक्कीच महत्वाच्या आहेत पण घोंघावणारे मृत्यूचे संकट सकल मानव जातीच्या जीवावर उठले आहे.
ही विषाणुची पहिली बातमी आली तेव्हा पहिली कृती कंपनीने शांघाय (चीन) येथील ऑफिस बंद केले. तसा नुकतेच बाळसे धरत असलेला व्यवसाय सोडून द्यावा लागला. अनेक elctronic वस्तूंचा चीन मधून होणारा पुरवठा थांबल्यावर सगळी वेळापत्रके कोलमडू लागली. कर्मचाऱ्यांना घरून काम करण्याची सुविधा देण्यासाठी बजेट नसताना अनेक laptop विकत व भाड्याने घ्यावे लागले. आणि आज अशी बातमी समजली की जे घरून काम केले जात आहे त्याचे ग्राहकांना बिलिंग करता येत नाही. ही एका कंपनीची झालेली कोंडी आहे. बहुतेक सर्वच कंपन्या यातून जात असणार. इतकेच नव्हे तर आधीच मंदी सदृश स्थितीमुळे बिघडलेली देशाची अर्थव्यवस्था अधिक बिघडत आहे.
त्यामुळे पहिले आव्हान जीव वाचवण्याचे आणि नंतर वाचलेल्यांना पुन्हा उभे करायचे . असे दुहेरी आव्हान आजवर कोणत्याच संकटाने उभे केले नव्हते आणि म्हणूनच ही परीक्षेची वेळ आहे.
आपण हा सामना जर यशस्वीरीत्या जिंकू शकलो तर तो इतिहास असेल. तसेच पुढील काळात येणाऱ्या अशा संकटाला तोंड देण्यासाठी मार्गदर्शक ठरेल. आपण आशा वादी राहून यातून पण चांगलेच निष्पन्न होईल अशी खात्री बाळगूया.आणि आपला या लढाई मधील सहभाग द्यायचा प्रयत्न करूया.
आज खर तर वसंत ऋतूच्या आगमनाबद्दल काही ललित लिहायचा विचार होता. पण हे संकट असे समोर उभे असताना आपण आनंदाचा मुखवटा नाही धारण करू शकत.
अनिल जोशी
२५.०३.२०२०
कृपया आपली प्रतिक्रिया आपल्या नावासह द्यावी.
वास्तव भयानक आहे..आपण हादरून जातो..खरं आहे मुखवटा नाही धारण करता येत..
ReplyDeleteधनश्री जोशी