आज की ताजा खबर

आमच्या लहानपणी एका चित्रपटातील हे एक गाणे प्रसिद्ध होते.
आज की ताजा खबर आज की ताजा खबर,
आओ काकाजी इधर आओ मामाजी इधर
ईस दुनिया की खबर. असं काहीसं. एक लहान मुलगा हातात एक वर्तमान पत्र घेवून धावत धावत हे गाणे म्हणत आपल्या वर्तमान पत्राची जाहिरात करत असतो किंबहुना ते वर्तमानपत्र लोकांनी विकत घ्यावे म्हणून लोकांना उद्युक्त करीत असतो.
आपल्या दैनंदिन जीवनात वर्तमानपत्र हे एक महत्वाचे अंग झाले आहे. आता चोवीस तास बातम्यांचा अखंड रतीब सुरु असला तरी मुद्रित माध्यमांनी आपले वेगळेपण जपले आहे आणि म्हणूनच वर्तमान पत्रे टिकून पण आहेत. महाविद्यालयात शिकत असतांना टीव्ही येत होता. आणि टीव्ही मधून दृश्ये पाहिल्यावर ही छापील वर्तमानपत्रे कोण वाचणार अशी चर्चा सुरु होती तेव्हा एका पत्रकार मित्राने ( कै.रविकिरण साने) एक महत्वाची गोष्ट सांगितली ती म्हणजे नुकताच अंतिम विबल्डन टेनिस सामना झाला होता आणि तो जगाने टीव्ही वर पहिला होता , त्याचा थरार अनुभवला होता. तरीपण टाइम्स सारख्या वर्तमान पत्रासह सगळ्या वर्तमान पत्रांनी पानभर सामन्याची रसभरीत वर्णने छापली होती. त्यामुळे मुद्रित माध्यमांना मरण नाही. आज ई वर्तमान पत्रे उपलब्ध आहेत पण छापील वर्तमान पत्र घरी आले नाही तर चुकल्या चुकल्यासारखे वाटतेच.
आज हे सगळे आठवायचे कारण की गेल्या रविवार पासून वर्तमानपत्रे येणे बंद झाले आहे. कोरोना च्या प्रसाराला रोखण्यासाठी हे पावूल उचलले गेले आहे. काही दिवसांपूर्वी पंतप्रधान मोदी यांनी सर्व संपादकांशी चर्चा केल्याचे वृत्त ऐकले होते. बहुधा त्या बैठकीत हा निर्णय झाला असावा. आणि या विरोधात कुणी स्वातंत्र्यावर गदा वगैरे भाष्य केले नाही.
हे का केले असेल हे जाणून घ्यायचे असेल तर या वर्तमानपत्रांची दुनिया कशी असते हे पाहावे लागेल. यात सर्वात महत्वाचे म्हणजे यात मनुष्यबळाचा खूप वापर होतो. आता सुरुवात करायची तर कागदापासून करू. कागद हा अपरिहार्य असतोच. आता आमच्या घराजवळ एका वर्तमान पत्राचे ऑफिस आहे. छापखाना, संपादक विभाग, वृत्त विभाग, प्रशासकीय विभाग या मध्ये कागद साठवायला पुरेशी जागा नाही. जेमतेम एक दिवस पुरेल इतका कागद ठेवता येईल एवढी जागा आहे. त्यामुळे रोज सकाळी १०-११ च्या सुमारारास कागद येतो. तो उतरवायला २-३ हमाल ,गाडीचा ड्रायवर वगैरे. मग छापखाना. दुपार नंतर तेथील यंत्रे सतत धडधडत असतात. अनेक कामगार तिथे कम करत असतात. छपाई नंतर त्याचे कटिंग,घड्या घालणे हे पहाटेपर्यंत चालू असते. मग अंक पोचवायची धावपळ. आधी परगावचे, मग स्थानिक. यात किती माणसे गुंतलेली असतात हे पहायचे असेल तर पहाटे ५-५.३० वाजता अप्पा बळवंत चौकात जावून पाहावे. आणि तिथून अनेक माणसे वेवेगळ्या ठिकाणी वर्तमानपत्रे घरी पोचवायला रवाना होतात.
या सगळ्या यंत्रणेतील माणसांच्या प्रचंड सहभागाबद्दल लोकसत्ताचे तत्कालीन संपादक कै. माधव गडकरी म्हणाले होते हे सगळ रोजच्या रोज अव्याहत पणे होत असतं हे आश्चर्य आहे.
हे सगळे लक्षात घेतले की कोरोना चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्व संपादकांनी घेतलेला हा निर्णय नक्कीच शहाणपणाचा आहे हे मान्य करावेच लागेल.
अनिल जोशी
२६.०३.२०२०
कृपया आपली प्रतिक्रिया आपल्या नावासह द्यावी.
वर्तमानपत्र न मिळण्याचं दुःख होतंच, पण हा लेख वाचल्यावर ते जरूर कमी झालं.
ReplyDeleteवर्तमान पत्र रोजच्या चहा इतकेच मस्ट आहे..
ReplyDeleteधनश्री जोशी