सावल्यांची साथ


Image result for राधा कृष्ण चित्रImage result for राधा कृष्ण चित्रImage result for राधा कृष्ण चित्र

राधे , अग किती सैरभैर आहेस अजून? किती बावरलेली? हरवलेली?

अनया, अरे काय सांगू? माझ अस्तित्वच जाणवत नाही. सगळ निसटून गेलंय असं वाटतंय. ती यमुना बघ ना, किती निर्जीवपणे वाहते आहे? तो कदंब तर वठून गेलंय. त्या कालियाची पिलावळ मात्र वळवळताना दिसत्ये. त्या मुरलीचा वेणू पिचून गेलाय आणि त्यातून सूर नाहीत तर फक्त हवा निघते आहे. मथुरेच्या बाजाराला जाणार्या सख्या गौळणी पण दिसत नाहीत. कुठे गेला तो वाट अडवणारा पेंद्या? सगळ गोकुळ उध्वस्त झालंय. असं का झालंय अनया? तू तर माझा जन्मोजन्मीचा जोडीदार ना? सांग ना , हे सगळ काय आहे?

राधे, अग भानावर ये. तू होतीस त्या तेज:पुंज युगंधराची सावली. तो युगंधर तेजोहीन झाला , त्याला युग उलटली . मग ते तेजच निघून गेल्यावर काय उरणार? या तुझ्यासारख्या अस्तित्वहीन सावल्या. त्या युगंधराच्या. आता त्याचच अस्तित्व तेजोहीन आहे तर त्याच्या सावल्या कशा असतील?

अनया, हे तुझ्यासारखं शहाणपण माझ्यात नाही त्यामुळे तू काय सांगतोस ते काही समजत नाही. मी खूप शोध घेतला. त्याला भेटायला द्वारकेत गेले. पण तिचं अस्तित्व समुद्राने गिळंकृत केलं. मथुरेत गेले तर त्याची मूर्ती मंदिरात बंदिस्त.अस्तित्व नाहीच. कुरुक्षेत्रावर गेले तर तेथील रक्तरंजित मातीमध्ये त्याचं अस्तित्व नव्हतंच.गावोगावी मंदिरांमधून त्याच्या प्रतिमा आहेत,म्हणायला फक्त राधे कृष्ण.

राधे, तू पूर्ण कृष्णमय झालीस , त्याच्या प्रेमात एकजीव झालीस पण त्याने सांगितलेले जीवनाचे सार तुला कधी उमगलेच नाही.

अनया , तुला जर उमगले असेल तर तर तू मला सांग . मला ऐकायचं आहे आणि समजून पण घायचं आहे.

राधे, मग ऐक, तुझा आणि त्याचा प्रत्यक्ष असा सहवास असा किती काळ होता? म्हणजे मानाने जरी तू कृष्णमय होतीस तरी त्याची साथ तो इथे गोकुळात असतानाचीच ना? तू त्याच्या बाळ लीला पाहिल्यास. नंतर तो थोडा मोठा झाल्यावर तुझ आणि त्याचं नात जुळल. पण थोड्याच अवधीत तो गोकुळ सोडून गेला. आणि तू त्याच्यात जी मानाने अडकलीस ती अगदी त्याच्याशी एकरूप झालीस . हे सार भावनिक, अशारीरिक होत. शरीराने तू इथेच होतीस , माझ्या जवळ.आपला संसार सुरु होता. फक्त तो तू कृष्णार्पण केला होतास. पण होतीस मात्र माझ्याजवळ. हे विचित्र वाटलं तरी सत्य तेच आहे.

पण अनया, मला तुझ अस्तित्व कधीच जाणवलं नाही. माझ्या नजरेसमोर, माझ्या मनात, माझ्या भाव विश्वात होता तो फक्त माझा मुरलीधर.

बरोबर आहे राधे, तुझ्या मनातील  त्याच्या प्रतिमेचे मूर्त रूप मात्र मीच होतो, सदैव तुझ्याजवळ. तू मानाने समर्पित होत होतीस त्या मुरलीधराला पण शरीराने मात्र ते समर्पण मलाच होत.

अनया ,पण मी अगदी एकांतात सुद्धा तुला कधीच हाक मारली नाही की तुला कधी साद घातली नाही. माझ्या मुखात होते फक त्याचे नाव आणि मनात फक्त त्याचीच प्रतिमा.

राधे, हाच त्या युगंधराचा खेळ आहे आणि त्याची लीला पण. त्यानेच तुझ्या मनातील प्रतिमा आणि प्रेम व्यक्त व्हायला जवळ मी होतो.

अनया, पण त्याचे नाव घेत मी तुझ्याजवळ असताना तुला कधी हेवा नाही का वाटला त्याचा?

राधे, असं कसं होईल? मी तर सामान्य आहे, नात्याने तुझा पती. तेव्हा सुरुवातीला खंत वाटत असे. पण प्रेमाने बहरलेली , फुललेली तू माझ्या सहवासात आल्यावर हळू हळू त्याची लीला माझ्या लक्षात येवू लागली. मग माझ्या मनात आल -कुणीही देवाला नैवेद्य अर्पण केला तरी प्रसाद पुजार्यालाच मिळतो ना? तू त्याला नैवेद्य अर्पण करत होतीस आणि प्रसाद मी भक्षण करत होतो.त्याच्या प्रेमाची रीतच तशी आहे. अशीच एक मीरा त्याच्या प्रेमात दिवानी झाली आणि तिचा पती जो एक राजा होता तो हे नाही सहन करू शकला, मी सामान्य असल्याने पुजार्याची भूमिका स्वीकारली. आता हेच पहा ना , रुख्मिणी ने त्याला साद घातली आणि त्याने तिचे अपहरण करून राणी केले पण शेजारी सत्य्भामे सारखी सवत ठेवलीच. आणि या सर्वांपासून तो कमल दला प्रमाणे अलिप्त पण होत गेला. त्याला मोह कशाचाच नव्हता. तू त्याच्याशी एकरूप  झालीस पण त्याची लीला त्यामुळेच कदाचित तुझ्या लक्षात आली नसेल.

अनया , अरे हे जीवनाचे सार आहे की तत्वज्ञान ? आणि मग माझा सुरुवातीचा प्रश्न उरतोच. माझ अस्तित्व काय?

राधे, आता तुझ अस्तित्व हे निस्तेज सावली सारख आहे आणि माझ प्राक्तन आहे ही या सावलीला साथ द्यायची. जगाच्या अंतापर्यंत.

अनिल जोशी 
२७.०३.२०२०
कृपया आपली प्रतिक्रिया आपल्या नावासह द्यावी. 

Comments

  1. अनिल,
    राधा, अनया आणि राधेशाम यांच्यातील त्रिमिती संबंधाचा तरल आलेख तू उत्तम रेखाटला आहेस. एक कवीमनच प्रेमाच्या या उत्कट नात्याची संगतवार उकल करू शकेल, जी तू छान केली आहेस. सध्याच्या झाकोळलेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर ती तशी होण्याचं तू केलेलं निदान संयुक्तिक वाटतं. मूळ व्यक्तिमत्वच तेजोभंग झालेलं (कलियुगाचा परिणाम असावा) तर मग सावली तेजःपुंज कशी राहणार ?
    तुझ्या लेखनाचा हा वेगळा बाजही आवडला. जय हो. - अवी

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

स्पेशल नात्याचे गाव - देवरुख

डोळे हे जुलमी गडे

राग मधुवंती