एक महत्वाची तारीख
आज ३१ मार्च. आर्थिक वर्षाचा शेवटचा दिवस. जे कुणी फायनान्स किंवा ऑडीट संदर्भात काम करतात त्यांना या दिवसाचे महत्व सांगायलाच नको पण आता याचे महत्व सर्व सामान्यांपर्यंत पोहोचले आहे कारण लोकांमध्ये आर्थिक जागरूकता वाढली आहे. मला जेव्हा थोडे फार समजायला लागले म्हणजे समजायला लागण्याच्या वयातच मी टाटा मोटर्स सारख्या संस्थेच्या वित्त विभागात प्रशिक्षणार्थी म्हणून रुजू झालो . तो महिना होता फेब्रुवारी चा. ऑफिस मध्ये मार्च ची धाम धूम सुरु झाली होती. त्याचे पहिले लक्षण म्हणजे ऑफिस ची वेळ संपल्यानंतर पण कामासाठी थांबणे. हे सारे मला अगदी नवीनच होते. फार तपशिलात न जाता एवढच सांगेन की तेव्हापासून हा ३१ मार्च आमच्या कुंडलीत कायम महत्वाच्या स्थानी जाऊन बसला . यातील एक गम्मत म्हणजे वर्षासाठी म्हणून जे बजेट केलेले असते ते वर्षभरात खर्ची पडले नसले तर ते संपवण्यासाठी गडबड सुरु होते. या उलट एका सरकारी खात्यातला अनुभव असा होता की एप्रिल मध्ये बजेट आले की कर्तव्य भावनेने ते लगेच खर्च करून टाकले जाते.
पूर्वी बँका आपले वर्ष जानेवारी ते डिसेंबर असल्याने सर्व खात्यांचे balancesबंद करून पुढील वर्षासाठी हस्तांतरित करीत असत शिवाय प्रत्येक खात्यावर जमा झालेले व्याज त्या त्या खात्यात जमा करीत. आणि तेव्हा संगणक नसल्याने हे सर्व हिशेब आकडेमोड करून करावे लागत. त्या दिवशी लोकांसाठी बँक बंद असली तरी कर्मचारी रात्री उशिरा पर्यंत काम करायचे. अजूनही करतात पण संगणकामुळे थोडे सोपे झाले आहे. हे सर्व हिशेब झाले कि त्यांची तपासणी (audit ) . हे असे सगळे चक्र या ३१ मार्च भोवती फिरते. यावर देय कर किती हे लक्षात घेवून फायदा / तोटा जाहीर केला जातो.
आता या ३१ मार्च चा रुबाब थोडा कमी झाला कारण अनेक कंपन्या आता त्रैमासिक हिशेब तपासून (audited ) जाहीर करतात व लाभांश वगैरे पण देतात. पण सरकारी कर भरणा, त्यांचे returns हे मार्च च्या हिशेबंवरच असते.
या पार्श्वभूमीवर यंदाचा ३१ मार्च मात्र पूर्ण निष्प्रभ झालेला दिसतोय. कारण देशभरातील सर्व हालचाली बंद झाल्या. ना उत्पादन ना व्यापार. व्यवहार फक्त जीवनावश्यक वस्तूंचे. त्यामुळे एरवी तळपणारा ३१ मार्च हा ग्रह झाकोळून गेला आहे. तो पुन्हा त्याच तेजाने तळपू लागेल अशी अशा करूया.
अनिल जोशी
३१.०३.२०२०
कृपया आपली प्रतिक्रिया आपल्या नावासह द्यावी
Comments
Post a Comment