घातक वळण

 कोरोना वायरस

पूर्वी युद्धात मोठ्या प्रमाणात प्राण हानी होत असे . पुराणात एक अशी गोष्ट पण ऐकली होती की एकदा पृथ्वी भगवान विष्णूंकडे तक्रार करते की लोकसंख्या प्रमाणाबाहेर वाढल्याने भार असह्य झाला आहे. त्यावर विष्णू म्हणतात मी आता लवकरच कृष्णावतार घेणार आहे आणि त्या अवतारात असे काही महाभारत घडेल की लोकसंख्येचा भार हलका होईल.मतितार्थ इतकाच की युद्धात प्रचंड नरसंहार होत असे. जशी युद्धाची व्याप्ती वाढत गेली तसा हा संहार वाढत गेला.

पहिल्या महायुद्धात पण असेच घडले.दुसरे महायुद्ध असेच तुंबळ सुरु होते . सहा वर्षे ते चालू होते. आणि मग झटपट युद्ध संपवण्यासाठी अमेरिकेने अणुशक्तीचा वापर केला. अमेरिकेच्या पर्ल हार्बर या बंदरावर जपानी सैन्याने अचानक हल्ला चढवून ते उध्वस्त केले होते आणि त्याचा बदला म्हणून अमेरिकेने हिरोशिमा व नागासाकी इथे अणु बॉम्ब टाकले. न भूतो न भविष्यती अशी मनुष्य हानी झालीच शिवाय या अणु संसर्गाचे दुष्परिणाम खूप पसरले. या मुळे युद्ध संपले पण जग युद्धाच्या विरोधात विचार करू लागले .

अमेरिका रशियाच्या शीत युद्धाच्या काळात सुद्धा व्हिएतनाम सारखी युद्धे झाली पण त्याचे महायुद्धात रूपांतर नाही झाले. तसेच भारत चीन, भारत पाकिस्तान , अरब इस्राएल ही युद्धे पण मर्यादित स्वरूपात
लढली गेली.व ती थांबवण्याचे प्रयत्न झाले.असे असले तरी सत्ताधीशांची सत्ता पिपासा आणि युद्ध पिपासा त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. मग अतिरेकी आणि जो काही दहशतवादी यांच्या मार्फत युद्धे करणे सुरु झाले. त्याचे परिणाम जग भोगतेच आहे. पूर्वी एक अरुण साधू यांची स्फोट ही अशाच विषयावरची कादंबरी वाचली होती. एक शास्त्रज्ञ या लोकसंख्येच्या भस्मासुराने इतका विचलित होतो आणि ठरवतो की ही लोकसंख्या कमी करायची . त्यासाठी तो संगीताची एक धून शोधू काढतो जी ऐकल्यावर ज्यांची हृदये कमजोर आहेत त्यांना गाढ झोप लागेल व त्यातच त्यांचा अंत होईल एकदम शांतपणे. आणि एका विशिष्ट्य वेळी ही धून ते एका विवक्षित फ्रिक्वेन्सी वर प्रसारित करणार होते जेणे करून रेडिओ, टीवी, चित्रपट,संगीताचे कार्यक्रम जिथे म्हणून चालत असतील तिथून ती लोकांच्या कानावर पडेल .

पण या बेताची कुणकुण त्यांच्या सहाय्यकाला लागते आणि तो बेत फसतो. म्हणजे ही जरी विज्ञान काल्पनिका असली तरी वास्तवात अशा गोष्टीचा विचार चालू असतो आणि अणु विभाजनानंतर जैविक शक्तीचा संहारक वापरासाठी विचार सुरु झाला आहे.हे अतिशय घातक आहे. आणि यासाठी केलेले विषाणू प्रयोग शाळेतून बाहेर आले आणि परिणामी या करोना व्हायरस ने जो काहीसंहार धुमाकूळ घातला आहे त्याला रोखण्यासाठी जगभर युद्ध पातळीवर प्रयत्न सुरु आहेत. किती संहार होईल व त्याची व्याप्ती किती असेल याचा काहीच अंदाज येत नाही. सध्या सुरु आहे ती प्रतीकात्मक कारवाई. म्हणजे शंका असलेल्याना इतरांच्या संपर्कात न येऊ देणे. वेगळी हॉस्पिटल निर्माण करणे., मास्क बद्दल प्रचार करणे इ. पण याचे परिणाम चीनच्या आणि पर्यायाने जगाच्या अर्तव्यवस्थेवर होत असताना दिसत आहेत. इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या चीन
मधून होणाऱ्या पुरवठ्यावर विपरीत परिणाम झाला आहे तर काही औषधांचा अभूतपूर्व तुटवडा निर्माण होईल अशी साधार भीती आहे. आपला शेअर बाजार विक्रमी अंकांनी कोसळत आहे. म्हणजेच प्राण हानी बरोबर अर्तव्यवस्थेवर पण संकट येऊ घातले आहे. त्यामुळे हा धोका अणु युद्धाच्या धोक्या पेक्षा जास्त घातक ठरू शकेल.

अनिल जोशी 
०६.०३.२०२०
कृपया आपली प्रतिक्रिया आपल्या नावासह द्यावी. 

Comments

Popular posts from this blog

स्पेशल नात्याचे गाव - देवरुख

डोळे हे जुलमी गडे

राग मधुवंती