त्या तिथे रुखातळी च्या निमित्ताने
त्या तिथे रुखातळी ही एक छोटेखानी कादंबरी आहे . ती एका मोठ्या वृक्षाची गोष्ट सांगते.. भोर वरून घाट उतरून महाड ला जायला निघालं की वाटेत उभा असलेला हा डेरेदार वृक्ष. या वृक्षाची कथा सांगतांना लेखक गोनीदा म्हणजे गोपाळ नीळकंठ दांडेकर फक्त त्या वृक्षाचेच वर्णन करत नाहीत तर तो परिसर, त्या वृक्षाच्या भोवताली असलेले किडे, अळ्या, पक्षी यांचे पण चित्रमय वर्णन करतात . त्यांची दिनचर्या सांगतात. गोनीदा म्हणजे रसाळ ओघवती भाषा . त्यामुळे त्यांचे सगळे बारकावे सांगणारे चित्रण हे सत्यजित रे यांच्या शैलीशी नाते सांगते तसेच गोनीदांची ओघवती व रसाळ भाषा वाचकाला खिळवून ठेवते.
गोनीदा म्हणजे १७ कादंबर्या- आम्ही भगीरथाचे पुत्र, कृष्ण्वेध , जैत रे जैत ,तांबडफुटी,पडघवली, पद्मा,पवना काठचा धोंडी,पूर्णामायची लेकरे, बिंदूची कथा, माचीवरला बुधा , मोगरा फुलला, मृण्मयी,शितू, सिंधुकन्या, वाघरू, रानभुली आणि त्या तिथे रुखातळी.
त्या बरोबरच
- आनंदवनभुवन
- कहाणीमागची कहाणी
- तुका आकाशाएव्हडा
- दास डोंगरी राहतो अशी चरित्रे तर
- स्मरणगाथा हे आत्मचरित्र लिहिले आहे.
प्रवास व स्थळ वर्णनात किल्ले, गोनीदांची दुर्ग चित्रे, नर्मदेच्या तटाकी आणि दक्षिण वारा,मावळतीचे गहिरे रंगए कुणा एकाची भ्रमण गाथा , निसर्ग शिल्प, शिवतीर्थ रायगड,दुर्ग भ्रमण गाथा, महाराष्ट्र दर्शन अशा पुस्तकांचा समावेश आहे.
कुमार साहित्यासोबातच त्यांनी अनेक धार्मिक ग्रंथ लिहिले. यातील वेगळेपण म्हणजे त्याची अनुभूती येण्यासाठी ते झगडले. म्हणजे तुकाराम महाराजांची गाथा आकलन होण्यासाठी ते भंडारा डोंगरावरच्या (याच डोंगरावर महाराजांनी गाथा लिहिली असे मानले जाते) एका गुहेत जावून बसत. १९८१ च्या अकोला येथील साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषवले होते.
मेंजेस्टीक प्रकाशनाचे केशवराव कोठावळे यांच्याशी त्यांचा विशेष स्नेह होता.
तसे ते फकिरी वृत्तीचे ,साधे ,सरळ व निगर्वी होते. अवलिया होते. विद्यार्थ्यांना ते गडांवर सहलीला नेत व त्यांना तेथील इतिहास जिवंत करून संगर. गौर वर्ण , धोतर,झब्बा असा साधा वेश व सोबत वाढवलेली दाढी. आणि डोळ्यांमध्ये विलक्षण कुतूहल व मिश्कील भाव. त्यांचे काही कार्यक्रमांतून दर्शन होत असे.
मी रविवारच्या तरुण भारत मध्ये पुस्तक परीक्षणे लिहित असे. एका रविवारी गोनीदांच्या त्या तिथे रुखातळी या कादंबरीचे परीक्षण लिहिले होते. ते वाचल्यानंतर सोमवारी तरुण भारत चे कार्यालय उघडल्यावर फोन करून तिथून त्यांनी माझा पत्ता घेतला व स्वहस्ताक्षरात आभार व कौतुकाचे पत्र पाठवले. माझ्यासारख्याला आवडत्या लेखकाचे पत्र येणे हा आनंदाचा क्षण होता.
पुढे एकदा काही कामानिमित्त वीणा देव यांच्या घरी गेलो असता तिथे भारतीय बैठकीवर स्वत: गोनीदा स्थानापन्न झालेले दिसले .ते नेहेमी भारतीय बैठकीवरच बसत.समोरच्या व्यक्ती खुर्चीवर बसल्या होत्या. आमचे काम होत आले होते आणि त्या व्यक्ती निघून गेल्याने त्यांच्याशी संवाद साधता आला. मी त्यांना त्यांनी आवर्जून पाठवलेल्या पत्राविषयी सांगितले तेव्हा ते मिश्किलपणे म्हणाले-
मी जे काही भले बुरे लिहितो त्या पेक्षा वेळेवर पत्रांना पोच / उत्तर देतो यासाठी जास्त प्रसिद्ध आहे.
असा हा अवलिया या मातीतला अस्सल लेखक. कोणते पाश्चात्य संस्कार नाहीत. इतिहास, अध्यात्म आणि केलेली भटकंती या शिदोरीवर आपले लेखन साम्राज्य त्यांनी निर्माण केले. त्यांच्या स्मृतीस नमन.
अनिल जोशी
०९.०३.२०२०
कृपया आपली प्रतिक्रिया आपल्या नावानिशी द्यावी.
Comments
Post a Comment