धन धन भाग सुहाग तेरो याने कलाश्री

rushirajpawar Instagram posts - Gramho.comसांस्कृतिक पुणे: February 2011

पंडित भीमसेन जोशी म्हणजे संगीतातील सूर्य म्हणजे स्वर भास्कर. त्यांच्या बद्दल लिहिण्याची पात्रता नाही हे लक्षात ठेवून त्यांच्या चरणी काही श्रद्धा सुमने अर्पण करायचा प्रयत्न आहे.
तानपुरे जुळून आल्यावर पंडितजींनी क्षणभर डोळे मिटून षडज लावावा आणि वातावरण त्या स्वरांनी भरून जावे हा नित्याचा अनुभव. पंडितजींचा आवाज लागला नाही असे सहसा कधी झाल्याचे ऐकिवात नाही.
१९७१ मध्ये पुण्यात आल्यावर शिवाजी मंदिरात प्रथम त्यांचे गाणे १० फुटांवरून ऐकले. आणि धन्य झालो. एकदा असे समजले की गोपाळ गायन समाजात त्यांचे गाणे आहे . मी तिथे घुटमळत होतो. पंडितजी काही लोकांबरोबर आले व त्या घोळक्या बरोबर मी पण आत शिरलो. तो कार्यक्रम तिकीट लावून नव्हता आणि समाजाचा मी सभासद नव्हतो पण चातुरीने आत प्रवेश मिळवला. ४०-५० जाणकारांच्या समोर त्यांचा हा कार्यक्रम झाला.त्यावळी त्यांनी जो शुद्ध कल्याण सदर केला तसा पुन्हा कधी ऐकला नाही.
भीमसेनजी ना खरे पहिले ते सवाई गंधर्व संगीत महोत्सवात. हे संमेलन म्हणजे सांगीतिक दरबार असतो आणि मंचावरील प्रत्येक कलाकार हा त्या वेळचा राजा असतो. पण त्या मंचावर सम्राट म्हणून शोभले ते भीमसेनच . तीन रात्री जागरणाने डोळे चुरचुरत आहेत. अनेक कलाकाराच्या गाण्य बाजावण्याने श्रवणेन्द्रिये तृप्त झाली आहेत. आता उजाडले आहे आणि वार्षिक आभार प्रदर्शनाच्या कार्यक्रमानंतर उत्सवाची सांगता करायला पंडितजी विराजमान झाले आहेत. ते सा लावतात आणि मग तोडी, आसावरी, रामकली अशा रागांच्या सुरावटी नी मंडप भरून जातो. माडगुळकर यांनी वेगळ्या संदर्भात लिहिलेले शब्द -
संगमी श्रोते जन नाहती 
अशी अवस्था अनुभवायला मिळायची. मग एखादी ठुमरी, लोकाग्रहास्तव मावुली टाकळकर टाळ घेवून स्थानापन्न झाले की एखादा अभंग व अखेर सवाई गंधर्व यांची ध्वनिमुद्रिका.
पंडितजींचा स्वभाव मिश्कील होता. एकदा सकाळी गाण्यापूर्वी ते ग्रीन रूम मध्ये कुठलासा तोडी घेवून रियाझ करत होते. निवेदकाने त्या रागाचे नाव सांगून पंडितजी तो राग गातील असे सांगितले. मग हळूच पंडितजी म्हणाले की मी गुजरी तोडी गाणार आहे.
माणूस म्हणून मैत्रीला पक्का अशी त्यांची ख्याती. त्याच्या व वसंतरावांच्या मैत्रीचा एक किस्सा पु लं णी लिहून ठेवला आहे. पंडितजींचे हुबळी का गदग कुठेतरी गाणे होते तर दुसर्या दिवशी वसंतरावांचा कट्यारचा प्रयोग सोलापूर ला होता. आणि दोन्ही ठिकाणी तबला साथीला नाना मुळे च. आता हे कसे जमावे? पण गाणे झाल्यानंतर हा जागतिक कीर्तीचा गायक गाडी काढून निघाला. नाना मुळे यांना घेवून स्वत: गाडी चालवत वेळेच्या आधी पंडितजी सोलापुरात हजर व वसंत रवाना म्हणतात हा घ्या तुमचा तबलजी. घ्या वाजवून आता नाटक यांच्या कडून. पंडितजींना गाड्या चालवण्याचा पण खूप षोक.
१३२७ सदाशिव पेठेत रहात असताना आमचे शेजारी नाना डोंगरे यांनी काही एल पी आणल्या होत्या त्यात बरसात की रात , पाकीझा, या बरोबर पंडितजींची कलाश्री ची ध्वनिमुद्रिका होती. ती ऐकली आणि त्या कालाश्रीच्या आम्ही म्हणजे मी, नाना डोंगरे व अरविंद सोनटके प्रेमात पडलो. धन धन मंगल गावो हा झपतालातील व धन धन भाग सुहाग तेरो हा त्रितालातील द्रुत किती वेळा ऐकला याला गणतीच नाही. त्याच्या मागे ओ कर्तार ही ललत भटियार ही रेकॉर्ड पण ऐकली. कलाश्री या रागाची निर्मिती पंडितजींनी कलावती व श्री या रागांच्या मिश्रणातून केली. काही टीकाकार व समीक्षक म्हणत पंडितजी तेच तेच राग गातात . या आक्षेपाला पंडितजींनी दिलेले हे उत्तर होते पण त्यांनी त्याचा गाजावाजा कधी केला नाही. एका मुलाखतीत ते म्हणाले गोपाळ कृष्ण भोबे यांनी तानसेनाच्या जीवनावर नाटक लिहिले होते. याचे संगीत पंडितजींनी द्यावे असा भोबे यांचा आग्रह होता व या निमित्ताने काही नवीन राग हवा असे पण सांगितले. पंडितजींनी संगीत पण दिले व कलाश्री हा राग पण निर्माण केला. या बाबत रामदास कामात आठवण सागतात की पंडितजी कामाच्या व्यग्रतेमुळे पुणे सोडू शकत नव्हते तर कामात एयर इंडिया मधील नोकरी मुळे मुंबई सोडू शकत नव्हते. मद कामात ऑफिस संपवून डेक्कन क्वीन ने ८.४० च्या सुमारास पुण्यात येत. पंडितजींकडे तालीम घेवून १२ च्या सुमारास पासेंजर गाडीने पहाटे मुंबईला पोहोचत. याला म्हणतात कलेप्रती निष्ठा.
आपल्या बंगल्याचे नाव त्यांनी कलाश्री हेच ठेवले होते. काही प्रयोजन नसल्याने त्यांना भेटण्याचा योग कधी आला नाही. एकदा येता येता हुकला. माझा चुलत भाऊ अनेक कलाकारांचे फोटो काढत असे. एका गुरुवारी बोलता बोलता पंडितजींचा फोटो हवा व त्यांना अन्य फोटो दाखवावेत असे ठरले. मित्र सुनील शिरोडकर यांनी पंडितजींच्या घरी फोन लावला तेव्हा समजले पंडितजी क्रिकेट ची मेच पाहत आहेत तेव्हा भेट होईल. आम्ही गडबड करून वाहनाची व्यवस्था करून पोहोचे पर्यंत अर्धा तास उलटून गेला. आणि आम्ही कलाश्री मध्ये पोचलो तेव्हा वीज गेल्याने (गुरुवार) क्रिकेट बंद झाले व पंडितजी झोपायला निघून गेले होते. त्यांचे चिरंजीव श्रीनिवास यांनी दुसया दिवशी संध्याकाळी या असे सांगितले. सुटी नसल्याने मी जावू शकलो नाही पण भाऊ जावून त्यांना फोटो दाखवून व त्यांचे फोटो काढून मोहीम फत्ते करून आला.
आज पंडितजी आपल्यात शरीराने नसले त्यांनी जो सुरांचा ठेवा ठेवला आहे तो अनमोल आहे आणि त्यामुळे आपले भाव विश्व समृद्ध झाले आहे हे निश्चित.

अनिल जोशी.
१२.०४.२०२०
आपली प्रतिक्रिया कृपया आपल्या नावासह द्यावी. 

Comments

  1. छानच लेखन आहे.
    नाना डोंगरे आणि वाहिनींचे अनंत उपकार. केवळ त्यांच्यामुळे कलाश्री आणि ललत भाटियार अनंत वेळा ऐकायला मिळाला. अतिरम्य स्मरणरंजन. पुणे विद्यार्थी गृहातही २-३ वेळेला पंडितजींचे गायन झाले होते. मी त्या वेळी आश्रमात होतो. बुवांनी आपलं कलाजीवन खूपच श्रीमंत केलं एव्हढं खरं. - अवी

    ReplyDelete
  2. सहज सुंदर..नेहमीप्रमाणे

    ReplyDelete
  3. Bhimsenji's voice was having great depth and appeal, and your writing has also the same qualities. Keep on writing.👍👍

    ReplyDelete
  4. कलाश्री राग माझ्याही अत्यंत आवडीचा आहे. वाचून मजा आली.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

स्पेशल नात्याचे गाव - देवरुख

डोळे हे जुलमी गडे

राग मधुवंती