जागी मै सारी रैना

Image result for singer Prabha Atre

आपण कधीतरी कुणाचे तरी शास्त्रीय गायन ऐकून त्याच्या प्रभावाखाली येतो आणि मग आपली श्रावण यात्रा सुरु होते. पूर्वी रेडिओ वर शास्त्रीय संगीत लागले की आपोआप रेडिओ बंद व्हायचा. पण एकदा अघटीत घडले. मुंबईला मामाकडे गेलो होतो आणि त्याने नवीन रेकॉर्ड प्लेयर घेतला होता. त्यात अनेक रेकॉर्ड ऐकता ऐकता एक रेकॉर्ड लावली ती स्वर योगिनी प्रभा अत्रे यांच्या मारू बिहाग ची. त्यात विलंबित चीजेचे बोल होते कल नाही आये तर द्रुत चीजेचे बोल होते जागी मै सारी रैना. या रेकॉर्ड ने अक्षरश: जादू केली. अनेक वेळा ऐकली . त्या रेकॉर्ड च्या दुसर्या बाजूला कलावती रागातील तन मन धन तोपे वारू ही चीज व कौन गली गयो शाम ही ठुमरी होती. शास्त्रीय संगीत इतक्या रंजकतेने व सुगम पणे सादर करता येते हा प्रभा अत्रे यांनी जणू वस्तुपाठ घालून दिला.

१९३२ मध्ये जन्मलेल्या प्रभा अत्रे यांच्या मातोश्रींना तब्बेत बरी नसताना काही संगीत ऐकवले होते. (कदाचित म्युझिक थेरपी) आणि ते ऐकून प्रभा अत्रे यांना संगीताची आवड निर्माण झाली. सुरुवातीला संगीताचे धडे त्यांनी श्री. विजय करंदीकर यांच्याकडून घेतले व नंतर गुरुशिष्य परंपरेने सुरेश बाबू माने व हिराबाई बडोदेकर यांच्या कडून किराणा घराण्याची शास्त्रोक्त तालीम घेतली. त्या बरोबरच त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करून शास्त्र व कायदा शाखेची पदवी घेतली व संगीत विषयावर पी एच डी घेतली. आज त्या किराणा घराण्याच्या आघाडीच्या गायिका आहेत. गेली काही वर्षे सवाई गंधर्व संगीत महोत्सवाची सांगता त्यांच्याच गायनाने होत आहे.
त्यांचा सरस्वती राग प्रत्यक्ष ऐकला होता. तर शंकरा, मिया मल्हार असे राग ऐकून कान तृप्त होतात. सुंदर आलापी, मद लडिवाळ पाने स्वरावली, त्याला पोषक ताना यातून रागाची बढत अशी त्यांच्या गायनाची काही वैशिष्ठ्ये सांगता येतील पण अतिशय साधेपणाने व सरळ रागाची मांडणी केल्याने त्यांचे गाणे रसिकांना भुरळ घालते.
मारू बिहाग शिवाय त्यांच्या पुढील ध्वनी मुद्रिका पण तितक्याच गाजलेल्या आहेत.
*निरंजनी-पुरिया कल्याण ,शंकर व बसंत
*अनंत प्रभा- ललित , भिन्न षडज, भैरवी ठुमरी
*बागेश्री ,खमाज ठुमरी
* जोगकंस, तोडी,ठुमरी
*मालकंस, दादरा
*चंद्रकंस
*मधुकंस
*मधुवंती, देसी
*यमन, भैरव
*शामकल्याण , बिहाग, रागेश्री ठुमरी
*१९७० पासून विविध मैफालीत सदर केलेल्या गजल व भजने.
त्यांनी अपूर्व कल्याण, दरबारी कंस, पटदीप मल्हार, शिव कली, तिलंग भैरव, रवी भैरव, मधुर कंस अशा रागांची निर्मिती केली आहे.
नृत्य प्रभा या सुचेता भिडे चापेकर यांनी निर्मिलेल्या भरत नाट्याच्या कार्यक्रमाचे संगीत दिग्दर्शन केले होते व या बरोबरच नेदरलंड च्या सुसान अबुहेल यांच्या जाझ्झ साठी पण संगीत दिले होते .
गायनाबरोबरच त्यांनी संगीताच्या अध्यापनात पण विशेष योगदान दिले आहे.
आजही त्यांनी  आपली साधना सुरु ठेवली आहे आणि रसिकांसाठी प्रभा अत्रे हे नाव आज पण तितकेच महत्वाचे वाटते.

अनिल जोशी
१८.०४.२०२०
कृपया आपली प्रतिक्रिया आपल्या नावासह द्यावी.


Comments

  1. तुम्ही वर म्हंटले प्रमाण हे क्लासिकल सुरू झाले कि रेडिओ बंद व्हायचा .
    पण मला ही गोडी लागली क्लासिकल ची , प्रभात अत्रे यांच्या याच गाण्यांने.
    अजूनही विलंबित वगैरे प्रकार पासून मी खूप लांब आहे काही क्लासिकल मनाला कुठेतरी गुंफून ठेवतात .
    यातली काही दिग्गज नावे म्हणजे प्रभाताई , आरती अंकलीकर, वसंतराव ,
    बुवा , आणि या सर्वांत सरताज भीमसेन .
    फक्त हात जोडता येतात . बाकी काही करता येत नाही मला .

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

स्पेशल नात्याचे गाव - देवरुख

डोळे हे जुलमी गडे

राग मधुवंती