प्रवासातील अनपेक्षित सुखद वळणे
आपण प्रवासाला बाहेर पडतो ते वेगवेगळे अनुभव घ्यायलाच.आणि प्रवासात अनेक धक्के व अनुभव येतातच . म्हणजे गाडी वेळेवर न येणे, चुकामुक होणे, हॉटेल चांगले न मिळणे वगैरे . पण प्रवास म्हटला की या गोष्टी येतातच. पण कधी कधी अनपेक्षित पाने काही सुखद अनुभव येतात आणि प्रवास संस्मरणीय करतात.
१९८४ साली आम्ही दक्षिण भारताच्या सहलीला गेलो होतो आणि मर्यादित दिवस हातात असल्याने मोजकीच ठिकाणे मुक्रर केली होती. म्हणजे तिरुपती, चेन्नाई, रामेश्वर, मदुराई आणि कन्याकुमारी. मदुराई हून आम्ही कन्याकुमारीला आलो. हा प्रवासातील शेवटचा टप्पा. तिथे आलो आणि समजले पंतप्रधान इंदिरा गांधी यांची हत्या झाली आहे. सगळे व्यवहार बंद. विवेकानंद स्मारक तिथे होड्या जात नसल्याने लांबून दर्शन. नाही म्हणायला कन्याकुमारीचे दर्शन झाले. तिसर्या दिवशी व्यवहार सुरु होणार होते पण आमचे परतीचे आरक्षण असल्याने तिथून निघणे भाग होते. पहाटे ५.३० वाजता कन्याकुमारी हून जयंती जनता एक्स्प्रेस निघाली आणि आम्ही परतीच्या प्रवासाला लागलो. सकाळी ८ च्या सुमारास गाडी तिरुअनन्त्पुरम येथे आली आणि आंम्ही केरळ राज्यात प्रवेश केला. तिथून गाडी निघाली आणि बेर पाहतो तो काय हिरवी गर्द झाडी, म्हणून वाहणाऱ्या नद्या , घरे. एक गाव संपून दुसरे सुरु झालेले पण काळात नव्हते. मध्ये मध्ये स्टेशन्स येत होती पण निसर्गाचा नजरा तोच. जणू पाचूच्या प्रदेशातून आमचा स्वप्नवत प्रवास सुरु होता आणि राहून राहून वाटत होते की आपण सहलीत केरळ चा समावेश का नाही केला? जवळ जवळ दिवसभर हा जादुई प्रवास सुरु होता. संध्याकाळी पालघाट गेले आणि केरळची सीमा संपली. पुन्हा देशात सर्वत्र दिसणारे बोडके डोंगर, निर्मनुष्य प्रदेश दिसू लागले. दिवेलागणीच्या सुमारास कोईम्बतूर आले आणि मग नेहेमीप्रमाणे आंध्र, कर्नाटक मधून रुक्ष प्रवास सुरु झाला पण केरळ ने मात्र सुखद अनुभव दिला. आणि माझे मत झाले की निसर्ग सौदर्याच्या बाबतीत केरळ हे काश्मीर पेक्षा सरस आहे.
आम्ही जेव्हा सिक्कीम दार्जीलिंग येथे गेलो असता दोन्ही ठिकाणी जेवणाचे फारसे सुख मिळाले नव्हते. संध्याकाळी आम्ही गंगतोक येथे फिरत असताना एक गुजराथी पद्धतीचे जेवण देणारे हॉटेल दिसले. आम्ही तिथे चौकशी केली व तिथे कढी खिचडी मिळेल का अशी विचारणा केली. तेव्हा तो म्हणाला मिळेल पण प्रत्येकी पाच रुपये जास्त द्यावे लागतील. तेव्हा मित्र दिलीप निकम म्हणाला याबरोबर आपण रसगुल्ले आणून त्याला वाढायला सांगितले तर बहार येईल. आमची ही चर्चा सुरु असताना त्या हॉटेल वाल्याला वाटलं की आम्ही वाढीव पैशाबाबत बोलत आहोत. तो लगेच म्हणाला ठीक आहे तुम्हाला तेवढ्याच पैशात कधी खिचडी देतो. मग आम्ही त्याला रसगुल्ले आणून दिले आणि मिष्टान्न भोजनाने सिक्कीम सहलीची सांगता झाली.
आम्ही १९९५ मध्ये जेव्हा राजस्थान सहल ठरवली तेव्हा आता सारखी on line बुकिंग मिळत नव्हती आणि निघायच्या आदल्या दिवसापर्यंत उदयपूर व जेसलमेर इथे आमची राहायची व्यवस्था झालेली नव्हती. मजल दर मजल करत आम्ही जोधपूरला पोचलो. तिथून जेसलमेर ला काही व्यवस्था होते का हे पाहत होतो. पण सिझन फुल असल्याने अजिबात येवू नका असा सल्ला मिळाला. आमचा गाईड म्हणाला आपण वाटेत पोखरण इथे व्यवस्था होते का ते पाहू या . मग आम्ही निघालो. पोखरण येथील हॉटेल राहण्यास अजिबात योग्य नव्हते. मग तेथून १२ किमी आत रामदेवरा येथे गेलो. हे आपल्या शेगाव संस्थान सारखे संस्थान आहे व तिथे १००-१२५ धर्मशाळा आहेत . एका धर्मशाळेत गेलो. स्वच्छता छान होती. चारी बाजूला खोल्या व मध्ये चौक अशी रचना होती . शिवाय प्रशस्त वरांडे होते. विशेष म्हणजे तिथे कुणी आणखी नव्हते. त्याला चहा व भजी यांची ओर्डेर देवून आम्ही दोघे जन जेवणाची व्यवस्था पाहायला गेलो. परत येतो तो चौकात चहाची किटली ठेवलेली व गरमागरम भाजी याचा आस्वाद मंडळी घेत होती. या सहलीत आम्ही एकूण ३० जण होतो. लग्नाच्या कार्यालयात वर्हाड आल्यावर जसे वातावरण असते तसे वातावरण. मुले धुडगूस घालत होती. मोठ्यांची गप्पाष्टके रंगलेली. नेहेमी प्रवास झाला की हॉटेलच्या रूम मध्ये जाणे, जेवणे व झोप असा साचेबद्ध कार्यक्रम होता.त्यातून मुक्ती मिळाल्याने सर्व खूष होते. मग पत्त्यांचा डाव रंगला. गच्चीवर महिलांनी मंगलागौरीचे खेळ खेळून धमाल उडवली . दुसर्या दिवशी सकाळी उठून आम्ही जेसलमेर ला गेलो, सम येथील वाळवंटात बागडलो, उंटावरून फेरफटका झाला. मावळतीची सोनेरी सूर्यकिरणे त्या सोनेरी वाळूवर पसरली तो निसर्गाचा नजारा औरच होता. सूर्यास्तानंतर पुन्हा आमच्या रामदेवराच्या धर्म शाळेत मुक्कामाला आलो. दुसर्या दिवशी सकाळी गच्चीतून पाहतो तो काय ? तेथील उकिरड्यावर आपल्याकडे जशी डुकरे असतात तसे मोर होते. राजस्थान सहलीतील रामदेवरा हा फार संस्मरणीय टप्पा ठरला.
अनिल जोशी
१९.०४.२०२०
आपली प्रतिक्रिया कृपया आपल्या नावासह द्यावी.
खूप छान लिहिता तुम्ही सर
ReplyDeleteApratim ..keralche varnan surekh
ReplyDelete