जनांचा प्रवाह चालला

Mass Travelling For Fun And Tour To The Seashore Or Beach Around ...New York City draws 48.7 million tourists in 2010 - CNN.com
हजारो रेल्वे गाड्या,बसेस,विमाने,खाजगी गाड्या रोज लाखो लोकांना इकडून तिकडे नेत असतात. सध्या सगळ बंद असल्याने हे सगळ भ्रमण थांबलं आहे. रोज एवढे लोक इकडून तिकडे कशासाठी जात असतात. आता मुंबई सारख्या ठिकाणी लोकल गाडीने लोक रोजीरोटीसाठी सगळ्या गैरसोयी सोसून जात असतात. पण लांब पल्ल्याच्या गाड्यांमधून रोज कोण जात असते? काही लोक पर्यटनाला, काही आपल्या गावाला लग्न कार्या निमित्त, काही आपल्या व्यवसायासाठी जात असतात. तरीपण याही पेक्षा एक वेगळा घटक असणार. तो कोणता असावा? 
यासाठी माणसाची इकडून तिकडे जाण्याची प्रेरणा काय असावी याचा विचार केला तर असं लक्षात येत की पोटासाठी , रोजीरोटीसाठी माणसे फार पूर्वीपासून इकडून तिकडे जात आहेत. त्यात ही हा प्रवाह सुबत्ता असलेल्या प्रदेशाकडे जाताना दिसतो. फार पूर्वी भारतवर्षात शक, कुशाण ,हूण , आर्य येथील सुबत्तेच्या ओढीने येवून स्थिरावले तर मसाल्यांच्या पदार्थांच्या शोधासाठी युरोपीय दर्यावर्दी या देशाचा शोध घेत आले. पूर्वी आफ्रिकेत चांगला पैसा मिळतो म्हणून अनेक जण तिकडे गेले. काही शिकायला, काही व्यापार करायला गेले. 
असाच एक प्रवाह खेड्यांतून शहराकडे शिक्षण व पोटापाण्याच्या व्यवसायासाठी आला. यात सुद्धा जी पिढी आधी स्थलांतरित होते तिची मुळे गावाकडे रुजलेली असतात. पण त्या पुढच्या पिढ्या ज्या ठिकाणी जातात तिकडे आपली ओळख बनवतात. मिलिटरी सर्विसेस मध्ये अनेक दाक्षिणात्य विविध ठिकाणी गेले तसे पुण्यात ही आले. आता त्यांच्या तिसर्या, चवथ्या पिढ्या पुणेकर बनून राहिल्या आहेत. या नंतर औद्योगिक वाढीने खेड्यांतून शहरांकडे स्थलांतरे झाली . तर आय टी तील संधीमुळे अनेक तरुण विदेशात गेले. आज अनेक शहरांतून फार थोडे ज्येष्ठ नागरिक असे दिसतील की ज्यांची मुले त्यांच्या सोबत किंवा याच देशात राहत आहेत. आणखी एक कारण म्हणजे जिथे आयुष्य घालवलं त्या पेक्षा वेगळ्या ठिकाणी पुन्हा जुळवून घेणे अवघड झाल्याने अनेक ज्येष्ठ नागरिक मुलांकडे न जाता इथे राहणे स्वीकारतात. काही उदाहरणे तर अशी आहेत शहराच्या मध्यभागातून उपनगरात सुद्धा काही जण तयार होत नाहीत. 
बर्याच अंशी जरी स्थलांतरे ही आर्थिक कारणासाठी झाली असली तरी काही स्थलांतरे राजकीय होती. त्याचे मोठे उदाहरण म्हणजे फाळणी. हे स्थलांतर सक्तीचे होते. अशा लोकांना खेड्यात निर्वासित म्हणतात. इतकी वर्षे उलटून गेली असली तरी हे विशेषण कायम आहे. 
असे असले तरी हे अभिसरण हा अर्थव्यवस्थेचा मोठा व महत्वाचा भाग आहे. कारण हा एकीकडून दुसरीकडे जाणारा जनांचा प्रवाह नाही तर हे अभिसरण आहे. जशा मुंबईकडे येणाऱ्या गाड्या लोकांनी भरून येतात तशा मुंबई कडून जाणार्या गाड्या पण भरूनच जातात. मेंढपाळ आपल्या मेंढ्या घेवून गावोगाव जात असतात. ऊस तोडणी कामगार पण एका ठिकाणाहून दुसर्या ठिकाणी जात असतात. तीच अवस्था बांधकाम मजुरांची. कारण हातावर हात ठेवून बसून राहिल्याने पोट भरत नाही हे वास्तव आहे. 
असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी अशी एक म्हण आहे. पण ती औपरोधिक असावी. त्यापेक्षा व्यंकटेश स्तोत्रातील "अन्नासाठी दाही दिशा ,आम्हा फिरविशी जगदीशा " ही ओळ जास्त संयुक्तिक वाटते.
आता काही काळ जरी थांबली असली तरी ही पायाखालची व अन्य चक्रे लवकरात लवकर गतिमान होणे गरजेचे आहे. अर्थात प्राण वाचले तर पुढचे सगळे आहे कारण म्हणतात ना "शिर सलामत तो पगडी पचास"
सध्याच्या गतिहीन दिनक्रमात हा थोडा गतीचा आढावा घ्यायचा प्रयत्न. 

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

स्पेशल नात्याचे गाव - देवरुख

डोळे हे जुलमी गडे

राग मधुवंती