नकार द्यायचा आणि घ्यायचा
नकार म्हणजे कोणत्यातरी गोष्टीला नाही म्हणणे . असे नाही म्हणणे सहसा कुणाला आवडत नाही. कुणी आड्वळणाने, कुणी होकार लांबवून किंवा तसे सुचवून नकार देतात. कारण नकार दिला तर समोरची व्यक्ती दुखावते. पण व्यवस्थापन शास्त्रातला महत्वाचा नियम म्हणजे नकार देताना डगमगू नका. त्यामुळे पुढच्या अनेक समस्या टाळता येतात. असा नकार मिळाला की घेणारी व्यक्ती दुखावते हे बरोबर पण ती क्षणिक भावना असते. पण त्या मुळे विषयाचा गुंता वाढत नाही व खोटी आशा लागून रजत नाही.
आता व्यवस्थापन क्षेत्रातला नियम सांगितला पण त्याचाच एक उप विभाग म्हणजे संवाद किंवा काम्युनिकेशन काय सांगते ते पाहू या.
तुम्ही तुमच्या सहाय्यकाचे नाव बढतीसाठी पाठवता आणि चर्चेच्या दरम्यान तुमचे वरिष्ठ सांगतात की तो माणूस नालायक आहे त्याला बढती नाही देता येणार. आता हे वरिष्ठांचे स्पष्ट मत ( व्यवस्थापन शास्त्राप्रमाणे) आपण आपल्या सहाय्यकाला तितक्या स्पष्टपणे सांगू शकत नाही. मग संवाद शास्त्राची मदत घ्यावी लागते.बढतीची यादी जाहीर होई पर्यंत चिडीचूप राहायचे. यादी जाहीर झाली की तो विचारायला येतोच. मग त्याला बढती का मिळू शकली नाही याची एक मोठी कारण मालिका असते. ती पहिली की संवाद शास्त्राची चापलुसी लक्षात येते. ती करणे अशी असू शकतात.
*कंपनीची परिस्थिती सध्या ठीक नाही. व्यवसायात खूप स्पर्धा आहे त्या मुळे यंदा यादी ला कात्री लागली आहे. (वास्तविक यादीत सर्वात जास्त नावे असतात)
*मी तुमचे नाव पाठवले होते पण कुठे माशी शिंकली ते समाजत नाही.
*बाकीच्या विभाग प्रमुखांनी तुमच्या नावाला पाठींबा दिला नाही.
*तुमची शैक्षणिक अर्हता (क्वालिफिकेशन) कमी पडली.(वास्तविक जाहीर झालेल्या यादीत तसे काही आढळत नसते)
*तुम्ही कामाच्या वेळेनंतर थांबत नाही ( वेळेत काम संपवून वेळेवर घरी जाता)
* जास्तीची जबाबदारी घ्यायला तयार नसता (म्हणजे कामचुकार माणसांची कामे ओढवून घेणे)
*हे सर्वात हास्यास्पद कारण आहे पण असं कारण दिल गेलं होत. ते म्हणजे जेव्हा बढतीची यादी तयार झाली त्यात तुमचे नाव १३व्या क्रमांकावर होते आणि तो अशुभ आकडा असल्याने वगळले गेले.
आता नकार घेणे याचे काही किस्से. काही काळ एका प्रकाशनासाठी जाहिराती मिळवण्याचे काम करत होतो. आता कुठे ही गेल्यावर कुणी लगेच जाहिरात देईल असे होत नसते. बर्याच चकरा माराव्या लागतात.तेव्हा कुठे भेट मिळते. मग चर्चा होते. बराच वेळ त्यांच्या व्यवसायातील अडचणी ऐकून घेण्यात जातो . हे व्यावसायिक खरे व्यावसायिक असल्याने लगेच नकार देत नाहीत. कधी चहा पाजतील, गोड बोलतील पण जाहिरात काही देत नाहीत. पण अशा ठिकाणी चिकाटीने परत परत जावे लागते. अगदी जाहिरात मिळेपर्यंत किंवा नकार मिळेपर्यंत. अशावेळी हा नकार पण सुहास्य वदनाने घ्यायचा असतो व निघता निघता सध्या नाही तर नाही पण लवकरच पुन्हा भेटू असं म्हणून निरोप घ्यायचा.
काही ठिकाणी स्पष्टपणे नकार मिळतो. म्हणजे बजेट संपले. किंवा सध्या धंदा ठीक चालत नाही. हे सांगत असतानाचा ऑफिस मधील शिपाई मालकाने घेतलेल्या नवीन गाडीचे पेढे वाटत असतो ते गोड मानून घायचे असते. संख्या शास्त्रीय दृष्ट्या १० पैकी ९ ठिकाणी नक्की नकार मिळणार या तयारीनेच जायचे असते. पुढे पुढे याची इतकी सवय झाली की आम्ही मिटिंग नंतर म्हणायचो चला आता ५-६ ठिकाणाहून नकार घेवून येवूया.
असे हे नकार . नकाराचा आणखी एक प्रकार म्हणजे लग्न जुळवताना मिळणारे नकार. पण ते अगदीच व्यक्तिगत असल्याने त्यावर लिहिणे योग्य नाही.
व्यावसायिक दृष्ट्या स्पष्ट किंवा आडवळणाने दिलेले नकार हे आपल्याला अनुभवसंपन्न करून जातात हे मात्र खरे.
अनिल जोशी
२३.०४.२०२०
कृपया आपली प्रतिक्रिया आपल्या नावासह द्यावी.
खूप सुंदर विवेचन केले आहे, अनुभव संपन्न लेखन आहे. पुढील लेखनास मनःपूर्वक शुभेच्छा....
ReplyDelete- मंगेश विठ्ठल कोळी, मो. 9028713820