रुटीन गाण्याचे आणि खाण्याचे
सकाळी उठल्यापासून आपण काही ना काही खात वा पित असतो. त्याचे तसे एक रुटीन असते. म्हणजे ते कधीतरी बदलते किंवा आपण ते मोडतो. तो एक जीवनाचा भाग आहे. त्याला जर आपण एक संगीताच्या किंवा गाण्याच्या रुटीन ची जोड दिली तर आपले आयुष्य जरा वेगळे म्हणजे खास होवून जाईल .
सुरुवात सकाळच्या चहापासून
करूया. सकाळचा पहिला चहा म्हणजे तो कसा हवा तर एकदम फक्कड. ज्याने दिवसाची सुरुवात
कशी होणार ते ठरते. हा चहा म्हणजे मला सकाळी आकाशवाणी वर सुरुवातीला बिस्मिल्ला
खान यांच्या शहनाई वर जितका पवित्र ललत वाटतो तसा व्हायला पाहिजे.
या नंतर सकाळचा नाश्ता. यात
उपमा, पोहे, इडली, ब्रेड बटर , उकडलेली अंडी असे पदार्थ येतात. ते आसावरी, भैरव,
बिभास, भटियार, तोडी ,बैरागी यांच्या वाटेने जायला हवा. म्हणजे समाधान तर व्हायला
हवे पण थोडी अपूर्णतेची हुरहूर पण हवी.
दुपारचे जेवण मग ते काही पण
असो ते अगदी शुद्ध सारंग किंवा मधमाद सारंग या सारखे. शांत, तृप्तीचा हुंकार
देणारे , पोटाबरोबर मन पण शांत करणारे.
यानंतर दुपारचा चहा किंवा
कॉफी हे कधी एकटे येत नाहीत. सोबत मिश्र रागासारखी त्या सोबत बिस्कीटे, टोस्ट पण
येतात. बिस्कीट अगर टोस्ट चहा अगर कॉफी मध्ये बुडवला की झाला मिश्र राग तयार. आता
प्रत्येक जण आपल्या सवयी नुसार वा सोयी नुसार भीमपलास च्या वेळी घेलील ,कुणी
मुलतानीच्या वेळी. पण जर ती मारव्याची किंवा पुरियाची वेळ असेल तर त्यासोबत
एखाद्या कवाली अगर कजरी प्रमाणे जरा चटक मटक सामोसे, कचोरी, वडापाव,भाजी,भेळपुरी , पाणीपुरी इ. याची जोड
द्यावी लागते.
रात्रीचे जेवण तर एखाद्या
मैफली प्रमाणे असावे. म्हणजे बागेश्रीचे सूप, हमीर प्रमाणे चैतन्यमय स्टार्टर, मग
भूपाली प्रमाणे राजस मेन कोर्स, आणि हृदयाची तार छेदणारी केदारची स्वीट डिश. जर
रात्रीच्या जेवणात सामिष चमचमीत काही असेल तर तो म्हणजे वक्र वळणांचा नंद.
आता रुटीन पेक्षा वेगळ काही
असेल उदाहरणार्थ पुरण पोळी.अगदी लुसलुशीत. आत व्यवस्थित पुरण भरलेली तर तो
तब्बेतीत गायचा दरबारी असतो. जर उकडीचे मोदक असतील – ते फोडून त्यावर साजूक तुपाची
धार हा सोहळा म्हणजे तो हंसध्वनी असतो. तर आमरस असेल तर तो दुल्हा राग बसंत असतो.या सोबत वारुणी असेल तर ती म्हणजे आर्त स्वरानी हृदय छेडणारी ठुमरी.
जर बर्गर, पिझ्झा, हॉट डॉग
असे पदार्थ असतील तर ते जाझ्झ किंवा पॉप म्युझिक असते. जर डोसे, उतप्पा, आप्पे,
उडीद वडे असतील तर ते घटम आणि व्हायोलीनच्या साथीने सादर होणारे कर्नाटकी
संगीतातील राग असतील. रात्री उशीरा कुणी मंडईत जाऊन तर्री वाली मिसळ खाणार असलं तर
तो शंकराच असू शकतो. आणि मैफलीच्या नंतर जर जायफळ घातलेली गरम कॉफी म्हणजे सदा
सुहागन भैरवीच.
अशी ही मैफल म्हणजे आपल्या
रुटीन ला दिलेले एक सांगीतिक वळण देण्याचा प्रयत्न. जेव्हा असे रुटीन सुरु होते
तेव्हा चेहऱ्यावर तजेला होता , शरीर गरगरलेले होते. आयुष्यात वजन काट्याला स्थान
नव्हते. पण एके दिवशी त्या वजन काट्याने आपला इंगा दाखवला. मग ही मैफल सुनी सुनी
होवून गेली. चेहऱ्यावरचे तेज नाहीसे झाले. कपडे ढगळ झाले. डॉक्टर मात्र बेहद्द खुश
होते. मग खाण्याचे रुटीन जरी बिघडले तरी त्याला संगीताच्या आणि गाण्याच्या संगतीने
सुधारून टाकले आणि जीवानंद घेणे सुरूच राहिले.
अनिल जोशी
२९.०४.२०२०
(कृपया आपली प्रतिक्रिया आपल्या नावासह द्यावी)
क्या बात है, अनिल साहेब... तुम्ही जीवनयात्रा अगदी संगीतमय करून टाकलीत... आता, आम्ही शाकाहारी असल्याने संगीताच्या सांगाती सागोतीचा संगम संभवत नाही आमच्या आहारात; पण तुमची कल्पना काळजात घुसली, मुलायम कट्यारीसारखी...!
ReplyDelete